विस्तारवादी आणि आक्रमक धोरणे राबवत दरारा निर्माण करण्याची व्यूहरचना चीनने आखलेली दिसते. विशेषतः अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली चीनने भारताशी लडाख, अरुणाचल सीमेवरून आणि दक्षिण चीन समुद्रात तैवान, फिलिपिन्स, जपान, मलेशिया या देशांशी सागरी सीमा आणि मासेमारी व विशेष आर्थिक विभागावरून जुने वाद उकरत युद्धजन्य परिस्थिती निर्माण केलेली दिसते. यात अमेरिकाही ओढली गेल्यामुळे आणि चीनने रशियाशी दोस्तीच्या नव्या आणाभाका घेतल्यामुळे जगभर अस्थैर्य आणि भीती पसरली आहे. हे करताना चीनने ‘ग्रे झोन ॲग्रेशन’ या तंत्राचा खुबीने वापर केलेला दिसून येतो. काय आहे हे तंत्र?
तैवानच्या विरोधात ग्रे झोन ॲग्रेशन?
तैवानचे नवनिर्वाचित अध्यक्ष लाय चिंग-दे यांनी गेल्या आठवड्यात सत्ताग्रहण सोहळ्यात केलेल्या भाषणामुळे चिनी नेतृत्व बिथरले. तैवानने लोकशाहीची भाषा केल्यामुळे आणि स्वातंत्र्य अधोरेखित केल्यामुळे ‘शिक्षा’ म्हणून तैवानच्या भोवताली चीनने दोन दिवस लष्करी, हवाई आणि नाविक युद्ध कवायती केल्या. यापूर्वी ऑगस्ट २०२२ आणि एप्रिल २०२३मध्येही तैवानल्या घेरणाऱ्या भीतिदायक कवायती चीनने केल्या होत्या. हेच ते ग्रे झोन आक्रमण. यात प्रत्यक्ष आक्रमण नसते, पण आक्रमणाची सिद्धता मात्र असते. थोडक्यात हा एक प्रकारे हूल देण्याचाच प्रकार असतो. अर्थात ही खूपच खर्चिक हूल असते आणि ती चीनसारख्या आक्रमक आणि श्रीमंत देशालाच परवडू शकते! यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तयारी जय्यत असल्यामुळे चुकून पलीकडच्या देशाकडून (म्हणजे या ठिकाणी तैवानकडून) थोडी जरी चिथावणी मिळाली, तरी संपूर्ण शक्तीनिशी प्रत्युत्तर द्यायला आक्रमक देश (म्हणजे या ठिकाणी चीन) मोकळा असतो. अशा प्रसंगी धीर आणि विवेक शाबूत ठेवून पीडित देशाला वाटचाल करावी लागते.
हेही वाचा >>> विश्लेषण: राज्य आहे, पण राजधानीच नाही! आंध्र प्रदेशवर २ जूनपासून ही वेळ का येणार?
जपान आणि फिलिपिन्सविरोधातही?
तैवानच्या उत्तरेकडे जपानच्या मालकीच्या सेन्काकू बेटांभोवतालीदेखील चीनचा आक्रमक संचार असतो. सेन्काकू बेटांवर चीन गेली काही वर्षे स्वामित्व सांगत आहे. चीन या बेटांना दियाओयू असे संबोधतो. २७ एप्रिल रोजी जपानी संशोधक आणि पार्लमेंट सदस्यांना घेऊन सेन्काकूकडे निघालेल्या एका बोटीचा चीनच्या तटरक्षक दलाच्या बोटींनी पाठलाग केला. ते पाहून जपानी पाहुण्यांना जपानी तटरक्षक दलाने सेन्काकू बेटावर उतरूच दिले नाही. फिलिपिन्सच्या सागरी हद्दीमध्ये प्रामुख्याने चिनी तटरक्षक दल आणि चीन समर्थित चाचे मंडळी फिलिपिनो नौकांना बेजार करतात. अनेकदा पाण्याचे शक्तिशाली फवारे मारून मच्छीमार नौकांचे नुकसान केले जाते. ग्रे झोन युद्धामध्ये थेट काहीच केले जात नाही. किंवा या युद्धात मुख्य सैन्यदले भाग घेत नाहीत. त्यामुळे प्रत्युत्तर देण्यात अडचणी येतात. चिनी लष्करी कारवाई म्हणून प्रत्युत्तर द्यावे तर चीन खरोरच संपूर्ण सामर्थ्यानिशी तुटून पडण्याची भीती आहेच.
