ग्लासगो राष्ट्रकुल २०२६ क्रीडा स्पर्धेतून क्रिकेट, हॉकी, नेमबाजी, कुस्ती अशा नऊ प्रमुख खेळांना वगळून टाकण्याचा काहीसा धक्कादायक निर्णय राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून घेण्यात आला आहे. या स्पर्धेतून कोणते खेळ वगळायचे हे कसे ठरविण्यात आले, यामध्ये यजमान देशाला फायदा होईल याचा विचार करण्यात आला का, कोणते खेळ स्पर्धेचा भाग असायला हवे यासाठी काय प्रक्रिया राबविण्यात आली, या निर्णयाचा भारताला कसा फटका बसणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा एक प्रयत्न…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रकुल २०२६ स्पर्धा कुठे आणि कधी?

मुळात राष्ट्रकुल २०२६ क्रीडा स्पर्धा होतील की नाही हेच निश्चित नव्हते. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया शहराने स्पर्धा आयोजनाचा खर्च वाढत असल्याचे कारण देऊन या स्पर्धेच्या आयोजनातून गतवर्षी ऐन वेळी अंग काढून घेतले. त्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनाची टांगती तलवार राष्ट्रकुल क्रीडा महासंघावर होतीच. वाढत्या खर्चाचे कारण पुढे करत कोणताच देश आयोजनासाठी पुढे येत नव्हता. अशा वेळी स्कॉटलंडने ग्लासगो येथे स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवून राष्ट्रकुल क्रीडा महासंघाला दिलासा दिला. मात्र, यासाठी त्यांनी कमी खर्चात स्पर्धा आयोजनाची आणि त्यासाठी १९ ऐवजी १० खेळांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्याची अट घातली. स्पर्धा रद्द करण्यापेक्षा १० खेळांच्या रूपाने का होईना ती पार पडेल अशा विचाराने राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने जुलै २०२६ मध्ये या स्पर्धा ग्लासगो येथे आयोजित करण्यास मान्यता दिली.

हेही वाचा >>> विश्लेषण : तुकडेबंदी व्यवहारांचे भविष्य काय?

खेळ कमी करण्याची नेमकी कारणे काय?

राष्ट्रकुल स्पर्धेतून खेळ कमी करण्यात आले ही बातमी नक्कीच नाही. राष्ट्रकुल काय किंवा आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धा काय अशा मोठ्या स्पर्धांतून कोणत्या खेळांचा समावेश करायचा हे यजमान देशावर अवलंबून असते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत सुरुवातीपासूनच दहा खेळांचाच समावेश असायचा. खेळांच्या वाढत्या प्रसारामुळे १९९८ पासून हा आकडा १५ ते २० खेळांपर्यंत गेला. अखेरच्या बर्मिंगहॅम स्पर्धेत १९ खेळांचा समावेश होता. खेळाचा प्रसार जसा वाढू लागला, तसा खर्चाचाही बोजा वाढू लागला. आर्थिक घडी बसविण्याच्या उद्देशाने राष्ट्रकुल समूहातील छोट्या देशांना स्पर्धा आयोजित करणे दिवसेंदिवस अशक्य होऊन बसत असल्याचे चित्र आहे.

खेळाची नेमकी निवड प्रक्रिया काय?

राष्ट्रकुल क्रीडा महासंघ या स्पर्धेत किती आणि कोणत्या खेळांचा समावेश करायचा याचा निर्णय किंवा याबाबतचे अधिकार यजमान देशाला देतो. मात्र, असा निर्णय घेताना अॅथलेटिक्स (पॅरा अॅथलेटिक्ससह) आणि जलतरण (पॅरा जलतरणसह) हे दोन खेळ अनिवार्य असल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या दोन खेळांना यजमान देशांना हात लावता येत नाही. यानंतरही राष्ट्रकुल महासंघाने आपल्या घटनेतील कलम ६ मध्ये नमूद केल्यानुसार खेळ वगळण्यासाठी काही निकष लागू केले आहेत. त्याला अनुसरूनच खेळांना वगळण्याबाबत निर्णय घेतला जातो. यामध्ये खेळाच्या आयोजनाचा आवाका आणि त्यासाठी येणारा खर्च यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

हेही वाचा >>> रशियामध्ये पंतप्रधान मोदींना देण्यात आलेले चक-चक आणि कोरोवाई हे पारंपरिक पदार्थ काय आहेत? त्यांचे महत्त्व काय?

क्रिकेट, हॉकी, कुस्तीला का वगळले?

यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे या खेळांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि त्यासाठी येणारा खर्च हे आहे. राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगो येथे केवळ चार केंद्रांवर पार पडणार आहे. या चारही केंद्रांपैकी एकाही केंद्रावर क्रिकेट आणि हॉकी खेळासाठी पायाभूत सुविधा म्हणजे आवश्यक अटींनुसार मैदान उपलब्ध नाही. केवळ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी या दोन खेळांची मैदाने उभे करण्याची आर्थिक क्षमता ग्लासगो शहराने दाखवली नाही. या दोन खेळांच्या मैदानावर सर्वाधिक खर्च होऊ शकला असता हा विचार करून हे खेळ वगळण्यात आले. कुस्ती आणि अन्य वगळलेल्या खेळांबाबत विचार करायचा झाल्यास यजमान देशाने आपल्या या खेळातील क्रीडा क्षमतेचा अधिकार वापरला असे म्हणता येईल. या अन्य खेळात स्कॉटलंडचे फारसे खेळाडू उपलब्ध नाहीत किंवा या खेळांचा देशात फारसा प्रसार झालेला नाही. यामुळे त्यांनी या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला असावा.

भारताच्या कामगिरीवर काय परिणाम?

हॉकी, बॅडमिंटन, नेमबाजी आणि कुस्ती यांसारख्या खेळांमध्ये भारताने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. नेमबाजीची अनुपस्थिती विशेषतः हानिकारक आहे. कारण भारताने या खेळात ६३ सुवर्णांसह १३५ पदके मिळवली आहेत. अर्थात, मागील बर्मिंगहॅम स्पर्धेतूनही या खेळाला वगळण्यात आले होते हे येथे विसरता येणार नाही. विविध श्रेणींमध्ये एकूण ११४ पदकांसह कुस्तीनेही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अखेरच्या स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नसतानाही भारताने ६१ पदकांची कमाई केली होती हेदेखील येथे महत्त्वाचे आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आकर्षण घटले?

अनेक देश वाढत्या खर्चामुळे आपले संघ या स्पर्धेसाठी पाठवत नाहीत. त्यामुळे स्पर्धकांची संख्या कमी होते. पण, छोट्या देशांना एक हक्काची स्पर्धा यानिमित्ताने निर्माण होते. आशियाई आणि ऑलिम्पिकसारख्या महत्त्वांच्या स्पर्धेत कामगिरी उंचावण्यासाठी सराव आणि विजयमंचावर आल्यामुळे आपणही जिंकू शकतो हा आत्मविश्वास हा सर्वांत महत्त्वाचा ठरतो. एकूणच आंतरराष्ट्रीय स्पर्धा अनुभव मिळण्यासाठी ही स्पर्धा छोट्या देशांना प्रेरक ठरू शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis 9 sports dropped from glasgow 2026 commonwealth games print exp zws