भांडवली बाजाराबाबत सध्या परदेशी गुंतवणूकदार (एफपीआय) सावध बनले असून, ते मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेत असल्याचे दिसत आहे. विद्यमान मे महिन्यात भांडवली बाजारातील त्यांची विक्री ही खरेदीपेक्षा जास्त राहिलेली आहे. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरतेचे वातावरण आहे. एकीकडे देशांतर्गत गुंतवणूकदारांनी घसरलेल्या किमतीला समभाग खरेदीचा सपाटा लावला आहे, तर दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदार मात्र समभाग विक्री करून नफावसुलीला प्राधान्य देत आहेत. परिणामी भांडवली बाजारात सध्या तीव्र प्रमाणात चढ-उतार होताना दिसत आहेत. नेमके हे कशामुळे होते आहे? 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एफपीआयकडून समभाग विक्री कशी व किती?

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफपीआय) देशांतर्गत भांडवली बाजारात समभाग विक्रीचा मारा सुरू ठेवला असून विद्यमान महिन्यात १७ मेपर्यंत त्यांनी सुमारे २५,००० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. तर त्याआधीच्या एप्रिल महिन्यात २१,५२४ कोटी रुपये भांडवली बाजारातून काढून घेतले होते. परदेशी गुंतवणूकदारांची ५ टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सेदारी असलेल्या शंभरहून अधिक कंपन्यांमध्ये समभाग विक्री केल्याने, त्या कंपन्यांचे समभाग १० टक्के ते ३० टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. या कालावधीत निफ्टी निर्देशांकात १.७ टक्क्यांची घसरण झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून सध्या नफावसुलीला प्राधान्य दिले जात आहे. शिवाय जोखीम कमी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असून सुरक्षित गुंतवणूक साधनांकडे त्यांनी होरा वळवला आहे. देशात सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू असल्यानेही बाजारातील अस्थिरता वाढली आहे. त्या परिणामी गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप कंपन्यांच्या समभागांमध्येदेखील विक्रीचा मारा केला आहे, असे मत इक्वोनॉमिक्स रिसर्चचे संस्थापकचे जी. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>> न्यायाधीशांसमोर आरोपीला खरंच कायदेशीर वागणूक मिळते का? अभ्यास काय सांगतो?

कोणत्या कंपन्यांना फटका?

गेल्या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांची सर्वाधिक हिस्सेदारी असलेल्या पैसा लो डिजिटल, ॲस्टर डीएम हेल्थ, सोनाटा सॉफ्टवेअर, गुजरात स्टेट पेट्रोनेट, कोफोर्ज आणि बिर्लासॉफ्ट या कंपन्यांच्या समभागांच्या किमतीमध्ये २० ते ३० टक्के घसरण झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांच्या समभाग विक्रीबरोबरच अनेक कंपन्यांची तिमाही कामगिरी अपेक्षेप्रमाणे न आल्याने विक्रीचा मारा अधिक तीव्र झाला. विद्यमान मे महिन्यात समभाग विक्रीचा मारा असाच कायम राहिल्यास जानेवारी २०२३ नंतरचा हा सर्वोच्च एफपीआय भांडवली बाजारातून बाहेर पडण्याचा महिना ठरेल.

निवडणुकीचा परिणाम कसा?

सध्याच्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा विजय आणि त्याचा धोरणात्मक सातत्य यावर होणारा परिणाम याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढते आहे. इंडिया वोलेटायलिटी इंडेक्स अर्थात बाजारातील अस्थिरतेचा मापक या महिन्यात २०.६ गुणांकावर पोहोचला आहे.निवडणूक सुरू झाल्यापासून त्यात ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) काही जागा गमावल्यास आणि तरीही बहुमत टिकवून ठेवल्यास परिणाम होण्याची शक्यता आहे.  

हेही वाचा >>> “मुस्लीम, हुकूमशहा शब्द वापरु नका!” प्रसार भारतीने कोणत्या नियमांअंतर्गत विरोधकांवर कारवाई केली?

