हृषिकेश देशपांडे
पंकजांचे राजकारण जरी बीड जिल्ह्याभोवती केंद्रित असले तरी, राज्यभर त्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे गेली काही वर्षे सातत्याने त्यांच्या वक्तव्यांनी चर्चेत आहेत. विधानपरिषद किंवा राज्यसभा निवडणुकीत संभाव्य उमेदवारी यादीत पंकजांचे नाव घेतले जायचे. प्रत्यक्षात उमेदवार जाहीर झाल्यावर मात्र त्यांना स्थान नसायचे. यातून पंकजा या नाराज असल्याची चर्चा व्हायची. पंकजांच्या काही वक्तव्यांनी त्यात भरच पडायची. अखेरीस २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना मराठवाड्यातील बीड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. तिथेही पंकजांच्या भगिनी व खासदार प्रितम यांच्या जागी ही संधी मिळाली.
विधानसभेला पराभवाचा धक्का
कलियुगात पाच वर्षे वनवास हा प्रदीर्घ कालावधी आहे असे पंकजांनी नुकतेच स्पष्ट केले होते. त्यांचे चुलत बंधू व राज्यातील मंत्री धनंजय यांच्याकडून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा पराभूत झाल्या. त्यानंतर सातत्याने राजकारणात काहीशा मागे पडल्या. कारण परळीमधूनच २००९ व २०१४ मध्ये त्यांना यश मिळाले होते. फडणवीस सरकारमध्ये २०१४ ते २०१९ या कालावधी त्या मंत्रीही होत्या. विधानसभेला धक्का बसल्यानंतर स्थानिक निवडणुकांतही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. यातून परळीत धनंजय यांची सरशी होत असल्याचा एक संदेश गेला. मंत्रिमंडळात असताना ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ अशा वक्तव्यांनी त्या चर्चेत होत्या. पुण्यात २०१५ मध्ये त्यांनी हे वक्तव्य केले होते. सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली होती. त्यावेळी बीड जिल्ह्यात स्वागतासाठीच्या फलकांवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख समर्थकांनी केला होता. पंकजांचे वडील गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपचा विस्तार केला. उत्तम संघटन कौशल्य त्यांच्या ठायी होते. पंकजांनाही राज्यभर मानणारे कार्यकर्ते आहेत. ही त्यांची ताकद ओळखून भाजपने त्यांना फार काळ नाराज ठेवून चालणार हे ओळखले.
हेही वाचा >>> विश्लेषण : निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांचे सर्वांत मोठे देणगीदार कोण?
राज्यभर कार्यकर्त्यांची फळी
पंकजांचे राजकारण जरी बीड जिल्ह्याभोवती केंद्रित असले तरी, राज्यभर त्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. वंजारी समाजाबरोबरच विविध समाजघटक भाजपशी जोडण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. यातील अनेक जण आजही पंकजांचे नेतृत्व मानतात. अगदी मुंबईतील उदाहरण घ्यायचे तर टॅक्सी चालकांच्या संघटनेत मुंडे यांना मानणारे अनेक जण आहेत. समाजमाध्यमातही त्यांना मानणारे अनेक जण सक्रिय आहेत. पंकजा यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर संधी मिळाली नाही तेव्हा त्याची प्रतिक्रिया उमटली होती. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे भाजपला या नाराजीची दखल घ्यावीच लागली. इतर मागासवर्गीय समाजातील मोठी मतपेढी भाजपबरोबर आहे. त्यांना दुखावल्यास निवडणुकीत किंमत मोजावी लागेल हे भाजप श्रेष्ठी जाणून आहेत. पंकजांना राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटनेत महत्त्वाची अशी चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. मध्य प्रदेशचे सहप्रभारीपदही देण्यात आले. पक्षसंघटनेत दिल्लीत जबाबदारी मिळाली तरी, राज्याच्या राजकारणाकडे त्यांचे जास्त लक्ष राहिले. राज्यात आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांनी व्यक्त केली होती. माझ्या लोकांसाठी संघर्ष करेन, मैदान सोडणार असे जाहीर करत इशाराही दिला होता. दसरा मेळाव्यातील त्यांची भाषणे गाजली होती. त्यावरून पंकजांचे पुढचे पाऊल काय असेल, याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र पक्ष सर्वस्व आहे अशी पुष्टी जोडत पक्षांतराच्या वावड्यांना पूर्णविराम दिला होता. तरीही त्यांच्या मनात खदखद आहे या अंदाज होता. अखेर पक्षाने लोकसभेला त्यांना संधी देत ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>> विश्लेषण : निवडणूक रोख्यांचा भाजप सर्वांत मोठा लाभार्थी.. तृणमूल दुसऱ्या क्रमांकावर, दक्षिणेकडील पक्षही ‘तेजी’त…
बीडच्या मैदानावर आव्हान कितपत?
गेल्या वेळी म्हणजेच २०१९ मध्ये ५० टक्क्यांहून अधिक मते घेत प्रितम मुंडे विजयी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांचा त्यांनी पराभव केला होता. तर २०१४ मध्ये प्रितम यांना ७० टक्के मते मिळाली होती. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर मंत्री धनंजय मुंडे बरोबर असल्याने मताधिक्य वाढेल असा विश्वास पंकजांना आहे. जिल्ह्यात बहुतेक वेळा मराठा विरुद्ध वंजारी अशी पारंपरिक लढत होते. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गट लढवेल अशी अपेक्षा असून, इतर मागासवर्गीय समाजातील उमेदवार दिल्यास चुरस वाढेल असा अंदाज आहे. कारण मराठा समाजातील मोठ्या प्रमाणात मते महाविकास आघाडीला जातात असा अनुभव आहे. वंचित बहुजन आघाडी काय करणार, हा एक मुद्दा आहेच. त्यांनी स्वतंत्र लढून एखादा तगडा उमेदवार दिल्यास मग ही लढत रंगतदार होईल. तूर्त तरी मोदींच्या नावावर मिळणारी मते तसेच भाजप व धनंजय मुंडे यांची ताकद व पंकजा यांना मानणारा वर्ग पाहता भाजप या लढतीत पुढे दिसतो.
hrishikesh.deshpande@expressindia.com