सिद्धार्थ खांडेकर
दिल्ली आणि आसपासच्या विमानतळांवर थंडीमुळे दाट धुक्याच्या स्थितीत विमानांचे उड्डाण (टेक-ऑफ) आणि अवतरण (लँडिंग) विस्कळीत झाले आणि प्रचंड प्रमाणत विमान सेवेची रखडपट्टी झाली. खरे तर हिवाळ्यात दाट धुके साचून विमानसेवा विस्कळीत होणार ही शक्यता गृहित धरलेली असते. त्यानुसार अनेक विमानतळांवर विशेष उपकरण बसवलेले असते. इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम (आयएलएस) असे त्याचे नाव. आयएलएस ही धुकेभेदक नियंत्रण प्रणाली विशेषतः लँडिंगच्या वेळी अत्यंत कळीची ठरते. दाट धुक्याच्या वेळी कॅटॅगरी-थ्री (CAT-III) श्रेणीची म्हणजे सर्वोच्च परिणामकारक यंत्रणाच वापरावी लागते. दिल्लीतील दोनपैकी एका धावपट्टीवर ती वापरता येऊ शकत नव्हती. त्यामुळे एरवी धीम्या गतीने होणारी हवाई वाहतूक अधिकच कूर्मगतीने होत राहिली. 

धुक्यामुळे विमानवाहतुकीवर परिणाम कसा होतो?

धुक्यामध्ये लँडिंग आणि टेक-ऑफ हे दोन्ही जोखमीचे असते. पण त्याचबरोबर टेक-ऑफपूर्व आणि लँडिंगपश्चात भूपृष्ठ वाहतुकीतही (टॅक्सींग) अडथळे येत असतात. ६०० मीटरपेक्षा कमी दृश्यमानता असेल, तर केवळ नकाशे आणि नजरेच्या आधारे विमान हाकावे लागते. यात वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष (एअर ट्रॅफिक कंट्रोल – एटीसी) यांच्यातील संवाद सातत्याने असावा लागतो. ही हालचाल अत्यंत धीम्या गतीने होते. टेक-ऑफच्या आधी मुख्य धावपट्टीवर येण्यापूर्वीच्या स्थितीसाठी (होल्डिंग पोझिशन) विमान आणखी दूर न्यावे लागते. कारण उड्डाण करणाऱ्या आणि उड्डाणाची वाट पाहणाऱ्या विमानांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे लागते. या सगळ्या प्रक्रियेमुळे विलंब लागतो. 

पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य X/@Official_PIA)
Pakistan Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
mumbai sindhudurg air plane
मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा दोन महिने बंद

हेही वाचा >>> कॅनडात कडाक्याच्या थंडीत भारतीय विद्यार्थ्यांचे आंदोलन; नेमके कारण काय? जाणून घ्या सविस्तर

‘आयएलएस’ काय आहे?

इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम अर्थात आयएलएस ही प्रणाली विमानतळांवर बसवलेली असते. पण तिचा वापर होण्यासाठी विमानांमध्येही संवेदक असतो. तसेच दाट धुक्यामध्ये आयएलएसच्या साह्याने लँडिंग करण्यासाठी कुशल आणि प्रशिक्षित वैमानिकाची गरज लागते. या तीन दुव्यांपैकी एकाचा अभाव संपूर्ण प्रणाली कुचकामी ठरवू शकतो. अशा परिस्थितीत संबंधित विमानतळांवर लँडिंगची जोखीम पत्करली जात नाही. रेडिओ संकेत आणि उच्च क्षमतेच्या दिव्यांचे मांडणी यांचा या प्रणालीत समावेश असतो. दिव्यांचा लखलखाट वैमानिकाला धावपट्टीचे नेमके स्थान दर्शवतो. लोकलायझर (समस्तरीय दिशादर्शक) आणि ग्लायडोस्कोप (उंचीनिदर्शक) अशा दोन प्रकारचे रेडिओ संकेत या प्रणालीत वापरले जातात. दाट धुके, तुफान पाऊस आदींमुळे दृश्यमानता अत्यल्प असतानाच्या स्थितीत धावपट्टीपासून २०० मीटर उंचीवर विमानास सुरक्षित आणण्याची जबाबदारी आयएलएस पार पाडते. या उंचीवरून धावपट्टी वैमानिकाला दिसू शकते.

