मोहन अटाळकर
गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा कापसाच्या उत्पादनात सुमारे आठ टक्के घट येण्याचा अंदाज ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’ने (सीएआय) वर्तवला आहे. गतवर्षी ३११ लाख गाठींचे उत्पादन झाले होते, ते यंदा २९४ लाख गाठींपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. मात्र, आयात दुपटीने वाढणार असल्याचे ‘सीएआय’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. सध्या राज्यात कापसाला सहा हजार ५०० ते सात हजार रुपये प्रतििक्वटल भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील महाग कापूस आयात होतो, मात्र येथील शेतकऱ्यांच्या कापसाला अपेक्षित दर का मिळू शकत नाही, हा प्रश्न चर्चेत आला आहे.
कापसाच्या उत्पादनाचा अंदाज काय?
‘सीएआय’ने ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या कापसाच्या नव्या हंगामात २९४ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. मध्य भारतातील गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक १७९.६० लाख गाठींचे उत्पादन गृहीत धरण्यात आले आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूत ६७.५० लाख गाठी, तर उत्तरेकडील राज्यांमध्ये ४२ लाख कापूस गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. भारतात साधारणपणे ६७ टक्के कोरडवाहू क्षेत्रात आणि ३३ टक्के बागायती क्षेत्रात कापसाचे पीक घेतले जाते. पावसाची अनियमितता, वातावरण बदलांचा प्रभाव, कीड-रोगांचा प्रादुर्भाव उत्पादकतेवर परिणाम करणारा ठरला आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : कापूस उत्पादन घटूनही भाव कमी का?
आयातीचे चित्र काय?
मागील हंगामातील जवळपास २९ लाख गाठी शिल्लक आहेत. यंदा आयात जवळपास ७६ टक्क्यांनी वाढून २२ लाख टनांवर जाईल. म्हणजेच यंदा एकूण कापूस पुरवठा ३४६ लाख गाठींचा असेल, असे ‘सीएआय’ने म्हटले आहे. देशात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरदरम्यान तीन लाख गाठी कापूस आयात करण्यात आला. विशेष म्हणजे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात देशातील बाजारापेक्षा जास्त भाव आहे. तसेच आयातीवर ११ टक्के शुल्कही आहे. तरीही आयात सुरू आहे. भारतात साधारण अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आयात केला जातो. या कापसाचे उत्पादन भारतात फार कमी आहे. पण, तरीही आयात दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कापसाची निर्यात किती?
गेल्या हंगामात १५.५० लाख गाठी कापूस देशातून निर्यात झाला. यंदा त्याहून थोडा कमी म्हणजे १४ लाख गाठी कापूस निर्यात होईल, असा ‘सीएआय’चा अंदाज आहे. यंदाच्या कापूस हंगामात १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत देशांतर्गत बाजारात ६०.१५ लाख कापूस गाठींची आवक झाली. सुमारे तीन लाख गाठी कापूस निर्यात झाला. कापसाचा सर्वात मोठा आयातदार चीन आहे. कापसाचे उत्पादन घटणार असले तरी आपली देशांतर्गत गरज भागवूनदेखील बराचसा कापूस निर्यात केला जाऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>> चीन पुन्हा अणूचाचणी करण्याच्या तयारीत? ‘लोप नूर’मध्ये नेमकं काय घडतंय? जाणून घ्या…
देशातील बाजाराची स्थिती काय आहे?
देशातील बाजारात डिसेंबरमध्ये कापसाची आवक मोठया प्रमाणात वाढली. कापूस दरावर दबाव वाढण्याचे हेही एक कारण मानले जात आहे. साधारणपणे हंगाम सुरू झाल्यानंतर जानेवारीपर्यंत म्हणजे चार महिन्यांपर्यंत सुमारे ७० टक्के कापूस बाजारात येतो. उत्पादन घटले तरी बाजारात आवक जास्त आहे. आवक कमी होईपर्यंत दर कमीच राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कापसाला २०२१ च्या एप्रिल-मे महिन्यांत १५ हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याने शेतकरी सुखावला होता. परिणामी कापसाची अधिक प्रमाणात लागवड झाली. पण, गेल्या दोन हंगामांत कापसाला अपेक्षित दर मिळू शकलेला नाही.
कापसाचे दर का कमी आहेत?
नवीन हंगामात ७५ लाख गाठींची आवक झाली आहे. ती मागील हंगामाच्या तुलनेत अधिक असून, दर मात्र दबावातच आहेत. देशांतर्गत बाजारात दरवर्षी ३०० ते ३१० लाख गाठींचा वापर केला जातो. परंतु कापडाला कमी उठाव आणि विविध क्षेत्रांतील वित्तीय संकटांमुळे कापूस गाठींचा वापर कमी आहे. सरकीचे दरही वधारलेले नाहीत, कारण सरकी तेलासह पशुखाद्यासाठी सरकीची मागणी कमी आहे. गेल्या वर्षी सरकीचे दर ३४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल होते. त्यात नंतरच्या काळात घसरण झाली. परंतु यंदा मात्र सरकी दरांनी ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा पल्लाच गाठलेला नाही. परिणामी कापूस दरात फारशी वाढ होत नसल्याचे चित्र आहे.
mohan.atalkar@expressindia.com