पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे बारामाही हरित बंदराच्या उभारणीसाठी ७६ हजार २०० कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने १९ जून २०२४ रोजी मान्यता दिली…

वाढवण बंदराची गरज का भासली?

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे (जेएनपीए) विस्तारीकरण होऊन, न्हावा शेवा बंदरातील पद्धतींमधील कार्यक्षमता वाढवली तरी त्या बंदरात सध्या हाताळणी होणाऱ्या सुमारे साडेसहा दशलक्ष कंटेनर (ट्वेंटी फीट इक्विव्हॅलन्ट युनिट : ‘टीईयू’) चे प्रमाण १० दशलक्ष टीईयूपर्यंतच पोहोचू शकेल. अशा स्थितीत देशातील निर्यात व आयात क्षेत्रात होणारी वाढ पाहता भविष्याच्या दृष्टिकोनातून जवळपासच दुसऱ्या बंदराची उभारणी आवश्यक ठरली.

बंदरासाठी वाढवणलाच अनुकूलता का?

जेएनपीए येथे सध्या १५ मीटरची खोली प्राप्त असून त्या ठिकाणी १७ हजार कंटेनर (टीईयू) क्षमता असणाऱ्या जहाजांची नांगरणी शक्य होणार आहे. वाढवण येथे १८ ते २० मीटरची नैसर्गिक खोली प्राप्त असून २४ हजार कंटेनर क्षमतेपेक्षा अधिक जहाजांची बंदरात नांगरणी शक्य होईल; त्यामुळे भारताचे सिंगापूर, कोलंबो व इतर आंतरराष्ट्रीय बंदरांवरील अवलंबित्व संपुष्टात येईल. शिवाय वाढवण हे ‘इंडियन मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’ व ‘इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्स्पोर्टशन कॉरिडॉर’ या आंतरराष्ट्रीय नौकानयन मार्गांलगत असल्याने आयात- निर्यातीसाठी सोयीचे ठिकाण ठरेल.

हेही वाचा >>> २१ जून वर्षातील सर्वांत मोठा दिवस का ठरतो? त्यामागचे खगोलशास्त्रीय कारण काय?

वाढवण बंदराचे स्वरूप कसे राहील?

समुद्रामध्ये पाच-सहा किलोमीटर अंतरावर १४४८ हेक्टर क्षेत्रावर भराव टाकून बंदर उभारण्यात येणार आहे. जहाजांच्या सुरक्षित नांगरणीसाठी १०.१४ कि.मी. लांबीचा ब्रेकवॉटर बंधारा उभारला जाईल. पहिल्या टप्प्यात नऊपैकी चार कंटेनर टर्मिनल, चारपैकी तीन बहुउद्देशीय बर्थ व द्रवरूप कार्गो हाताळणीचे चार बर्थ तसेच तटरक्षक दलासाठी, रोरो सेवेसाठी स्वतंत्र बर्थ व इतर पायाभूत सुविधांसह १२० मीटर रुंदीचे ३३.६० किलोमीटर लांबीचे रस्ते आणि १२ कि.मी. रेल्वेलाइन उभारण्यात येणार आहे. सुमारे ४८ हजार कोटी रु खर्चाचा हा पहिला टप्पा डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

ठाणे-नवी मुंबई वाहतुकीवर काही परिणाम दिसेल का?

वाढवण बंदराच्या पहिल्या टप्प्यात १५ दशलक्ष टीईयू क्षमतेने व दुसऱ्या टप्प्याच्या पूर्णतेनंतर २३.२ दक्षलक्ष टीईयू हाताळणीची क्षमता राहील. बंदरातून दरवर्षी २९८ दशलक्ष मेट्रिक टन मालाची हाताळणी अपेक्षित आहे. यामुळे देशाच्या उत्तरेकडून येणारी तीन ते पाच हजार कंटेनर वाहने ठाणे- मुंबईत कमी होऊन पालघर- घोडबंदर- ठाणे- बेलापूर- उरण भागातील रस्त्याचा भार कमी होईल.

हेही वाचा >>> बायडेन आणि ट्रम्प यांच्यातील पहिल्या डिबेटमध्ये या ५ गोष्टींकडे असेल जगाचे लक्ष

स्थानिकांसाठी या बंदराचे लाभ काय?

बंदरामुळे प्रत्यक्ष १२ लक्ष व अप्रत्यक्ष एक कोटी रोजगार निर्मिती होऊन जिल्ह्याचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) तिपटीने वाढेल असा दावा करण्यात येत आहे. त्याच बरोबरीने पालघर, डहाणू तालुक्यातील स्थानिकांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचे कामकाज मिशन मोडवर हाती घेण्यात येणार आहे.

स्थानिकांचा विरोध का आहे?

या बंदराकरिता मोठ्या प्रमाणात भराव होणार असल्याने तसेच ब्रेकवॉटर बंधाऱ्याच्या उभारणीमुळे समुद्रातील पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होऊन किनाऱ्याची धूप होणे तसेच भरतीच्या पाण्यामध्ये गाव बुडण्याचे प्रकार घडतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बंदरामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय, शेती व त्यावर अवलंबून जोड व्यवसायांवर परिणाम होईल अशी भीती २००५ पासून उपस्थित करण्यात आली आहे. मात्र बंदर उभारणी करणाऱ्या जेएनपीएने या बंदरामुळे किनारे संरक्षित राहणार असून पूर नियंत्रणाबाबत केलेल्या अभ्यासात कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय या भागातील तिवर क्षेत्र व धार्मिक स्थळांना कोणत्याही प्रकारे बाधा होणार नसल्याचीही ग्वाही दिली आहे. २० चौरस किलोमीटर क्षेत्रातील मासेमारीवर या बंदरामुळे परिणाम होणार असल्याने, त्याची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

बंदरांच्या उभारणीला कसा आरंभ होईल?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत , बंदराला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया आधी सुरू होईल. त्यानंतर बंदर उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबवून बंदर उभारणीचे प्रत्यक्ष काम २०२५ च्या पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येण्याचे नियोजित आहे. त्याचबरोबर बंदराला रेल्वेद्वारे जोडणी करण्यासाठी आवश्यक भूसंपादन व प्रत्यक्ष रेल्वे उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

niraj.raut@expressindia.com