युद्धग्रस्त गाझामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) मोहिमेवर असलेले निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी कर्नल वैभव काळे यांचा मृत्यू झाला. युद्धात अडकलेल्यांना सोडविण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी ते अशांत पश्चिम आशियामध्ये गेले होते. त्यांच्या मृत्यूनंतर आता नेमके काय घडले, याचा तपास सुरू झाला आहे. हा बळी इस्रायली हल्ल्याचाच असल्याचे सकृद्दर्शनी दिसत असल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
वैभव काळे कोण होते?
लष्करातून निवृत्त झालेले कर्नल काळे हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात (यूएनडीएसएस) सेवा देत होते. काही आठवड्यांपूर्वीच ते गाझामध्ये दाखल झाले होते. या भागात त्यांची प्रथमच नियुक्ती झाली होती. नागपुरात शिक्षण झालेले मूळचे पुण्याचे असलेले ४६ वर्षांचे वैभव काळे २२ वर्षांच्या लष्करी सेवेनंतर स्वेच्छानिवृत्त झाले. काही काळ खासगी क्षेत्रातही त्यांनी काम केले. मात्र बैठ्या कामाला कंटाळल्यानंतर कर्नल काळे यांनी यूएनडीएसएसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हमास आणि इस्रायलशी कोणतेही शत्रुत्व किंवा कोणताच थेट संबंध नसतानाही या संघर्षात त्यांचा नाहक बळी गेला. त्यांचा मृत्यू नेमका कुणामुळे झाला, याचा तपास सुरू करण्यात आला असून पहिला संशय इस्रायलवरच आहे.
हेही वाचा >>> चार धाम यात्रेत ५ दिवसांत ११ भाविकांचा मृत्यू; नक्की काय घडतंय? यात्रेकरूंसाठी जारी करण्यात आलेले नवीन नियम काय आहेत?
संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे काय?
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नल काळे हे काही सहकाऱ्यांसह गाझातील युरोपीय रुग्णालयाकडे जात असताना इस्रायली रणगाड्यातून त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला. यात कर्नल काळे यांचा मृत्यू झाला तर त्यांचा एक सहकारी जखमी झाला. विशेष म्हणजे, काळे जात असलेल्या गाडीवर संयुक्त राष्ट्रांचे नाव आणि चिन्ह स्पष्टपणे लिहिले असतानाही इस्रायली सैन्याकडून या वाहनावर हल्ला करण्यात आल्याचे संयुक्त राष्ट्रांचे उपप्रवक्ता फरहान हक यांनी स्पष्ट केले. कोणत्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांच्या वाहनाला लक्ष्य केले गेले याचा शोध घेतला जात असून त्यासाठी इस्रायली लष्कराशी चर्चा केली जात असल्याचेही ते म्हणाले. यूएनडीएसएसने या तपासासाठी सत्यशोधन समितीचीही स्थापना केली आहे. अर्थातच, आधीच्या सर्व घटनांप्रमाणे यावेळीही इस्रायली लष्कर जबाबदारी झटकण्याच्या भूमिकेत आहे.
इस्रायली लष्कराचे म्हणणे काय?
आपल्या गोळ्यांनी कर्नल काळे यांचा बळी घेतल्याचे इस्रायलने थेट नाकारले नसले, तरी या घटनेची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांच्या चमूवर ढकलण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यांच्या मते कर्नल काळे यांच्या वाहनावर झालेला हल्ला हा तीव्र संघर्ष सुरू असलेल्या पट्ट्यात झाला. लष्कराला या चमूच्या प्रवासाबद्दल पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. या प्रकरणी तपास सुरू असून सर्व पुराव्यांची छाननी होत असल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. मात्र सर्व बाजूंना ‘यू एन’ असे ठळक अक्षरात लिहिलेल्या वाहनावर कोणताही विचार न करताना गोळीबार का करण्यात आला, याचे उत्तर मात्र इस्रायलचे लष्कर अद्याप देऊ शकलेले नाही.
हेही वाचा >>> हिंसाचारामुळे धगधगत्या फ्रान्समध्ये पुन्हा दंगली भडकल्या; फ्रान्सच्या न्यू कॅलेडोनियामध्ये आणीबाणी लागू, कारण काय?
इस्रायल अनेकदा दोषी?
७ ऑक्टोबरच्या सकाळी हमासने इस्रायलवर केलेल्या आजवरच्या सर्वांत मोठ्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये सैन्य घुसविले. या युद्धात आतापर्यंत ३५ हजारांवर पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला आहे. अनेकदा कोणताही पुढचा-मागचा विचार न करता इस्रायली सैन्याकडून हल्ले करण्यात येत असल्याने अनेक निरपराध बालकांचाही मृत्यू झाला आहे. रुग्णालयात हमासचे नेते असल्याच्या केवळ संशयावरून तेथे हल्ले करण्यात येतात. केवळ एखाद्या लष्करी नेत्याला वाटले म्हणून निर्वासित छावण्यांमध्ये सैन्य घुसविले जाते. एप्रिलच्या सुरुवातीला ‘वर्ल्ड सेंट्रल किचन’ या संस्थेचे सहा आंतरराष्ट्रीय कार्यकर्ते आणि त्यांचा एक पॅलेस्टिनी सहकारी इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले. यावरून टीका होऊ लागल्यानंतर इस्रायली लष्कराने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले.
मदतपथकांबाबत नियम व धोरण काय?
जगात कठेही संघर्ष सुरू असल्यास सर्वाधिक अभय हे संयुक्त राष्ट्रे, संलग्न संस्था, तसेच आतरराष्ट्रीय रेड क्रॉससारख्या जागतिक स्वयंसेवी संस्थांना दिले जाते. आफ्रिका, अफगाणिस्तान, सीरिया, लिबियासारख्या अस्थिर टापूंमध्येही सहसा या संस्थांशी संबंधित स्वयंसेवकांना व कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले जात नाही. यापूर्वी भारतीय स्वयंसेवकांचे लेबनॉन, तसेच कोसोवोत संघर्षादरम्यान मृत्यू झालेले आहेत. पण इस्रायली आणि आसपासच्या भूमीवर अशा प्रकारे भारतीय व्यक्तीचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ. सहसा अशी पथके संघर्षभूमीत दाखल झाल्यानंतर त्याबाबत पुरेशी कल्पना दोन्ही बाजूंना दिली जाते. या पथकांकडे अन्न, औषधे, मदतसामग्री मुबलक असल्यामुळे त्यांच्या आगमनात किंवा संचारात व्यत्यय आणला जात नाही.
amol.paranjpe@expressindiacom