महिनाभराच्या चर्चेनंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अखेर अपेक्षेप्रमाणे गौतम गंभीरची निवड करण्यात आली. भारताचा माजी सलामीवीर आणि ‘आयपीएल’मध्ये कर्णधार म्हणून यशस्वी कामगिरी करणाऱ्या गंभीरला क्रिकेटच्या कोणत्याही स्तरावर मुख्य प्रशिक्षकपद भूषवण्याचा अनुभव नाही. मात्र, अतिशय रोखठोक, स्पष्टवक्ता आणि कठोर निर्णय बेधडकपणे घेण्यात सक्षम असल्याने गंभीर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद यशस्वीरीत्या सांभाळेल असे भाकीत अनेक क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केले. आता तीन वर्षांच्या कार्यकाळात त्याच्यासमोर कोणती आव्हाने असणार आणि मुळात तो प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत कसा आला, याचा आढावा.
खेळाडू म्हणून कारकीर्द…
सलामीवीर किंवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये बरेचदा तिसऱ्या क्रमांकावर खेळताना डावखुऱ्या गंभीरने भारतीय संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या. मात्र, त्याच्या दोन खेळी सर्वाधिक गाजल्या. यापैकी पहिली म्हणजे २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ५४ चेंडूंत ७५ धावांची, तर दुसरी म्हणजे २०११च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध १२२ चेंडूंत ९७ धावांची खेळी. दोनही वेळा भारताने विश्वचषक उंचावण्यात गंभीरचे योगदान मोलाचे ठरले. त्याने ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत मिळून त्याने १० हजारहून अधिक धावा केल्या. तसेच त्याने सहा एकदिवसीय सामन्यांत कर्णधारपद भूषवले आणि विशेष म्हणजे यापैकी एकही सामना भारताने गमावला नाही.
हेही वाचा >>> विश्लेषण : चिनी सैन्याविरोधात उत्तुंग पर्वतीय क्षेत्रात रणगाडा प्रभावी ठरेल?
कर्णधार म्हणून ‘आयपीएल’मध्ये कसे सिद्ध केले?
गंभीर आणि महेंद्रसिंह धोनी हे समकालीन खेळाडू. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक जिंकले. त्यामुळे गंभीरला राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याची फारशी संधी मिळाली नाही. मात्र, त्याने कर्णधार म्हणून स्वत:ला ‘आयपीएल’मध्ये सिद्ध केला. प्रसिद्ध सिनेअभिनेता शाहरुख खानची सह-मालकी असलेला कोलकाता नाइट रायडर्स संघ जेतेपदाच्या शोधात होता. बंगालचा सुपुत्र सौरव गांगुलीला कोलकाता संघाला यश मिळवून देता आले नाही. त्यामुळे कोलकाताच्या व्यवस्थापनाने अवघड निर्णय घेताना गांगुलीला संघमुक्त केले आणि २०११ च्या खेळाडू लिलावात गंभीरला मोठ्या किमतीत खरेदी केले. गंभीरकडे नेतृत्वाची धुराही सोपवण्यात आली. कोलकाताच्या व्यवस्थापनाचा हा धाडसी निर्णय अतिशय यशस्वी ठरला. गंभीरने २०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाताच्या संघाला ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवून दिले.
निवृत्ती घेतल्यानंतर काय केले?
गंभीरने २०१८ मध्ये सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्याने राजकारणात प्रवेश केला. २०१९ मध्ये तो पूर्व दिल्लीतून भाजपचा खासदार म्हणून निवडून आला. २०२४ पर्यंत तो या पदावर कायम होता. याच दरम्यान त्याने ‘आयपीएल’मध्ये नव्याने एंट्री झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचा प्रेरक (मेंटॉर) म्हणून काम केले. गंभीर आणि मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्या मार्गदर्शनाखाली लखनऊ संघाने पहिल्या दोन हंगामांत (२०२२ आणि २०२३) बाद फेरी गाठली. मात्र, २०२४ मध्ये गंभीरने राजकारणातून बाहेर पडून क्रिकेटवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले. तसेच त्याने लखनऊ संघ सोडून पुन्हा कोलकाता संघाकडे परतण्याचा निर्णय घेतला. यावेळी तो कोलकाता संघाशी प्रेरक म्हणून जोडला गेला.