कल बदल

वर्ष २०१९ आणि वर्ष २०१४ मध्ये झालेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांसमयी परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावला होता. वर्ष २०१९ मधील निवडणुकीच्या निकालांपूर्वीच्या दोन महिन्यांत सुमारे २५,००० कोटी रुपये मूल्याचे समभाग, तर २०१४ मध्ये निवडणूकपूर्व दोन महिन्यांत ३६,५०० कोटी रुपये मूल्याची समभाग खरेदी त्यांच्याकडून झाली होती. मात्र यंदा कल पूर्णपणे बदलला असून परदेशी गुंतवणूकदारांनी निवडणुकीच्या हंगामात आतापर्यंत ४३,५४० कोटी रुपये मूल्याचे समभाग विकण्याला प्राधान्य दिले आहे. याउलट, २०१९ च्या तुलनेत भाजपने जास्त जागा जिंकल्यास जमीन, कामगार आणि कृषी क्षेत्रातील अधिक वादग्रस्त संरचनात्मक सुधारणा पार पाडण्याची क्षमता वाढेल आणि त्याचा बाजारावर अधिक सकारात्मकत परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

या विक्रीचा परिणाम काय?

जेव्हा परदेशी गुंतवणूकदार समभाग विक्री करतात त्यावेळी तो निधी त्यांच्या स्वदेशात परत पाठवतात. त्याचा स्थानिक चलनाला फटका बसतो. डॉलरला मागणी वाढल्याने रुपयाचे मूल्य घसरते. एकूणच बाजारात रुपयाचा पुरवठा वाढला की, त्याचे मूल्य कमी व्हायला सुरुवात होते.

नवप्रगत अर्थव्यवस्थांना अधिक फटका?

अमेरिकेत महागाई नरमली असल्याने भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण असून अमेरिकी भांडवली बाजाराचा निर्देशांक डाऊ जोन्सने ४०,००० अंशांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली आहे. मात्र दुसरीकडे अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीचे स्पष्ट संकेत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या कपातीच्या सभोवतालच्या अनिश्चिततेमुळे काही गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे उदयोन्मुख बाजारपेठेतून बाहेर काढण्याचा विचार केला आहे. भारतासह सर्वच प्रगतीशील अर्थव्यवस्था असणाऱ्या बाजारपेठांमध्ये वाढलेली महागाई, रशिया-युक्रेन आणि त्यानंतरचे इस्रायल-हमास युद्ध आणि उत्तरोत्तर बिकट बनत असलेली भू-राजकीय परिस्थिती आणि देशांतर्गत समभागांचे महागडे मूल्यांकन यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना या बाजारपेठा अनाकर्षक ठरत असल्याने समभाग विक्री वाढली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी भारताबरोबरच इंडोनेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम, थायलंड यांसारख्या बाजारांतूनही निधी काढून घेतला आहे. तर तैवान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि मलेशियाच्या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नव्याने गुंतवणूक झाली आहे.  

बाजारात मोठी घसरण का नाही?

एकीकडे परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा सुरू असल्यामुळे स्वस्त झालेले समभाग देशांतर्गत गुंतवणूकदारांनी खरेदी करून भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांना भरघोस इंधन पुरवले आणि विद्यमान वर्षात विक्रमी पातळीवर नेऊन ठेवले. सेन्सेक्सने या  वर्षात ७५,१२४.२८ अंशांची सर्वोच्च पातळी गाठली आणि निर्देशांक आता पुन्हा (१८ मे) ७४,००५ अंशांच्या जवळ व्यवहार करतो आहे. याचबरोबर देशी गुंतवणूकदारांच्या उत्साहाची ही दौड दोन कारणांमुळे होती. एक म्हणजे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये दरमहा ठरावीक रकमेची गुंतवणूक करण्याच्या ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ची अंगवळणी पडलेली स्वागतार्ह सवय. दुसरे कारण म्हणजे उत्पन्नाचे आणखी एक साधन म्हणून लोक भांडवली बाजाराकडे वळले. शिवाय या काळात झिरोधा, अपस्टॉक्स, ग्रोसारख्या नगण्य दलाली आकारणाऱ्या आणि तंत्रज्ञानसुलभ समभाग खरेदी विक्रीचे पर्याय उपलब्ध करून दिल्याने वित्तीय बाजारांशी निगडित बचत साधनांकडे नवगुंतवणूकदारांचा कल झुकू लागला. देशी गुंतवणूकदारांच्या त्या फेसाळत्या उत्साहापुढे महागाई, कंपन्यांच्या नफ्याचे गोठलेले प्रमाण यांसारखे घटक निदान भांडवली बाजारातल्या निर्देशांकांपुरते तरी फिके पडले आहेत. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis foreign investors withdrawing money from capital market print exp zws
Show comments