उत्तराखंड, हिमाचल, पश्चिम बंगाल, पंजाबमध्ये ‘इंडिया’ आघाडीची सरशी झाली.

हृषिकेश देशपांडे

अनेक वेळा पोटनिवडणुकांचे निकाल राजकीय दिशा स्पष्ट करतात. यातून राजकीय पक्षांना धोरण ठरविता येते, प्रसंगी बदल करावा लागतो. सात राज्यांत तेरा जागांवरील पोटनिवडणुकीत भाजपला केवळ दोनच ठिकाणी यश मिळाले. तर काँग्रेस व तृणमूल काँग्रेसला प्रत्येक चार जागा मिळाल्या. या निकालातून भाजपला फटका बसल्याचे स्पष्ट झाले.

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
maharashtra assembly election 2024 amol kolhe allegations bjp for online cash payment to voters
भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप
Resolution to grant special status to Jammu and Kashmir approved
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर; विधानसभेत जोरदार खडाजंगी

पश्चिम बंगालमध्ये ममता

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपची पीछेहाट झाली. राज्यातील लोकसभेच्या ४२ जागांपैकी भाजपला केवळ १२ जागा जिंकता आल्या. गेल्या वेळच्या तुलनेत भाजपच्या सहा जागा घटल्या. तर तृणमूल काँग्रेसच्या सात जागा वाढून त्यांनी २९ जागा पटकावल्या. लोकसभा निवडणूक निकालाच्या महिनाभरानंतर विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षाने चारही जागा जिंकत भाजपला धक्का दिला. विशेष म्हणजे यातील तीन जागा भाजपकडे होत्या. मात्र तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रभाव कायम असल्याचे दिसले. पन्नास हजारांपेक्षा अधिक मतांनी सत्तारूढ तृणमूलने या चारही जागा जिंकल्या. यावरून पक्षाची लोकप्रियता लक्षात येते. कोलकाता शहरातील जागा राखण्याबरोबरच उर्वरित तीनही जागा तृणमूलने खेचून आणल्या. मुस्लिमांबरोबरच दलित समाजातून तृणमूल काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान झाले. हे निकाल पाहता पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी स्थिती बिकट असल्याचे चित्र पुढे आले.

हेही वाचा >>> ‘सरकारकडून हेरगिरी!’ काँग्रेस नेत्याचा आरोप; ॲपल कंपनीने पाठवलेल्या इमेलमध्ये काय म्हटलंय?

हिमाचल सरकार स्थिर

पश्चिम बंगालपाठोपाठ भाजपला हिमाचल प्रदेशात फटका बसला. देशात काँग्रेसची हिमाचल प्रदेश, तेलंगण तसेच कर्नाटक या तीनच राज्यांत सरकारे आहेत. हिमाचलमधील सुखविंदर सुख्खू यांचे सरकार फेब्रुवारीत राज्यसभा निवडणुकीत सहा काँग्रेस आमदारांनी भाजप उमेदवारांना मतदान केल्यानंतर धोक्यात आले होते. त्यानंतर काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र ठरविण्यात आले. पुढे पोटनिवडणुकीत सहापैकी चार जागा काँग्रेसने जिंकल्या. तर आता तीन अपक्षांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील दोन जागा काँग्रेसने तर एक भाजपला मिळाली. या निकालाने ६८ सदस्य असलेल्या हिमाचल विधानसभेत सुख्खू सरकार स्थिर झाले आहे. यातून सुख्खू यांनी पक्षांतर्गत विरोधकांवरही मात केली. सुख्खू यांच्या पत्नी विधानसभेत विजयी झाल्या. आता हिमाचल प्रदेशच्या इतिहासात पहिल्यांदाच एकही अपक्ष आमदार विधानसभेत नसेल.

उत्तराखंडमध्ये काँग्रेसला आधार

उत्तराखंडमध्ये गेले दशकभर भाजपचे प्राबल्य आहे. मात्र पोटनिवडणुकीत काँग्रेसने दोन्ही जागा जिंकत भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. यातील एक जागा काँग्रेसची तर एक बहुजन समाज पक्षाची होती. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी भाजपचा यात तोटा नसला तरी, बद्रीनाथ जागा गमावणे भाजपसाठी चिंतेचे आहे. अयोध्येत भाजपचा समाजवादी पक्षाने पराभव केल्यानंतर देशभर त्याची चर्चा झाली. आता धार्मिक महत्त्व असलेल्या बद्रीनाथ येथील जागा काँग्रेसने राखणे याचा संदेश देशभर जाईल. राज्य सरकारने येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याचा दावा केल्याने भाजपला येथे यश अपेक्षित होते. मात्र काँग्रेसने धक्का दिला. लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील पाचही जागांवर यश मिळवले होते. तर दुसरी जागा बसपकडून काँग्रसने खेचून आणली. मंगलौर मतदारसंघात बहुजन समाज पक्षाची पूर्वापार ताकद आहे. मात्र पोटनिवडणुकीत त्यांचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. या निकालाने उत्तराखंडमध्ये काँग्रेसला आधार मिळाला आहे.

