सागर नरेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अयोध्येतील राम मंदिराची उभारणी होताच संपूर्ण देशभरात भाजप आणि त्यांचे सहयोगी पक्ष आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करू लागले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये विकासाच्या जोडीला धर्माच्या मुद्द्यावरही अधिक भर दिला जाण्याची शक्यता त्यामुळे स्पष्टपणे दिसू लागली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांपासून हिंदुत्वाच्या दिशेने प्रचाराची दिशा स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. सण, उत्सवांवरील बंधने आपल्या सरकारने हटवली असे ते जागोजागी सांगत असतात. हे करत असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अगदी ठरवून हिंदुत्वाचा ‘अजेंडा’ अधिक बळकट करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन त्यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी सुरू केले आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने विविध कार्यक्रम, प्रकल्प हाती घेतले जात आहेत. वेगवेगळ्या जाती, भाषा आणि समाजांना जोडून घेण्यासाठी एकामागोमाग एक होणारे हे कार्यक्रम सध्या येथील राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मलंगगडाच्या पायथ्याशी भरविण्यात आलेला कीर्तन महोत्सव, तेथून देण्यात आलेली मलंगमुक्तीची हाक, याच भागात भरविण्यात आलेला तिरुपती बालाजी लग्न सोहळा, राम मंदिर लोकार्पणाच्या निमित्ताने ठाण्यासह संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये भाजपपेक्षाही मुख्यमंत्री समर्थकांचा दिसून आलेला प्रभाव लक्षवेधी ठरला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : दरडोई घरगुती खर्च किती वाढतो आहे?

मलंगमुक्ती ते वारकरी एकजुटीसाठी प्रयत्न कसे?

कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन ते तीन दशकांपासून श्रीमलंग आणि हाजी मलंग हा वर्चस्ववाद सुरू आहे. मलंगगडावर असलेल्या हिंदू आणि मुस्लीम धर्माच्या प्रार्थनास्थळांबाबत विविध दावे केले जातात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे यांनी ‘हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट’ असा नारा देत मलंगगडाला चर्चेच्या ठिकाणी आणले. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मलंगगडाच्या पायथ्याशी काही दिवसांपूर्वी राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव आयोजित करून वारकरी आणि कीर्तनकारांची एकजूट घडवून दिली. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगगडाच्या पायथ्याशी आले आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणारच अशी घोषणा केली. त्यानंतर पुन्हा वातावरण ढवळून निघाले. वारकऱ्यांच्या उपस्थितीत गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी केलेले भाष्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरले. मलंगगड यात्रा, मलंगगडाच्या पायथ्याशी पार पडलेली धर्मसभा यामध्येही शिंदे पितापुत्रांचे योगदान असल्याची चर्चा होती.

आगरी, कोळी समाज ते विविध संप्रदायांवर लक्ष कसे?

कल्याण लोकसभा मतदारसंघात आगरी, कोळी समाजाची मोठी संख्या आहे. दिवा, कल्याण, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, अंबरनाथ तालुका आणि आसपासच्या परिसरात विविध सामाजिक संस्था, वारकरी संस्था, संघटना आणि विविध राजकीय पक्षात या समाजाच्या बांधवांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथील परंपरा, प्रथा, सण उत्सवांना प्राधान्य देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्न करताना दिसत आहेत. मतदारसंघात आगरी कोळी वारकरी भवनाची अनेक वर्षांची मागणी त्यांनी मार्गी लावली. येथील वै. ह.भ.प. संत सावळाराम महाराज यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या स्मारकाची, कल्याण-शिळ रस्त्याला त्यांचे नाव देण्याची घोषणा खासदार शिंदे यांनी केली. खासदारांच्या या घोषणेला राज्य मंत्रिमंडळानेही मान्यता दिली.

हेही वाचा >>> क्रॉस व्होटिंगमुळे राज्यसभेचे चित्रच बदलले, महाराष्ट्र अन् ‘या’ राज्यांतून भाजपाचे ‘इतके’ उमेदवार आले निवडून

मंदिरांचा जीर्णोद्धार, प्राचीन मंदिरांचे सुशोभीकरणाचाही प्रयोग?

कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू केली आहेत. स्वतःच्या खासदार पुत्राचा मतदारसंघ असल्याने राज्य सरकारचे वेगवेगळे विभाग या भागात हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची आखणी करताना दिसतात. एकीकडे रस्ते, पूल, मेट्रो, उन्नत मार्गांची कामे सुरू असताना दुसरीकडे याच भागात विविध मंदिरांचा पुनर्विकास केला जातो आहे. अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिवमंदिराच्या परिसराचे काशी विश्वनाथच्या धर्तीवर सुशोभीकरण केले जाते आहे. त्यामुळे या परिसराला नवी झळाळी मिळणार असून धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून हे मंदिर नावारूपाला येणार आहे. याचसोबत ठाणे महापालिका क्षेत्रात आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या खिडकाळी या प्राचीन मंदिराचाही परिसर विकसित केला जातो आहे. या दोन्ही मंदिरांमध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. सोबतच मलंगगडाच्या परिसरातही विविध पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारात मुख्यमंत्री स्वत: उपस्थित राहात असतात. या माध्यमातून हिंदुत्वावर भर दिला जात आहे.

श्रीराम उत्सव ते श्रीनिवास कल्याण उत्सवाचे आयोजन वेगळे का?

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले असताना ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडून विशेष कार्यक्रम करण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघात नऊ दिवस श्रीराम उत्सवाचे आयोजन झाले होते. डोंबिवली ही भाजप आणि संघनिष्ठांची उपराजधानी मानली जाते. असे असताना येथे राम मंदिर निर्माण कार्यक्रमाच्या आयोजनात शिवसेनेचा जाणवलेला प्रभाव अनेकांसाठी अचंबित करणारा ठरला. रामायण सादरीकरण, संगीत कार्यक्रम आणि श्री राम मंदिराची भव्य प्रतिकृती याच भागात साकारण्यात आली होती. उत्तर भारतीयांसह हिंदू धर्मीय मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. त्यानंतर नुकताच आता डोंबिवलीत श्री श्रीनिवास कल्याण उत्सव पार पडला. या उत्सवाच्या निमित्ताने तिरुपती बालाजी यांना मानणारा मोठा वर्ग एकत्रित झाला. डोंबिवली शहरात दक्षिण भारतीय बांधवांची मोठी संख्या आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात वारकरी बांधवांची संख्या मोठी होती. हिंदी भाषक, दाक्षिणात्य संस्था आणि सामाजिक संघटनांचाही यात मोठा सहभाग होता. या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदुत्वाची एकजूट करण्याचा डॉ. शिंदे यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis cm eknath shinde campaign towards hindutva issue for lok sabha election print exp zws
First published on: 29-02-2024 at 07:00 IST