होंडा मोटार आणि निस्सान मोटार कंपन्यांनी विलिनीकरणाच्या प्रस्तावानंतर सविस्तर चर्चेसाठी सहमती दर्शवली असून जून २०२५ पर्यंत हा व्यवहार पूर्ण करण्याचे दोन्ही कंपन्यांचे लक्ष्य असेल. २३ डिसेंबर रोजी याबाबतच्या मूळ करारासाठी पुढाकार घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. यात ऑगस्ट २०२६ सूचीबद्ध करण्यासाठी समान होल्डींग कंपनी स्थापण्याचे ध्येय असेल, असे जपानमध्ये जाहीर झालेल्या कराराच्या रूपरेषेनुसार म्हणता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विलिनीकरण का?

विलिनीकरणासाठी पाच महत्त्वाची कारणे आहेत. त्यातील पहिले, अर्थव्यवस्थेची व्याप्ती. टोयोटा आणि फोक्सवॅगन समूहांनंतर होंडा मोटार आणि निस्सान मोटार मिळून तयार होणारा समूह हा सर्वाधिक वाहनविक्रीच्या अनुषंगाने जगातील तिसरा मोठा समूह असेल. जपानमधील टोयोटा मोटार कॉर्पच्या आधिपत्याला आव्हान देण्यासाठी दुसरा पर्याय म्हणून विलिनीकरणानंतर तयार झालेला होंडा-निस्सान समूह उभा करील. शिवाय, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मक आव्हानांना तोंड देण्यासाठी या समूहाला उत्तम स्थिती प्राप्त झालेली असेल.

हेही वाचा >>> No Detention Policy : केंद्र सरकारने ‘नो-डिटेंशन पॉलिसी’ रद्द का केली? यामागचं नेमकं कारण काय?

दुसरे कारण, चीन असेल. इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन निर्मितीतील बीवायडी कंपनीची लोकप्रियता, खेरीज क्ष्पेंग, निओ आणि ली ऑटो सारख्या चिनी कंपन्यांनी, कधीकाळी जागतिक बाजारपेठेवर अधिराज्य गाजवलेल्या जपानी कंपन्यांना झाकोळून टाकल्याचे चित्र आहे. काही काळासाठी चीनच्या बाजारपेठेतील त्यांचा हिस्सा गमावल्यानंतर होंडा आणि निस्सान कंपन्या चीनमध्ये काटकसर करता येणार नाहीत, असे खर्च कायम ठेवण्यासाठी उत्पादन क्षमतेत मोठी कपात करण्याचे जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे.

तिसरे, खर्चातील वाटा. नव्या हायब्रीड आणि इलेक्ट्रीक कार निर्मितीत सहकार्य आणि निर्मिती प्रकल्प एकमेकांसाठी खुले केले करून दोन्ही कंपन्या खर्चकपातीचे ध्येय ठेवतील. शिवाय सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रीक वाहनांची संयुक्तरीत्या विकास करण्यासाठी यंत्रणा आणि एकात्मिक संशोधन केले जाईल.

चौथे कारण, निस्सानची आर्थिक पडझड. विशेषतः फ्रान्सच्या रेनॉ कंपनीशी फारकत घेतल्यानंतर निस्सानला स्वतःची स्पर्धात्मक बाजू मजबूत करण्याची गरज आहे. गेल्या महिन्यात निस्सानने ९,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले. ही कर्मचारी कपात कंपनीच्या जागतिक क्रयशक्तीच्या सहा टक्के इतकी आहे. तिमाहीतील ६० दशलक्ष डॉलर इतका तोटा सहन करावा लागल्यानंतर निस्सानने जागतिक उत्पादन क्षमतेत २० टक्क्यांनी घट केली आहे.

आणि शेवटचे कारण, विविध बाजारांत आणि तंत्रज्ञानांत दोन्ही कंपन्यांकडे असलेले बळकट तंत्रज्ञान आणि क्षमतांचे वापर करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी आशा बाळगलेली आहे. निस्सानचे युरोपातील बाजारातील स्थान बळकट आहे, तर होंडाला या बाजारात वाहननिर्मिती करता आलेली नाही. निस्सानचे दणकट वाहन निर्मितीतील स्थान आणि होंडाची पेट्रोल इंजिननिर्मितीतील वर्चस्व वाहननिर्मितीला बळ देईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा >>> Maha Kumbh Mela 2025: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले?

