हृषिकेश देशपांडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन महिन्यांत पाच वेळा दक्षिणेतील राज्यांचे दौरे केले. १३० जागांपैकी किमान ४५ ते ५० जागा जिंकून राष्ट्रीय लोकशाही आघाडी वगळून भाजपच्या ३७० जागांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
thane city BJP president JP Nadda, walk out of the Gurdwara
Video : …आणि गुरुद्वारातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना काढता पाय घ्यावा लागला
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Former BJP MP from Dindori Constituency Harishchandra Chavan passed away
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह चारशे जागांचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी विविध राज्यांमध्ये नवे मित्रपक्ष जोडणे किंवा जुन्यांना पुन्हा आघाडीत घेण्यावर भर दिला जातोय. दक्षिणेतील लोकसभेच्या १३० जागांवर भाजप कमकुवत असून, तेथेच लक्ष केंद्रित करण्यात आले. गेल्या म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीत दक्षिणेत भाजपला केवळ २९ जागा जिंकता आल्या. त्यात कर्नाटकमधील २५ तर तेलंगणमधील चार जागांचा समावेश आहे. उत्तर तसेच पश्चिमेतील राज्यांमध्ये गेल्याच वेळी जवळपास ९० टक्के जागा भाजपने जिंकल्याने तेथे आणखी यशाची शक्यताच नाही. यामुळेच चारशेपारसाठी भाजपची मदार दक्षिणेवरच एकवटलीय.

हेही वाचा >>> भारताने EFTA सह व्यापार करारावर केली स्वाक्षरी; कसा फायदा मिळणार? जाणून घ्या

आंध्रमध्ये जुने मित्र आघाडीत

आंध्र प्रदेशात भाजपचे नाममात्र अस्तित्व असून, गेल्या वेळी  लोकसभा निवडणुकीत जेमतेम एक टक्का मते मिळाली. येथील लोकसभेच्या २५ जागांवर सत्तारूढ वायएसआर काँग्रेस तसेच तेलुगु देसम यांच्यात थेट सामना झाला. मात्र यंदा तेलुगु देसम-भाजप व अभिनेते पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष अशी आघाडी झाली. राज्यात लोकसभेबरोबच विधानसभा निवडणूकही होईल. भाजप लोकसभेच्या चार ते पाच जागा लढवेल अशी शक्यता दिसते. चंद्राबाबूंच्या मदतीने राज्यात ताकद वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. चंद्राबाबू यापूर्वीही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत होते. मात्र नंतर ते बाहेर पडले. गेल्या लोकसभा तसेच विधानसभेतील दारूण पराभवानंतर त्यांनी भाजपशी जुळवून घेतले. विरोधकांच्या इंडिया आाघाडीपासून ते दूर राहिले. केंद्रात भाजप सत्तेत असल्याने फायदा होईल तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मिळतील म्हणून चंद्राबाबू भाजप आघाडीत आले. राज्यात अद्यापही मुख्यमंत्री जगनमोहन  रेड्डी यांचा प्रभाव दिसतो. त्यामुळे चंद्राबाबूंना कितपत यश मिळेल याबाबत शंका आहे. मात्र मित्रपक्षांच्या मदतीने भाजपच्या मतांची टक्केवारी वाढून, विधानसभेत एखादी जागा जिंकतील ही शक्यता दिसते.

