महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर उन्हाळयात वाढती विजेची मागणी आणि दुसरीकडे कोळसा पुरवठयावर असलेली मर्यादा यांचा फटका बसतो; तसा यंदाही काही प्रमाणात बसू शकेल..

यंदा कोळसा साठा किती? वीजनिर्मिती किती?

राज्यात महानिर्मिती या शासकीय वीजनिर्मिती कंपनीची स्थापित वीजनिर्मिती क्षमता १३ हजार १५२ मेगावॉट आहे. त्यामध्ये कोळशावर आधारित विजेचा वाटा ९ हजार ५४० मेगावॉट आहे. कंपनीच्या वीजनिर्मिती प्रकल्पातून सध्या रोज साडेसात ते आठ हजार मेगावॉटच्या जवळपास वीजनिर्मिती होत आहे. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठयासाठी महानिर्मितीला सतत सर्वच संचातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करावी लागत आहे. त्यामुळे कोळशाचा वापर वाढला तर दुसरीकडे कोळसा कंपन्यांकडून पुरवठयावर मर्यादा आहे. त्यामुळे सध्या महानिर्मितीच्या विविध केंद्रांत सरासरीने केवळ १५ दिवसांचा कोळसा साठा आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्थिती काय?

महानिर्मितीकडे मागील वर्षी १७ एप्रिल २०२३ रोजी १७ लाख १४ हजार ९३४ मेट्रिक टन (१२ दिवस) कोळसा साठा होता. त्यात कोराडी प्रकल्पातील २३ दिवस, खापरखेडा २२ दिवस, चंद्रपूर प्रकल्पातील १६ दिवसांच्या साठयाचा समावेश होता. परंतु नाशिक व भुसावळमध्ये प्रत्येकी दीड दिवस, पारस दोन दिवस, परळीमध्ये तीन दिवस पुरेल एवढा साठा होता. त्यामुळे चिंतादायक स्थिती होती.

हेही वाचा >>> विश्लेषण : फॉर्म नाही, नेतृत्व नाही तरी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी हार्दिक उपकर्णधार कसा? त्याच्यावरील विश्वास भारतासाठी घातक ठरणार?

त्याउलट, यंदा महानिर्मितीकडे १७ एप्रिल २०२४ रोजी २१ लाख ३० हजार ५४७ मेट्रिक टन कोळसा (१५ दिवस) होता. त्यात चंद्रपूरमध्ये १४ दिवस, कोराडी २५ दिवस, खापरखेडा १० दिवस, नाशिक आठ दिवस, भुसावळ २४ दिवस, पारस १५ दिवस, परळी १५ दिवस पुरेल एवढा साठा होता.

पावसाळयापेक्षा उन्हाळयात किती कोळसा लागतो?

राज्यात पावसाळयात महानिर्मितीला रोज सुमारे ८० हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. परंतु उन्हाळयात एप्रिल-मे महिन्यामध्ये विजेचा वापर सर्वाधिक वाढत असल्याने महानिर्मितीला वीजनिर्मिती वाढवावी लागते. सध्या वीजनिर्मिती वाढल्याने महानिर्मितीला पूर्ण क्षमतेने संच चालवावे लागत आहेत. त्यामुळे रोज १ लाख ३० हजार मेट्रिक टन कोळसा लागतो.

राज्यातील विजेची मागणी किती?

राज्यात सध्या उन्हाच्या तडाख्यामुळे विजेची मागणी २८ ते २९ हजार मेगावॉटच्या जवळपास गेली आहे. त्यातील २४ ते २५ हजार मेगावॉटची मागणी महावितरणची आहे. मुंबईत साडेतीन ते चार हजार मेगावॉट मागणी आहे. ही मागणी राज्यात २५ मार्चला २४ ते २५ हजार मेगावॉटच्या जवळपास होती. त्यातील महावितरणची मागणी २१ हजार ४९४ मेगावॉट तर मुंबईची मागणी तीन हजार मेगावॉटच्या जवळपास असल्याचे वीज कंपन्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> एटीएमचा नवा कार्ड ट्रॅप घोटाळा; कफल्लक व्हायचं नसेल तर हे वाचाच

महानिर्मितीच्या वीजनिर्मितीत वाढ किती?

राज्यात प्रत्येक वर्षी महानिर्मितीची वीजनिर्मिती वाढत असून २०२२-२०२३ मध्ये ५७ हजार ७३४ दशलक्ष युनिट, तर २०२३-२०२४ मध्ये ६१ हजार ४३९ दशलक्ष युनिट निर्मिती झाली. त्यात भुसावळ केंद्रातून ७,५७५.२३५ दशलक्ष युनिट, चंद्रपूर केंद्रातून १६,२७९.६६९ दशलक्ष युनिट, पारस केंद्रातून ३,५९५.९८३ दशलक्ष युनिट, कोराडी केंद्रातून १३,२००.३०१ दशलक्ष युनिट, खापरखेडा केंद्रातून ८,२६७.४०९ दशलक्ष युनिट, नाशिक केंद्रातून २,६४७.३७६ दशलक्ष युनिट, परळीतून ४,१०४.२१६ दशलक्ष युनिट, उरणमधून १,७६९.०३२ दशलक्ष युनिट, जलविद्युत प्रकल्पांतून ३,६६७.८३३ दशलक्ष युनिट, तर सौर ऊर्जा प्रकल्पांमधून ३३२.१०५ दशलक्ष युनिट विजेचाही यात समावेश आहे.

महानिर्मितीचे म्हणणे काय?

महानिर्मितीची गेल्या दोन वर्षांतील वीजनिर्मितीची तुलना केल्यास सातत्याने सर्वाधिक वीजनिर्मितीचा विक्रम नोंदवला जात आहे. महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह प्रशासनाने वेळोवेळी अचूकपणे केलेल्या कोळशाच्या नियोजनानेच ते शक्य झाले आहे. सध्या पूर्ण क्षमतेने वीजनिर्मितीमुळे कोळशाचा दैनंदिन सर्वाधिक वापर होत असतानाच गेल्या काही दिवसांत महानिर्मितीचा कोळसा साठाही वाढला. दरम्यान. सातत्याने विजेची मागणी वाढत असल्याने महानिर्मितीने गरजेनुसार आणखी कोळसाप्राप्तीसाठी नियोजन केले आहे, अशी माहिती ‘महानिर्मिती’च्या कोळसा विभागाचे कार्यकारी संचालक राजेश पाटील यांनी दिली.

mahesh.bokade@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis coal shortage at power plants during summer season this year print exp zws
Show comments