निस्सानला पुनर्वैभव प्राप्त होईल?

इलेक्ट्रिक प्रकारातील वाहननिर्मितीत होंडाचा प्रवेश नवा असेल. तर निस्सान कंपनी इलेक्ट्रिक वाहननिर्मिती संस्थापकांमधील एक आहे. १५ वर्षांपूर्वी निस्सानने जेव्हा निस्सान लीफ बाजारात आणली तेव्हा ही कंपनी सर्वांच्या एक पाऊल पुढे होती. मात्र, त्यानंतर या क्षेत्रातील त्यांचा प्रभाव कमी होत गेला. मात्र, विलिनीकरणानंतर निस्सानने गमावलेले वैभव त्यांना पुन्हा प्राप्त करण्यास साह्य होईल आणि होंडाला ईलेक्ट्रिक वाहन निर्मितीतील बारकावे समजून घेण्यास मदत होईल.

होंडा-निस्सान कराराची रूपरेषा काय?

विलिनीकरणाच्या कराराचे सुकाणू होंडाच्या हाती असेल. संयुक्त होल्डींग कंपनीचा अध्यक्ष नेमण्याचे अधिकार होंडाकडे असतील. शिवाय कंपनीअंतर्गत आणि बाह्य संचालकांची बहुसंख्या असेल. मित्सुबिशी मोटार्ससह या कराराची व्याप्ती वाढवता येऊ शकेल.
होंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिबे तोशिहिरो म्हणाले, की नाट्यमय जागतिक बदलातून जात असताना विलिनीकरणाच्या पलीकडील शक्यतांवर चर्चा करण्यावर आमची नजर असेल. सध्या टप्प्यात असलेल्या क्षमता, बदलशक्तींहून अधिक शक्यतांना कवेत घेण्यासाठी होंडा सिद्ध आहे. निस्सानसोबत विलिनीकरणातू ती गोष्ट शक्य आहे. तर निस्सानचे सीईओ उचिडा माकोटो म्हणाले, की स्पर्धात्मक क्षितिजावर नवी वाहनर्मिती कंपनी म्हणून नवे चित्र रेखण्याची ही वेळ आहे. निस्सानची उत्पादन क्षमतेतील वर्चस्व यामुळे अधिक धारदार शस्त्र म्हणून काम करील.

भारतातील परिणाम काय असेल?

भारतातील यशाची चव दोन्ही कंपन्यांनी काही अंशी चाखलेली आहे. त्यासाठी त्यांना मोठ्या खडतर मार्गावरून क्रमण करावे लागले आहे. होंडाची सिटी ही कार मध्यम आकाराच्या सेडान प्रकारातील उच्च स्थान मिळवून आहे. मात्र, इतर वाहनप्रकारांत त्यांना प्रभाव गाजवता आलेला नाही. सिटी हायब्रीड ही त्यांची किफायतशीर हायब्रीड तंत्रज्ञानात मातब्बरी गाजवत आहे. मात्र, मारुती सुझुकी-टोयोटा यांच्या एकीकरणानंतर यातील नेतृत्व हातून निसटले आहे. निस्सानला मॅग्नाइट या मिनी एसयूव्हीमधून काही प्रमाणात यश मिळाले आहे. परंतु त्यातील सातत्य टिकवता आलेले नाही. भारतीय ग्राहकांच्या पसंतीला उतरेल अशी निर्मिती कायम राखता आलेली नाही. दोन्ही कंपन्यांनी मिळून ध्येयाची व्याप्ती मोठी ठेवली असली तरी कारनिर्मितीतील जगातील तिसरी मोठी बाजारपेठ ताब्यात ठेवण्याची संधी होंडा-निस्सान विलिनीकरणामुळे निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis 5 reasons of honda and nissan merging print exp zws