जगातील सात आश्चर्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या भिंतीच्या जोडीला चीन नवीन ‘भिंत’ उभारत आहे. त्यासाठी शेजारी देशांच्या सीमेवर अतिक्रमण करण्यात काहीही गैर नाही असा त्यांचा पवित्रा आहे.

चीनच्या नव्या ‘भिंती’चे स्वरूप कसे आहे?

चीनची भूसीमा आणि सागरी सीमा तब्बल १४ वेगवेगळ्या देशांना लागून आहे. ही हजारो किलोमीटर लांबीची सीमा मजबूत करण्यासाठी चीनने त्यावर तटबंदी उभारायला सुरुवात केली आहे. सीमा भागातील नागरिकांवर, मग ते शेजारी देशांतील असोत किंवा स्वतःच्याच, जरब बसवणे हा या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. सीमेपर्यंत पसरलेल्या दुर्गम प्रदेशावरही सरकारी पकड मजबूत करणे आणि कुठेही थोडीफार बंडाळी असेल तर त्याला चाप बसवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. त्याशिवाय आपल्या शक्तीचे सतत प्रदर्शन करत शेजारी देशांवर कुरघोडी करण्याचाही त्यांचा प्रयत्न दिसतो.

नेपाळच्या सीमेवर काय घडत आहे?

चीनने काही ठिकाणी नेपाळच्या सीमेपर्यंत बांधकाम केले आहे, तर काही ठिकाणी थेट सीमा ओलांडून नेपाळी गावांमध्ये घुसखोरी केली आहे. सीमेवरील नागरिक त्याबद्दल तक्रारी करत आहेत, पण नेपाळचे सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. चीन नेपाळला स्वतंत्र राष्ट्र मानत असले तरी तिबेट मात्र आपलाच हिस्सा असल्याचा दावा त्यांनी सोडलेला नाही. तिबेटच्या पठारावरील एका टेकडीवर ६०० फूट लांबीचा संदेश कोरण्यात आला आहे. ‘लाँग लिव्ह चायनीज कम्युनिस्ट पार्टी’, हा संदेश अगदी दुरून पाहणाऱ्यांनाही वाचता यावा याची खबरदारी घेण्यात आली आहे.

हेही वाचा >>> Diabetes ‘Smart’ Insulin:मधुमेहाच्या रुग्णांसाठी आता ‘स्मार्ट’ इन्सुलिन; काय सांगते नवीन संशोधन?

नेपाळींना तटबंदीचा त्रास कसा होत आहे?

नेपाळ आणि तिबेटच्या सीमा एकमेकांना लागून असलेल्या भागामध्ये चीनने हिमालयाच्या खोबण्यांमध्ये रुतवलेले कुंपण, त्याच्या काटेरी तारा आणि काँक्रीटची तटबंदी उभी केली आहे. त्यामुळे नेपाळ आणि तिबेट यांच्यामध्येही अंतर पडले आहे. या दुर्गम भागात चीनने उभारलेल्या टेहेळणी बुरुजांवरून त्यांचे सुरक्षा कॅमेरे आणि सशस्त्र पहारेकरी लक्ष ठेवून असतात. चीन घुसखोरी करत असलेल्या या भागातील सीमेला लागून नेपाळचा हुमला जिल्हा आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या हना बीच आणि भद्रा शर्मा या पत्रकारांनी काही आठवडे तिथे भटकंती करून, तिथल्या लोकांशी बोलून चीनच्या महत्त्वाकांक्षी आक्रमणाचे वृत्त दिले आहे. चीन आपल्या भागात घुसखोरी करत आहे याचा तेथील नेपाळी जनतेला राग आहेच, त्याच्या जोडीला चीन त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनावरही स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे याचीही त्यांना भीती वाटत आहे.

नेपाळमधील तिबेटींबाबत चीनची भूमिका काय?

चीनचे सुरक्षा सैनिक तेथील स्थानिक तिबेटी नेपाळींना दलाई लामा यांच्या प्रतिमा दर्शनी भागात ठेवण्यास मनाई करत आहेत. चीनचे विस्तारणारे अडथळे आणि इतर संरक्षक उपायांमुळे स्थानिकही विभागले गेले आहेत. दलाई लामा यांच्याबरोबर चिनी सरकारच्या तावडीतून सुटून पळून आलेले हजारो तिबेटी आता या भागात दिसेनासे झाले आहेत.

