भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा करार पुढील महिन्यात (जून) होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या पदासाठी रीतसर अर्ज मागवणार आहे. द्रविड यांना प्रशिक्षकपदी कायम राहायचे असल्यास त्यांना अर्ज करावा लागणार आहे. मात्र, द्रविड पुन्हा ही जबाबदारी स्वीकारतात का, किंवा नव्या प्रशिक्षकाची निवड करण्याचा निर्णय झाल्यास दावेदार कोण असतील, याचा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द्रविड यांच्या कार्यकाळात कामगिरी कशी?

माजी कर्णधार असलेल्या द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. रवी शास्त्री यांच्याकडून २०२१मध्ये भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणारे द्रविड यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात ‘आयसीसी’ची स्पर्धा मात्र जिंकता आलेली नाही. भारतीय संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये घरच्या आणि परदेशातील मालिकांत यशस्वी कामगिरी केली. जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मात्र, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला सातत्याने पराभूत केले. सध्याच्या ‘आयसीसी’ क्रमवारीत भारतीय संघ एकदिवसीय व ट्वेन्टी-२० प्रारूपात अग्रस्थानी, तर कसोटीत दुसऱ्या स्थानावर आहे. आता भारतीय संघ जूनमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे. भारत यावेळी जेतेपद पटकावेल का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

हेही वाचा >>> विश्लेषण : रशियाची युक्रेनविरुद्ध नवी आघाडी… उत्तरेतील खार्किव्ह शहर वाचवणे युक्रेनसाठी आव्हानात्मक?

द्रविड कायम राहण्याची कितपत शक्यता?

द्रविड यांचा करार भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंतच होता. मात्र, त्यानंतर ‘बीसीसीआय’कडून त्यांना जूनमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत कसोटी आणि ट्वेन्टी-२० मालिका बरोबरीत सोडवल्या. तसेच एकदिवसीय मालिका जिंकली. अफगाणिस्तानविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिकेत यश मिळवल्यानंतर कसोटीत इंग्लंडला भारताने धूळ चारली. ‘बीसीसीआय’ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर नवीन प्रशिक्षकासाठी अर्ज मागवणार आहे. मुख्य प्रशिक्षक निश्चित झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुन फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक निवडण्यात येतील. ‘‘आम्ही भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी येत्या काही दिवसांत नव्याने अर्ज मागवणार आहोत. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ आता संपुष्टात येणार आहे. त्यांना प्रशिक्षकपदी कायम राहायचे असल्याने पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. नव्या प्रशिक्षकांची निवड ही तीन वर्षांच्या कालावधीसाठी असेल,’’ असे शहा यांनी सांगितले. तसेच मर्यादित षटकांचे संघ आणि कसोटी संघासाठी वेगवेगळे प्रशिक्षक नेमण्याचा भारतीय क्रिकेटचा इतिहास नाही. त्यामुळे या वेळीही क्रिकेटच्या सर्व प्रारूपांसाठी एकच प्रशिक्षक नेमला जाण्याची शक्यता असली, तरी अंतिम निर्णय क्रिकेट सल्लागार समितीचा (सीएसी) असेल, असे शहा म्हणाले.

प्रशिक्षकपदासाठी कोण शर्यतीत?

द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने सध्या अनेक नावे समोर येत आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे नाव आघाडीवर आहे. द्रविड यांच्या अनुपस्थितीत लक्ष्मण यांनी यापूर्वी भारताचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. २०२२मध्ये झिम्बाब्वेविरुद्धची मालिका लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ३-० अशी जिंकली. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या संघासोबतही लक्ष्मण होते. आयर्लंड दौऱ्यातही त्यांच्या मार्गदर्शनात संघाने चमकदार कामगिरी केली. आशीष नेहराचे नावही सध्या चर्चेत आहे. ‘आयपीएल’मधील गुजरात टायटन्स संघाचा प्रशिक्षक असलेल्या नेहराने या संघाला २०२२ मध्ये जेतेपद व २०२३ मध्ये उपविजेतेपद मिळवून दिले. गुजरातने पहिल्या दोन हंगामात त्याच्या मार्गदर्शनाखाली २३ सामने जिंकले आहेत. यासह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचाही विचार केला जाऊ शकेल. पॉन्टिंगला प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. २०१४ ते २०१६ दरम्यान त्याने मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद भूषवले होते. २०१५मध्ये संघाने जेतेपद मिळवले. यासह दिल्ली कॅपिटल्स संघासोबत तो २०१८पासून आहे. द्रविड प्रशिक्षक होण्यापूर्वी पॉन्टिंगलाही प्रशिक्षकपदाबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्याने त्यावेळी नकार दिला असल्याचे समजते.

हेही वाचा >>> विश्लेषण : पोलिसांच्या आक्रमक कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला धक्का?

आगामी काळात कोणती आव्हाने?

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ जुलै महिन्यात झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशचा संघ भारताचा दौरा करेल. यानंतर न्यूझीलंड संघ भारतात येणार आहे. पुढे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याच दौऱ्यामध्ये नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाचा कस लागेल. २०२५मध्ये भारतीय संघ जानेवारी-फेब्रुवारीत इंग्लंडविरुद्ध ट्वेन्टी-२० व एकदिवसीय मालिका खेळेल. तर, फेब्रुवारी-मार्चदरम्यान चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. जून व ऑगस्ट २०२५मध्ये भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करेल. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय, ट्वेन्टी-२०, वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेन्टी-२० व एकदिवसीय मालिकाही भारतीय संघ खेळणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis about coach contenders of the indian cricket team print exp zws