अमेरिकेशी संघर्षाची शक्यता किती?
जगातील सर्वांत मोठे नौदल आता चीनकडे आहे. कधी काळी ते अमेरिकेकडे असायचे. हिंद-प्रशांत टापूतील अमेरिकी लढाऊ विमानांच्या समीपही चिनी लढाऊ विमाने अनेकदा जातात. हा धमकीचा पवित्रा असतो. परंतु हजारो वेळा असे घडूनही आजतागायत चीनकडून एकदाही अमेरिकी विमानांच्या वा नौकांच्या दिशेने बंदुकीची गोळी वा क्षेपणास्त्र डागले गेलेले नाही. ग्रे झोन आक्रमणाचा हा महत्त्वाचा पैलू आहे. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत युद्धात खेचायचे नाही, हे पथ्य चिनी पाळतात. तैवान, जपान आणि फिलिपिन्स या तिन्ही देशांशी अमेरिकेने संरक्षण करार केलेले आहेत. पण त्यांना जरब बसावी इतकाच त्रास द्यावा, पण अमेरिकेला हस्तक्षेप करावा लागेल इतपत पीडू नये, असे चीनचे धोरण आहे. अनेक विश्लेषकांच्या मते अशा प्रकारे चीनची अनेक उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. अप्रत्यक्ष युद्धाच्या निमित्ताने चीनचा युद्धसराव सुरू असतो. शिवाय उद्या खरोखरच युद्धाला तोंड फुटले, तर इतर कोणत्याही देशापेक्षा चीन अधिक तयारीत असेल. याशिवाय तैवान, जपान, फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया या देशांच्या सागरी हद्दीच्या आतबाहेर सतत संचार करत राहिल्यामुळे सागरमार्गे होणाऱ्या व्यापारावर नजर आणि नियंत्रणही ठेवता येते.
हेही वाचा >>> २ दिवसात ३५ जण आगीच्या भक्ष्यस्थानी; नियमांकडे दुर्लक्ष होतंय का?
दक्षिण चीन समुद्रातली ‘टेन डॅश लाइन’ काय?
दक्षिण चीन समुद्र मासे आणि खनिज तेलाने समृद्ध आहे. पण या भागात अनेक देश आहेत. त्यांच्या स्वतःच्या सागरी सीमा आहेत, शिवाय मासेमारी आणि व्यापारी मार्गांचे मिळून विशेष आर्थिक विभाग आहेत. या भागात चीनने अनेक कृत्रिम बेटे बांधून त्यांना ‘तळ’ असे संबोधले आहे. जेथे हा तळ आहे, त्या परिसरातले पाणीही आमचे असा चीनचा हेका असतो. टेन डॅश लाइन असा स्वतःचा विस्तीर्ण विशेष आर्थिक विभाग या टाापूमध्ये आरेखित केला आहे. त्याच्या आधारे प्रत्येक देशाशी चीनचे वाद सुरू आहेत.
भारताविरोधातही?
कमीअधिक प्रमाणात हे तंत्र चीन भारताविरोधातही वापरत आहे. लडाख सीमेवर अनेक ठिकाणी निर्मनुष्य आणि निर्लष्करी भागांमध्ये घुसखोरी करणे, तेथील गस्तीबिंदू बदलून नवी गस्तीक्षेत्रे निर्माण करणे आणि निर्मनुष्य टापूस चीनचा भूभाग म्हणून जाहीर करणे असे प्रकार चीनने चालवले आहेत. हाही ग्रे झोन अॅग्रेशनचाच प्रकार मानता येईल. पण भारताने आतापर्यंत तरी चीनच्या घुसखोरीला नियंत्रणात ठेवले आहे.