तमिळनाडूत मित्रांचा शोध

दक्षिणेत सर्वाधिक ३९ जागा असलेले तमिळनाडू हे राज्य भाजपला खाते उघडण्यासाठी आव्हानात्मक आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी सातत्याने राज्यातील द्रमुक सरकारविरोधात संघर्ष केला. यंदाही द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडी भक्कम वाटते. मात्र भाजपने हिंदुत्व तसेच विकासाच्या मुद्द्यावर राज्यात प्रमुख विरोधी पक्षाचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू ठेवलाय. अण्णा द्रमुक हा प्रमुख विरोधी पक्ष असला तरी जयललितांच्या पश्चात वलयांकित नेतृत्वाचा अभाव तसेच फुटीने पक्षाच्या चांगल्या कामगिरीबाबत साशंकता आहे. भाजपला राज्यात तमिळ मनिला काँग्रेसच्या रूपाने आघाडीतील भागीदार मिळाला. मात्र एस. रामदोस यांच्या पट्टली मक्कल काचीने (पीएमके) अण्णा द्रमुक की भाजपबरोबर जायचे याचा निर्णय अद्याप जाहीर केला नाही. गेल्या लोकसभेला ३८ जागा द्रमुक आघाडीने जिंकल्या होत्या, तर अण्णा द्रमुकला एक जागा मिळाली. आता अण्णा द्रमुकने भाजपशी युती तोडली. भाजपने अण्णा द्रमुकमधील बंडखोर गटाचे ओ. पन्नीरसेल्वम तसेच टीटीव्ही दिनकरन यांच्याशी आघाडीचे प्रयत्न चालवले आहेत. अण्णा द्रमुकचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांनी भाजपशी पुन्हा आघाडीची शक्यता फेटाळून लावली. पंतप्रधानांचा तमिळनाडू दौरा लवकरच होत आहे. त्या वेळी व्यासपीठावर पन्नीरसेल्वम तसेच दिनकरन यांना स्थान देऊन भाजप आघाडीला औपचारिक स्वरूप देण्याची शक्यता आहे. या दोघांना चार ते पाच जागा दिल्या जातील. भाजप यंदा राज्यात लोकसभेला खाते उघडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीनेच पंतप्रधानांच्या सततच्या दौऱ्यांकडे बघितले जात आहे. 

हेही वाचा >>> ऑस्करचं बारसं झालं तरी कसं?

ओडिशात आघाडी नाही?

ओडिशात बिजु जनता दलाचे (बिजद) सरकार गेल्या २४ वर्षांपासून आहे. सुरुवातीला त्यांची भाजपशी आघाडी होती. आता केंद्रात जरी बिजद-भाजप यांच्यात युती नसली तरी त्यांच्यात कटुता नाही. ओडिशाचे मुख्यमंत्री व पक्षाचे सर्वेसर्वा नवीन पटनायक यांचे भाजप नेतृत्वाशी सौहार्दाचे संबंध आहेत. राज्यात बिजद-भाजप हेच प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे या दोन पक्षांची युती झाली तर विधानसभा निवडणूक तसेच लोकसभेच्या २१ जागांवरील चुरस राहणार नाही. राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होते. विधानसभेच्या १४७ जागांपैकी बिजद १०० जागा लढवण्यावर ठाम राहिला. भाजपला हे मान्य नसल्याने आघाडी आकारास आली नाही. याखेरीज लोकसभेच्या भुवनेश्वर तसेच पुरीच्या जागेवरही वाद होता. आता दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतील अशीच शक्यता आहे. गेल्या वेळी बिजु जनता दलाला १२ तर भाजपला लोकसभेच्या ८ जागा मिळाल्या. विधानसभेला बिजदला फारसे आव्हान नाही. 

पंजाबमध्ये प्रतीक्षा

पंजाबमध्ये सत्तारूढ आम आदमी पक्ष तसेच काँग्रेस हे विरोधकांच्या आघाडीतील पक्ष स्वतंत्र लढत आहेत. लोकसभेसाठी आव्हान राखायचे असेल तर भाजप-अकाली दलाला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. हे दोन्ही पक्ष अनेक वर्षे एकत्र होते, कृषी कायद्यावरून सप्टेंबर २०२० मध्ये अकाली दल भाजपपासून वेगळा झाला. अकाली दलाचे दिवंगत नेते प्रकाशसिंग बादल यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त बादल येथे आयोजित कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड उपस्थित होते. त्यावरून पुन्हा आघाडीचा कयास लावला जात आहे. गेल्या वेळी राज्यातील १३ पैकी १० जागांवर अकाली दल तर भाजपने तीन जागांवर निवडणूक लढवली. युती झालीच तर यंदा ही संख्या अकाली दल ८ तर भाजप ५ अशी असण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या सीमेवर पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने युतीची घोषणा करण्यात अकाली दलाची अडचण आहे. कारण अशा वेळी ग्रामीण भागात भाजपशी आघाडीचे समर्थन कसे करणार, हा मुद्दा आहे. दोन पक्ष राज्यात वेगळे लढले तर त्यांना एखादी जागा जिंकणेही आव्हानात्मक ठरेल. यामुळे एकीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीत फूट पडली असताना भाजप नवे मित्रपक्ष जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

hrishikesh.deshpande@expressindia.com