नेपाळ सरकारचा प्रतिसाद कसा आहे?

स्थानिक नागरिक काहीही सांगत असले तरीही नेपाळचे नेते चीन घुसखोरी करत असल्याचे मान्य करायला तयार नाहीत. अलिकडील काळात आर्थिक कारणांमुळे चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळे असेल कदाचित, पण हुमला जिल्ह्यालगतच्या चीनच्या कारवायांची तपशीलवार माहिती देणारा २०२१च्या सत्यशोधन अहवालाकडे सर्वच नेपाळी सरकारांनी दुर्लक्ष केले आहे. नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर सुरू असलेले बांधकाम म्हणजे चीनची दुसरी भिंत आहे आणि आम्ही त्याकडे कानाडोळा करावा अशी त्यांची इच्छा असल्याचे त्या भागातील माजी मुख्यमंत्री जीवन बहादूर शाही यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले. याच वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत नेपाळच्या परराष्ट्रमंत्री आरजू राणा देउबा यांनी, आपल्याकडे कोणत्याही तक्रारी केल्या नसल्याचे सांगत हात वर केले.

हेही वाचा >>> विश्लेषण : रायगड जिल्हा बनलाय बेवारस मृतदेहांचे ‘डम्पिंग ग्राउंड’? कारणे काय? पोलिसांसमोर कोणती आव्हाने?

क्षी जिनपिंग यांचे आक्रमक धोरण

चीन आपल्या सीमेवर हजारो किलोमीटर लांबीची मजबूत तटबंदी उभारत असताना हुमला जिल्ह्यामध्ये केलेली घुसखोरी हा केवळ एक भाग आहे. विद्यमान अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सत्ता हाती घेतल्यापासून शेजारी राष्ट्रांबाबत अधिक आक्रमक धोरण अवलंबले आहे. चीनचा सर्वदूर प्रदेश पूर्णतः सरकारी वर्चस्वाखाली आणणे, बंडखोर गट नियंत्रित करणे आणि काही ठिकाणी शेजारी देशांचा भूप्रदेशही स्वतःचा समजून गिळंकृत करणे हा क्षी जिनपिंग यांचा खाक्या राहिला आहे. चीनभोवती तटबंदी उभारण्याच्या कार्यक्रमाला करोना महामारीच्या काळात वेग मिळाला.

चीनच्या कारवायांचा एकत्रित परिणाम

भारतातील लडाख व अरुणाचल प्रदेश, नेपाळचा हुमला जिल्हा आणि अन्य देशांचे सीमाभाग येथील चीनच्या कारवाया स्वतंत्रपणे पाहिल्या तर तटबंदी उभारणे, प्रदेश वाद उकरून काढणे, वादग्रस्त भागात घुसखोरी करणे हे प्रकार त्या-त्या ठिकाणी तणावाचे कारण असल्याचे वाटू शकते. पण या सर्वांचा एकत्रित परिणाम धक्कादायक आहे. फिलिपिन्स समुद्री प्रदेश म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेला भाग पूर्वी पोवळ्यांच्या बेटासाठी प्रसिद्ध होता. चीनने त्याचे रूपांतर लष्करी तळात केले आहे. लडाखमध्ये चार वर्षांपूर्वी भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झालेला संघर्ष अनपेक्षित होता. त्यानंतर लडाखच्या बाबतीत भारताला अधिक सावध राहावे लागत आहे. पूर्वेला असो किंवा पश्चिमेला, चीनच्या आक्रमकपणामुळे अमेरिकाही या प्रादेशिक वादात पडली आहे. हिंद-प्रशांत प्रदेशामध्ये चीन अधिक धोकादायक, आक्रमक आणि प्रक्षोभक कृती करत असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने मागील वर्षीच्या अहवालात नमूद केले आहे. चीनला वेळीच आळा घातला नाही तर या भागातील अन्य देशांना धमकावण्यास ते मागे पुढे पाहणार नाहीत असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

nima.patil@expressindia.com