हेही वाचा >>> ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला… आतापर्यंत चार अमेरिकी अध्यक्षांच्या हत्या; तिघांच्या हत्येचा प्रयत्न!

पंजाबमध्ये मान यांना दिलासा

जालंधर पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवणे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासाठी महत्त्वाचे होते. येथे पक्षाला अपयश आले असते तर राज्य सरकारच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. लोकसभा निवडणुकीत सत्तारूढ आम आदमी पक्षाला केवळ राज्यातील १३ पैकी तीन जागा जिंकता आल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकीतील प्रचारात मान यांनी लक्ष घातले होते. येथील पक्षाचा आमदार भाजपमध्ये गेला होता. मात्र मान यांनी येथे निवडणूक काळात भाड्याने घर घेऊन वास्तव्य केले. यावरून आपसाठी ही जागा किती महत्त्वाची होती हे स्पष्ट होते. येथून आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळाल्याने पंजाब राज्य हा भाजपसाठी कठीण पेपर असल्याचे पुन्हा सिद्ध झाले त्याच बरोबर मुख्यमंत्री मान यांना दिलासा देणारा हा विजय ठरला.

कमलनाथ यांना धक्का

देशभरात पोटनिवडणुकीत काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळत असताना मध्य प्रदेशात मात्र पक्षाची कामगिरी खालावत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २९ पैकी एकही जागा जिंकता आली नाही. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या छिंदवाडा लोकसभा मतदारसंघात हा अमरवरा मतदार संघ येतो. येथील काँग्रेस आमदाराने भाजपमध्ये प्रवेश करत पुन्हा निवडणूक लढवली. त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा केवळ तीन हजार मतांनी पराभव केला. गेल्या वेळी हीच जागा त्यांनी २५ हजारांनी जिंकली होती. मताधिक्य जरी कमी असले तरी, कमलनाथ यांना भाजपला येथे रोखता आले नाही. कमलनाथ यांच्या पुत्राला लोकसभा निवडणुकीत छिंदवाडा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता. पाठोपाठ आता त्यांचा जुना सहकारी भाजपमधून निवडून आला आहे.

बिहारमध्ये अपक्षाची सरशी

बिहारमधील रुपौली मतदारसंघात अपक्ष शंकरसिंह यांनी संयुक्त जनता दल तसेच राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांना धक्का देत यश मिळवले. राष्ट्रीय जनता दल तिसऱ्या क्रमांकावर राहिला. शंकरसिंह हे चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षात होते. ते रजपूत समाजातून येतात. या मतदारसंघात इतर मागासवर्गीय मतांची विभागणी जनता दल तसेच राष्ट्रीय जनता दलामध्ये झाल्याचा फायदा शंकरसिंह यांना झाला. ही जागा पूर्वी जनता दलाकडे होती. या निकालाने राज्यातील प्रमुख पक्षांना धक्का बसला आहे. तमिळनाडूतील जागा अपेक्षेप्रमाणे द्रमुकने राखली. तेथील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकने विक्रवंडी मतदारसंघातील पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे द्रमुकला ही निवडणूक जड जाणार नाही हे स्पष्टच होते. भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पीएमकेने ही जागा लढवली. मात्र द्रमुकने राज्यात विविध जात समूह तसेच अल्पसंख्याकांना बरोबर घेत भक्कम सामाजिक समीकरण तयार केले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी विरोधकांकडे तसे समीकरण नाही किंवा कोणत्याही मोठ्या जात समूहाचा आधार नाही. शिवाय अण्णा द्रमुक भाजपपासून स्वतंत्र असल्याने विरोधी मतांचे विभाजन होते. यातून तमिळनाडूत सत्तारूढ द्रमुकसाठी मार्ग सुलभ असल्याचेच तूर्तास चित्र आहे.

hrishikesh.deshpande@expressindia.com