एप्रिल महिन्यात देशाच्या बहुतेक भागाला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. या वाढत्या तापमानामुळे फळ-भाज्यांवर काय परिणाम होईल, महागाई वाढेल का, याविषयी…
उष्णतालाटेची कारणे काय?
देशातील बहुतेक भागाला म्हणजे राजस्थान, गुजरात, गंगा नदीचे खोरे, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटकसह दक्षिण भारताला एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातही उष्णतेच्या लाटांचा अंदाज आहे. जगातील बहुतेक हवामान संस्थांनी २०२३ हे आजवरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याचे जाहीर केले होते. एल-निनोमुळे २०२४ या वर्षातही आजपर्यंत देशासह जगभरात सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. यंदा युरोप-आशियात बर्फवृष्टीही सरासरीपेक्षा कमी झाली आहे. औद्याोगिकपूर्व काळाच्या तुलनेत जागतिक तापमान १.४५ अंश सेल्सिअसने वाढले आहे. सध्या प्रशांत महासागरातील एल-निनोची स्थिती हळूहळू कमी होत आहे.
पिकांवर काय परिणाम अपेक्षित आहे?
हेही वाचा >>> प्रज्वल रेवण्णांना ब्लू कॉर्नर नोटीस; रेड, पर्पल, यलो अशा सात प्रकारच्या नोटिसांचे अर्थ काय आहेत?
तापमानवाढ, उष्णतेच्या झळांचा पहिला फटका शेती क्षेत्राला बसतो. उन्हाळ्यात अन्नधान्य पिकांची देशात फारशी लागवड होत नाही. तरीही गंगा, नर्मदा नदी खोऱ्यात मुगाची आणि देशाच्या काही भागांत उन्हाळी भात, बाजरी, मका पिकांची लागवड होते. पाणी उपलब्ध असले, तरीही वाढत्या तापमानात ही पिके तग धरू शकत नाहीत. अपेक्षित वाढ होत नाही. भाजीपाला पिकांत सर्वाधिक महत्त्वाच्या टोमॅटो, कांदा आणि बटाटा यांपैकी कांदा पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. बटाटाही फारसा होत नाही. पण, टोमॅटो पिकाला मोठा फटका बसतो. जून, जुलै, ऑगस्टमधील संभाव्य दरवाढीचा फायदा घेण्यासाठी शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. पण, वाढते ऊन आणि हवेतील आर्द्रता कमी होऊन हवा कोरडी झाल्यामुळे टोमॅटोची रोपे, झाडे जळून जातात. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. फूल आणि फळगळ होते. टोमॅटोचा आकार वाढत नाही. गेल्या वर्षी अशीच स्थिती निर्माण झाल्यामुळे टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होऊन दर २०० रुपये प्रति किलोवर गेले होते. यंदाही अशाच प्रकारच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. कांदा पिकांची काढणी सुरू आहे. कांदा चाळीत साठवला जातो आहे. पण, तापमानवाढीमुळे कांद्याच्या वजनात घट होणे आणि सडण्याचे प्रमाण वाढते. बटाटा पिकाला फारसा फटका बसत नाही. पण, शीतगृहाच्या बाहेर बटाटा असल्यास किंवा वाहतुकीदरम्यान बटाट्याचे नुकसान होऊ शकते. देशात भाजीपाल्याची साठवणूक आणि वाहतुकीसाठी पुरेशी शीत-साखळी नाही. त्यामुळे तापमानवाढीचा फटका सहन करावा लागतो.
हेही वाचा >>> AI आणि AGI मध्ये काय आहे फरक? लोकांना या नव्या तंत्रज्ञानाची भीती का वाटते?
याचा महागाईशी संबंध काय?
महागाईचे संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने बिगरबासमती तांदूळ, गहू, साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. खाद्यातेल आणि कडधान्ये, डाळींची करमुक्त आयात सुरू आहे. तरीही कडधान्ये आणि डाळींच्या दरात तेजी आहे. तांदूळ, गहू, साखरेचे दर स्थिर ठेवण्यास केंद्र सरकारला यश आले आहे. तरीही महागाईच्या दरात वाढ होतच आहे. मागील वर्षात जून ते ऑगस्ट दरम्यान टोमॅटोचे दर १५० रुपये किलोवर गेले होते. पालेभाज्यांची लागवड आणि काढणीचा काळ अडीच ते तीन महिन्यांचा असतो. उन्हाळ्यात पालेभाज्यांची लागवड केल्यास त्या जुलै-ऑगस्टमध्ये काढणीला येतात. पण, उन्हाच्या झळांमुळे नुकत्याच उगवलेल्या पालेभाज्या करपून जातात. उन्हाळ्यात केलेल्या लागवडी नुकसानकारक ठरतात. त्यामुळे अपेक्षित लागवडी होत नाहीत. यंदा राज्याच्या बहुतेक भागांतील धरणांनी तळ गाठला आहे. उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळी पिके, पालेभाज्या किंवा फळपिकांसाठी पाण्याची आवर्तने बंद आहेत. या सर्वांचा परिणाम भाजीपाला पिकांवर होतो, त्यामुळेच दर वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये महागाई वाढते. यंदाही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. मोसमी पाऊस सरासरी वेळेत देशात दाखल झाला आणि अपेक्षित पर्जन्यवृष्टी झाली तरच महागाईतून काहीसा दिलासा मिळू शकतो.
dattatray.jadhav@expressindia.com