संजय जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरातील मंदीच्या वातावरणामुळे आयटी क्षेत्रासमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यांचा प्रत्यक्ष परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होत आहे. कर्मचारी कपातीचे प्रमाणही वाढले आहे.

वेतन कपातीचे प्रमाण किती?

कोविड संकटाच्या काळात आयटी उद्योगात मोठ्या प्रमाणात नवीन भरती झाली. मात्र, कमी वेतन हा सर्वसाधारण निकष सगळीकडे होता. आता मोठ्या आयटी कंपन्यांकडून नवीन भरती नावालाच होत आहे. सध्या नवउद्यमी कंपन्यांकडून प्रामुख्याने भरती होत आहे. यातील बहुतांश कंपन्या नवख्या आणि सुरुवातीच्या टप्प्यातील आहेत. गेल्या वर्षी आयटीतील कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या वेतनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट झाली. कंपनीच्या कामगिरीवर आधारित चल वेतन अर्थात ‘व्हेरिएबल पे’ला प्रामुख्याने कात्री लावली जात आहे. कारण वेतनात चल वेतनाचे प्रमाण सुमारे ३० टक्के असते. याच वेळी अनेक मोठ्या कंपन्यांकडून व्यवसाय कमी झाल्याने अतिरिक्त मनुष्यबळ कमी करण्याचे पाऊल उचलले जात आहे.

हेही वाचा >>> कायदेशीर जगतातील ‘भीष्म पितामह’; कोण होते फली एस नरिमन? वाचा सविस्तर

नोकरी जाण्याचे संकट कायम?

मोठ्या आयटी कंपन्यांकडून मनुष्यबळ कपात गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. प्रामुख्याने वरिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येत आहे. गेल्या वर्षीचा विचार करता मायक्रोसॉफ्ट, गूगल, ॲमेझॉन आणि मेटा या जगातील आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना नारळ दिला. नॅसकॉमच्या ताज्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात आयटी उद्योगाची वाढ ३.८ टक्क्यांपर्यंत होईल. गेल्या आर्थिक वर्षात ही वाढ ८.१ टक्के होती. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात या क्षेत्रात मोठी घसरण होत असल्याचे समोर आले आहे.

कर्मचाऱ्यांसमोर पर्याय कोणते?

अनेक मोठ्या कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्याने सध्या मोठ्या प्रमाणात अनुभवी आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे खासगी मनुष्यबळ कंपन्यांकडून या कर्मचाऱ्यांना हेरले जात आहे. हे कर्मचारी वेतनात ३० टक्क्यांपर्यंत कपात स्वीकारण्याची तयारी दाखवत आहेत, असे निरीक्षण या मनुष्यबळ कंपन्यांनी नोंदविले आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात नोकऱ्यांचा मागणीपेक्षा जास्त पुरवठ्याचे चित्र समोर आले आहे. अखेर कर्मचाऱ्यांना कमी वेतनाचा पर्याय निवडावा लागत आहे. आयटी कंपन्यांकडून काही प्रमाणात भरती सुरू असली तरी त्या भरती करताना अतिशय सावधपणे पावले उचलत आहेत.

हेही वाचा >>> जपानी बचत खाते भारतीय शेअर बाजारासाठी कसे ठरतेय फायदेशीर? वाचा सविस्तर

नवउद्यमी कंपन्यांसाठी चांगली संधी?

सध्या आयटी क्षेत्रातील कुशल आणि अनुभवी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने नव्याने सुरू झालेल्या नवउद्यमी कंपन्यांसाठी ही चांगली संधी आहे. या कंपन्यांसमोर अनुभव मनुष्यबळ मिळविण्याचे आव्हान सातत्याने होते. आता या कंपन्या अनुभवी मनुष्यबळाची भरती करू शकतात. त्यातून या कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि अनुभव यांचा फायदा या कंपन्यांना होईल. काही नवउद्यमी कंपन्यांकडून अशा प्रकारचे पाऊलही उचलले जात आहे. अनुभवी मनुष्यबळाच्या भरतीसाठी या कंपन्या ४ ते ५ टक्क्यांपर्यंत हिस्सा विक्री करण्याची तयारी दाखवत आहेत. गुंतवणुकीच्या पहिल्या टप्प्यात असलेल्या नवउद्यमी कंपन्यांकडून हे पाऊल उचलले जात आहे.

भविष्यात कसे चित्र असेल?

आयटी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. देशातील आघाडीच्या पाच आयटी कंपन्यांच्या मनुष्यबळात २०२३ मध्ये ६५ हजारांनी घट झाली. या क्षेत्रातील नोकरीच्या संधी डिसेंबर २०२२ च्या तुलनेत डिसेंबर २०२३ मध्ये २१ टक्क्यांनी आणि सप्टेंबर २०२३ च्या तुलनेत ४ टक्क्यांनी कमी झाल्या, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. कृत्रिम प्रज्ञेचा स्वीकार आयटी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे व्यवसायात नेमका कशा पद्धतीने बदल होत आहे, हे आयटी कंपन्या तपासत आहेत. हे चित्र नेमके स्पष्ट झाल्यानंतर कंपन्यांकडून नवीन व्यवसायाच्या संधी शोधल्या जातील. त्यामुळे भविष्यात कर्मचारी भरतीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis global recession created challenges for the it sector print exp zws
Show comments