भारतात कोणत्या विमानतळांवर ही प्रणाली उपलब्ध आहे?

आयएलसच्या अनेक श्रेणी आहेत. भारतात कॅट-थ्री-बी या श्रेणीची प्रणाली दिल्ली, अमृतसर, जयपूर, लखनऊ, कोलकाता आणि बेंगळूरु या विमानतळांवर उपलब्ध आहे. कॅट-थ्री-सी ही प्रणाली न्यूयॉर्क, लंडनसारख्या प्रगत देशांतील विमानतळांवर उपलब्ध असते. या श्रेणीत शून्य दृश्यमानतेमध्येही विमान उतरवणे शक्य होते. मात्र या साखळीमध्ये विमानांमध्ये अनुरूप संवेदक असणे आणि वैमानिक प्रशिक्षित असणे हेही अभिप्रेत असते. दृश्यमानता २०० मीटर उंचीपर्यंत असल्यास कॅट-थ्री-ए, २०० मीटरच्या खाली आणि ५० मीटरपर्यंत कॅट-थ्री-बी आणि ५० मीटर उंचीच्याही खाली असल्यास कॅट-थ्री-ए प्रणाली वापरावी लागते. 

हेही वाचा >>> U19 World Cup स्पर्धा भारताच्या वरिष्ठ संघासाठी का महत्त्वाची?

नवी दिल्ली विमानतळावर काय झाले?

गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास २०० हून अधिक लँडिंग आणि टेक-ऑफ रद्द करण्याची वेळ नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली. या विमानतळावर एकूण चार धावपट्ट्या आहेत. यांतील दोन धावपट्ट्या कॅट-थ्री-बी प्रणालीने सुसज्ज आहे. पण याच दोनपैकी एक धावपट्टी देखभाल-दुरुस्तीसाठी गेल्या वर्षी बंद करण्यात आली. त्यामुळे एकमेव कॅट-थ्री-बी धावपट्टीवर विमानांची गर्दी होऊ लागली. याशिवाय अनेक विमानांमध्ये कॅट-थ्री अनुरूप संवेदक नसल्यामुळे किंवा वैमानिक पुरेसे प्रशिक्षत नसल्यामुळे विमाने इतरत्र वळवावी लागली. दिल्ली विमानतळ आणि यानिमित्ताने इतरत्र हवाई वाहतुकीत अशा काही कारणांमुळे विलंब झाले. 

धुक्यातच झाला होता सर्वांत भीषण हवाई अपघात…

जगातील सर्वांत भीषण हवाई दुर्घटना ही हवेत न होता जमिनीवर झाली होती. या दुर्घटनेचे मुख्य कारण धुक्यात लपेटलेला विमानतळ हेच होते. २७ मार्च १९७७ रोजी स्पेनमधील टेनेराइफ येथे विमानतळाच्या धावपट्टीवर झालेल्या दोन विमानांच्या टकरीत ५८३ जणांचा मृत्यू झाला होता. नेदरलँड्सचे केएलएम आणि अमेरिकेचे पॅन-अॅम या विमानांत ही टक्कर झाली. दाट धुक्यामुळे मुख्य धावपट्टीवर आलेले पॅन-अॅम विमान केएलएमच्या वैमानिकाला दिसले नाही. त्याने पूर्वसूचनेची वाट न पाहताच टेक-ऑफला सुरुवात केली. हे विमान पूर्ण वेगात पॅन-अॅमच्या वरच्या भागावर आदळले. ही जशी डच वैमानिकाची चूक, तशीच पॅन-अॅम वैमानिकानेही निर्धारित टॅक्सीवेऐवजी भलत्याच टॅक्सी-वेवरून विमान धावपट्टीवर आणले, ही अमेरिकन वैमानिकाची चूक. पण ही ‘आंधळी-कोशिंबिर’ घडली अत्यंत दाट धुक्यामुळेच. 

Story img Loader