अभिजित बेल्हेकर
गेल्या वर्षीचा अपुरा पाऊस आणि यंदा मार्चपासूनच जाणवू लागलेला उन्हाळा यामुळे राज्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट पसरू लागले आहे. विहिरी, ओढे, नदीनाले, छोटे-मोठे जलसाठे कोरडे, मृत होऊ लागले आहेत. पाण्यासाठी पुन्हा एकदा भटकंती, स्थलांतर आणि संघर्ष सुरू झाला आहे. हजारो गावे टँकरवर जगू लागली आहेत. अशा या करपलेल्या स्थितीतही एका बातमीने काहीसा सुखद गारवा तयार केला आहे. राज्य दुष्काळात असताना महाराष्ट्रासाठी वरदान असलेल्या कोयना धरणात मात्र यंदा अजून सुरक्षित जलसाठा असल्याचे हे वृत्त. कुतूहल जागे करणाऱ्या या बातमीच्या निमित्ताने कोयना धरणाचा हा वेध…
कोयना धरणाचे वेगळेपण काय?
महाराष्ट्रातील मोठ्या क्षमतेच्या धरणांमध्ये कोयना ऊर्फ शिवसागरचा समावेश होतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीवरील हे धरण. महाबळेश्वरजवळ उगम पावणारी कोयना नदी पुढे तब्बल ६५ किलोमीटरचा प्रवास सह्याद्रीच्या रांगांमधून करते. पश्चिमेकडून दक्षिणेकडे ६५ किलोमीटर वाहत आल्यावर हेळवाकजवळ ती पूर्वेकडे वळण घेत सह्याद्रीतून खाली उतरते. कोयनेचा हा संपूर्ण प्रवास सह्याद्रीच्या उंच खोल रांगांमधून आहे. या प्रदेशात दर वर्षी तब्बल पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. एकूणच भरपूर पाणी पुरवणारा पाऊस आणि या पाण्याला साठवण्यासाठी उत्तम भौगोलिक स्थिती. या दोन गोष्टींमुळेच प्रचंड आकाराचे, जलसाठ्याचे कोयना धरण इथे आकारास आले आणि पुढे ते देशात लौकिकास गेले.
हेही वाचा >>> विश्लेषण : तळकोकणात ‘दादा’ कोण? नारायण राणे पहिल्याच लोकसभा निवडणुकीत यशस्वी होतील?
कोयना धरणाचा प्रवास काय सांगतो?
सह्याद्रीच्या ऐन गाभ्यातून वाहणाऱ्या कोयनेभोवतीचा हा भूगोल आणि तिथल्या हवामानाचा विचार करून इथे धरण बांधण्याचा विचार अगदी ब्रिटिशांपासून सुरू झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी इथे पहिले सर्वेक्षण केले. पण काही कारणांनी ही योजना बारगळली. पुढे १९२५ च्या दरम्यान टाटा समूहाने यामध्ये उडी घेतली. पण खूप मोठी गुंतवणूक असणाऱ्या या धरणासाठी काही पावले पडण्यापूर्वीच जागतिक मंदी अवतरली आणि हा विचार कागदावरच राहिला. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर विकासाला गती देण्यासाठी ऊर्जेची मोठी गरज निर्माण झाल्यावर कोयना प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आणि त्याला गती मिळाली. मग १९५१ मध्ये शासनाकडून या धरणासाठी सर्वेक्षण झाले. सन १९५४ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते या धरणाचे आणि नंतर १९५८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. सन १९६१ पासून धरणात पाणी साठण्यास सुरुवात झाली आणि १६ मे १९६२ रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते कोयना प्रकल्पाचे उद्घाटन झाले. कोयना धरणातून वीज तयार होऊ लागली. महाराष्ट्राच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले.
कोयना धरणाची उद्दिष्टे कोणती?
सह्याद्रीतील उंचीवरील धरण आणि शाश्वत अशा मोठ्या जलसाठ्यामुळे या धरणाच्या उद्दिष्टामध्ये वीजनिर्मिती ही सुरुवातीपासूनच प्रथमस्थानी होती. सन १९६२ मध्ये सुरू झालेली कोयनेवरची वीजनिर्मिती आज हळूहळू वाढत जात १९६० मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे. जास्तीत जास्त पाण्याचा वापर करण्यासाठी धरणाच्या तळाशी जमिनीला छेद (लेक टॅपिंग) देण्याची प्रक्रियादेखील करण्यात आली आहे. याशिवाय धरणातील पाण्यावर सातारा, सांगली जिल्ह्यातील मोठ्या शेतीचे सिंचन केले जाते. यासाठी नदीवाटे पाणी सोडले जाते. तसेच टेंभू, ताकारी, म्हैसाळ अशा योजनांमधून कोयनेचे पाणी या दोन्ही जिल्ह्यांच्या दुष्काळी भागापर्यंत पोहोचले आहे. धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावरच कराड, सांगली, मिरजसारख्या मोठ्या शहरांसह हजारो गावांची पाण्याची तहान भागवली जाते. कृष्णाकाठच्या अनेक उद्योगांनाही कोयनेतूनच पाणी पुरवले जाते. एकूणच वीजनिर्मिती, शेतीसाठी सिंचन, पिण्याचे पाणी आणि उद्योग असे बहुउद्देशीय असे हे धरण आहे.
