घोडे व्यापारासाठी देशासह विदेशातही नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील बाजार प्रसिद्ध आहे. दरवर्षी श्रीदत्त जयंतीनिमित्त सारंगखेडा येथे यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. सुमारे दीड महिना चालणाऱ्या या यात्रोत्सवात घोडे बाजार भरतो. यंदाही सारंगखेड्यातील  बाजारात कोट्यवधी रुपयांच्या घोड्यांचे आगमन झाले आहे. नुकताच एका घोड्यासाठी १९ कोटींचा सौदा झाला. तापी तीरावर वसलेल्या या घोडे बाजाराचे इतके महत्त्व का, या बाजाराची वैशिष्ट्ये काय, याविषयीचे विश्लेषण.

सारंगखेडा घोडे बाजाराची परंपरा…

तापी नदीकिनारी वसलेल्या सारंगखेडा येथे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. दरवर्षी श्रीदत्त जयंतीनिमित्त या ठिकाणी यात्रा भरते. या यात्रेत घोडे बाजाराचे आयोजन केले जाते. हा घोडे बाजार नेमका कोणत्या वर्षांपासून सुरू झाला, याचा कोणताही लिखित पुरावा नसला तरी   साडेतीनशेपेक्षा अधिक वर्षांची परंपरा या घोडे बाजाराला असल्याचे या ठिकाणचे ग्रामस्थ सांगतात. या ठिकाणी येणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील पर्यटक, भाविक, तसेच घोड्यांची आवड असलेल्यांची संख्या अधिक असली तरी उत्तर आणि दक्षिण भारतातीलही पर्यटक येथे येतात. अर्थात, त्यातील बहुतेक जण घोडे खरेदी-विक्रीसाठी दाखल होतात.

हेही वाचा >>> पामतेलाच्या तुटवड्यामुळे खाद्यतेलाची दरवाढ होणार? 

सारंगखेडा बाजाराला घोडे व्यापारासाठी पसंती का?

सारंगखेड्याच्या घोडे बाजारात मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश , पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट अशा विविध राज्यांतून खरेदी- विक्रीसाठी दरवर्षी दोन ते अडीच हजार घोडे दाखल होत असतात. या व्यापारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. पंजाब, सिंध, मारवाड अशा विविध जातीचे उमदे घोडे बाजारात पाहण्यास मिळतात. याठिकाणी विक्रेत्यांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सोईसुविधांमुळे देशात पुष्करच्या मेळ्यानंतर घोडेबाजारासाठी सारंगखेड्याचे नाव घेतले जाते. या बाजारात शेतीकामासाठी लागणाऱ्या घोड्यापासून घोडागाडी ते थेट शर्यत आणि केवळ शेताची शोभा वाढविणारे (स्टड फार्म) असे विविध प्रकारचे घोडे खरेदी- विक्रीसाठी दाखल होतात. याठिकाणी घोड्यांची विक्री देशभरातील इतर बाजारांच्या तुलनेत चांगली होत असल्याने आणि घोड्यांना भावही योग्य मिळत असल्याने विक्रेते या बाजाराची आवर्जून वाट पाहतात. सारंगखेड्यानंतर मालेगाव, अकलूज अशा ठिकाणी भरणाऱ्या घोडे बाजारामुळे व्यापाराची साखळी निर्माण होत असल्याने घोडेमालक प्रथम सारंगखेडा येथे येतात.

चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून झळाळी

सारंगखेडा बाजारात दाखल होणाऱ्या घोड्यांची संख्या आणि याठिकाणी देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ पाहता २०१७-१८ पासून राज्य शासनाने याठिकाणी चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून या घोडे बाजाराला आधुनिक रूप (कॉर्पोरेट) देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस शासकीय निधीतून पर्यटन विभागाने तापी नदीकिनारी खास टेंट सिटी  उभारून घोडे बाजाराकडे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना काहीसा प्रतिसाद मिळत असतानाच करोनाचे संकट आले. त्यानंतर शासन स्तरावरून चेतक फेस्टिव्हलसाठी निधीच उपलब्ध झाला नाही. असे असताना या महोत्सवाचे आयोजक सारंगखेड्याच्या जुन्या संस्थानिक घराण्यातील जयपालसिंग रावल हे ग्रामस्थांच्या सहकार्याने बाजाराची शान टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी विविध स्पर्धांच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करत आहेत. चेतक फेस्टिव्हलची ओळख देशभरात होण्यासाठी शासन स्तरावरूनदेखील प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>> महारेराकडून साडेदहा हजार गृहप्रकल्पांना का नोटिसा?

घोड्यांच्या किमती कोट्यवधींच्या घरात का?

सारंगखेडा बाजारात दरवर्षी होणाऱ्या विविध स्पर्धांसाठी देशभरातील बाजार आणि स्पर्धा गाजवणारे नामवंत स्टड फार्मचे गाजलेले घोडे येतात. या घोड्यांची किंमत महागड्या गाड्या आणि घरांपेक्षाही कित्येक कोटींनी अधिक असल्याने त्यांच्याविषयी पर्यटकांना उत्सुकता असते. घोड्याची अनुवंशिकता (ब्लडलाईन), उंची, ठेवण, खानपान यावरून किंमत ठरत असते. त्याचा रुबाबही महत्त्वाचा ठरतो. आवड असणाऱ्यांना चटकन कोणत्याही घोड्याचे गुण लक्षात येतात. काही स्टड फार्म मालक किमती घोडे फक्त या ठिकाणचे कार्यक्रम आणि स्पर्धांसाठीच आणतात. घोडा विक्री करण्यापेक्षा तो राखून त्याच्या माध्यमातून जन्माला येणाऱ्या घोड्यांच्या खरेदी- विक्रीतून स्टड फार्म मालक चांगली कमाई करत असल्याचे दिसून येते.

घोडे बाजारात नवीन काय?

सारंगखेडा बाजारात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. घोड्यांच्या नृत्य स्पर्धा, सौंदर्य स्पर्धा, शर्यत यांसह चेतक फेस्टिव्हलमध्ये तीन ते चार वर्षांपासून घोड्यांच्या साहसी क्रीडा स्पर्धांचे  आयोजनही केले जात आहे. महाराष्ट्रच नव्हे तर, देशाच्या अनेक प्रांतातून शेकडो किलोमीटर घोड्यावरून प्रवास करत याठिकाणी आवड असणारे दाखल होत असतात. कित्येक वर्षे होऊनही सारंगखेडा घोडे बाजार आजही आपले वैशिष्ट्ये टिकवून आहे.

Story img Loader