हेही वाचा >>> संगीत ऐकणे, हुक्का पिणे आणि महिलांच्या सजण्यावरही बंदी; अफगाणिस्तानमध्ये नक्की घडतंय तरी काय?
प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत कसा आला?
भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून राहुुल द्रविडचा कार्यकाळ गेल्या वर्षीच्या (२०२३) एकदिवसीय विश्वचषकानंतर संपुष्टात आला होता. त्यानंतर २०२४ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार असल्याने भारतीय संघाकडे तयारीसाठी फारसा वेळ शिल्लक नव्हता. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने द्रविडला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर पुन्हा प्रशिक्षकपदी निवड होण्यासाठी द्रविडला नव्याने अर्ज भरावा लागणार होता. मात्र, आपल्या कुटुंबाला वेळ देण्यास द्रविडने प्राधान्य दिले आणि प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणे टाळले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणनेही अर्ज भरण्यास नकार दिला. त्यामुळे ‘बीसीसीआय’ला अन्य पर्यायांचा विचार करावा लागला. त्याच वेळी ‘आयपीएल’मध्ये गंभीर आणि मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताचा संघ चमकदार कामगिरी करत होता. वर्षभरापूर्वी बाद फेरीही गाठू न शकलेल्या कोलकाता संघाने थेट जेतेपदापर्यंत मजल मारली. कोलकाता संघातील सर्व खेळाडूंनी गंभीरचे आणि त्याच्या रोखठोकपणाचे कौतुक केले. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणताही अनुभव नसला, तरी खेळाडू, ‘आयपीएल’मध्ये कर्णधार आणि प्रेरक म्हणून यशस्वी कामगिरी केल्याने गंभीरला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मुख्य दावेदार मानले जाऊ लागले.
प्रशिक्षकपदासाठी कोणाशी स्पर्धा?
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी सुरुवातीला केवळ गंभीरच दावेदार असल्याची चर्चा होती. मात्र, माजी सलामीवीर आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमण यांनीही या पदासाठी अर्ज केला होता. ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) या दोघांच्या मुलाखती घेतल्या. अखेर ‘सीएसी’ने अपेक्षेप्रमाणे प्रशिक्षकपदासाठी गंभीरच्या नावाची शिफारस केली आणि ‘बीसीसीआय’ने त्यावर शिक्कामोर्तब केले.
कोणती आव्हाने असणार?
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, तर ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. द्रविडच्या आधी प्रशिक्षक राहिलेल्या रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ऑस्ट्रेलियात दोन वेळा कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली. त्यामुळे आता गंभीरकडूनही अशाच उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा केली जाणार आहे. भारतीय संघ या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर गंभीरच्या कार्यकाळात चॅम्पियन्स करंडक (२०२५), मायदेशात ट्वेन्टी-२० विश्वचषक (२०२६) आणि एकदिवसीय विश्वचषक (२०२७) या स्पर्धा होणार आहेत. तसेच पुढील वर्षीच ‘डब्ल्यूटीसी’ स्पर्धेची अंतिम लढतही होणार आहे. ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वीच चॅम्पियन्स करंडक आणि ‘डब्ल्यूटीसी’चे जेतेपद मिळवण्याची आपल्याला खात्री असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे आता या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान गंभीरसमोर असेल. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीमुळे ट्वेन्टी-२० संघासाठी नवे सलामीवीर शोधण्याची जबाबदारीही गंभीरवर असेल. तो आपल्या साहाय्यकांमध्ये (सपोर्ट स्टाफ) कोणाची निवड करतो, यावरही त्याचे यश अवलंबून असेल. तसेच त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ अधिक आक्रमक क्रिकेट खेळतो का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.