हेही वाचा >>> आमिर खान काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल, निवडणुकीदरम्यान चुकीची माहिती कशी ओळखायची?
आकडेवारी काय सांगते?
कोयना धरणाची मूळ पाणी साठवणक्षमता ही ९८.७८ टीएमसी आहे. पण २००३ मध्ये धरणाचे दरवाजे पाच फुटांनी उंच करण्यात आल्यावर ती वाढून १०५.२५ टीएमसी झाली. महाबळेश्वर ते धरणाची भिंत दरम्यानचे ६५ किलोमीटर लांबीचे कोयना आणि तिच्या उपनद्यांचे पात्रच आज धरणाचे पाणलोट क्षेत्र बनलेले आहे. या प्रदेशात राज्यातील सर्वाधिक क्षमतेने पाऊस कोसळतो आणि हे सारे पाणी या पाणलोट क्षेत्रात जमा होते. पाऊस पाणी देतो तर भोवतीचा सह्याद्री या पाण्याला साठवण्याचे काम करतो. दर वर्षी पावसाच्या हंगामात धरणात तब्बल १२० ते १६० टीएमसी पाण्याची आवक होते. या पाण्याचा वापर पावसाळा सुरू झाल्यापासूनच वीजनिर्मिती, सिंचन आणि पिण्यासाठी सुरू होतो. हा वापर विचारात घेऊन १५ ऑक्टोबर रोजी पावसाळ्याचा हंगाम संपताना जर धरणातील साठा १०५.२५ टीएमसी (शंभर टक्के) असेल तर त्या वेळी धरणाची जलसाठ्याची स्थिती उत्तम समजली जाते. इथे पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे हे धरण आजवर बहुतेक वेळा शंभर टक्के भरले आहे. केवळ १९६८, १९७२, १९८७, १९९५, २०००, २००१, २००३, २०१५ आणि यंदा २०२३ असे नऊ वेळा हे धरण शंभर टक्के भरू शकले नाही.
धरण पाणीसाठ्याचे व्यवस्थापन कसे?
कोयना धरणात दर वर्षी पाण्याची होणारी एकूण १२० ते १६० टीएमसी आवक विचारात घेता या पाणी वापराचे नियोजन केले आहे. यामध्ये वीजनिर्मितीसाठी – ६७.५० टीएमसी, शेतीसिंचन योजना, नदीवाटे पाणीपुरवठा- विसर्ग यासाठी – ४३ टीएमसी, तर बाष्पीभवनामुळे खर्च होणारे पाणी – ७ टीएमसी असे विचारात घेतले आहे. शिवाय साधारण ५ ते १० टीएमसी पाणी हे मृतसाठा म्हणून धरणात शिल्लक राहते. १ जून रोजी पाऊस पडू लागल्यापासून ते पुढील वर्षीच्या ३१ मेपर्यंत असे हे पाणी वापरासाठीचे नियोजन केलेले असते.
आपत्कालीन स्थितीत बदल कसे केले जातात?
धरणातील पाणीसाठ्याचे ठरावीक नियोजन केलेले असले, तरी त्या-त्या वर्षीचे पाऊसमान, धरणसाठा याचा अंदाज घेत काही वेळा त्यामध्ये आपत्कालीन बदल केले जातात. जर पाऊस कमी झाला, पाणीसाठा घटला, दुष्काळाचा अंदाज व्यक्त करण्यात आला, तर त्या वर्षी वीजनिर्मितीवरचा पाण्याचा वापर कमी करत तो साठा सिंचन, पिण्यासाठी राखून ठेवला जातो, अशी माहिती कोयना प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी दिली. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने धरण यंदा केवळ ८९.०९ टीएमसी भरले. तसेच चालू वर्षीही दुष्काळाची भीती व्यक्त करण्यात आल्याने यंदा पाण्याचे नियोजनात असेच बदल करण्यात आले. वीज निर्मितीसाठीचा राखीव साठा ८.८५ टीएमसीने कमी करण्यात आला. सिंचन आणि अन्य कारणांसाठीचे वितरणही अचूक केल्याने सध्या एप्रिल महिन्यात राज्याला सर्वत्र दुष्काळाचे चटके बसत असताना कोयनेत मात्र समाधानकारक (४७.४१ टीएमसी) साठा आहे. हा साठा वीजनिर्मिती, सिंचन आणि पाणी योजनांसाठी जुलैअखेरपर्यंत पुरेल असे कोयना प्रकल्पाचे उपअभियंता आशिष जाधव यांनी सांगितले.
abhijit.belhekar@expressindia.com