बांगलादेशमध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या हिंसाचारामुळे देशाला अस्थिर केले आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन केले आहे. देशभर झालेल्या हिंसाचारात शेकडो लोकांचा बळी गेला आहे. शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. बांगलादेशात सध्या काळजीवाहू सरकार स्थापन झाले आहे. तेथील या अराजकतेचा मोठा फटका बांगलादेशातील रुग्णांना बसला आहे, पर्यायाने तो भारतातील वैद्यकीय व्यवसायालाही बसत आहे. वैद्यकीय पर्यटन ही संकल्पना यामुळे कशी प्रभावित झाली ते पाहू.
बांगलादेशातील रुग्णांचा भारताकडे ओढा का?
शस्त्रक्रियेचा तुलनेने कमी खर्च, उच्च-गुणवत्तेच्या सुविधा, प्रगत तंत्रज्ञान असलेली रुग्णालये आणि विस्तारित ई-वैद्यकीय व्हिसा सुविधेमुळे आणि रुग्ण सेवेतील विश्वासार्हता यामुळे बांगलादेशातील रुग्ण भारतातील रुग्णालयांची निवड करतात. बांगलादेशी रुग्णांना भारत सरकार दरवर्षी जास्तीत जास्त म्हणजेच जवळपास ५.५ ते ६ लाख वैद्यकीय व्हिसा जारी करते. २०२३ मध्ये, बांगलादेशातून भारतात वैद्यकीय पर्यटकांची संख्या ४८ टक्क्यांनी वाढून ती ४ लाख ४९ हजार ५७० इतकी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर २०२२ मध्ये हीच संख्या ३ लाख ४ हजार ६७ इतकी होती. संपूर्ण भारतीय रुग्णालय क्षेत्रामध्ये वैद्यकीय पर्यटनाचे योगदान ३ ते ५ टक्के आहे. भारतात येणारे जवळपास ७०-८० टक्के वैद्यकीय पर्यटक हे बांगलादेश आणि पश्चिम आशियातील देशांचे आहेत. त्यामुळेत सध्या बांगलादेशातून होणारी रुग्णघट लक्षात घेता, या क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा परिणाम केवळ आरोग्यसेवा संस्थांपुरता मर्यादित नाही; तर वैद्यकीय पर्यटन परिसंस्थेचा भाग असलेल्या व्यवसायांच्या म्हणजेच रुग्णांसाठीची वसतिगृहे, हॉटेल आणि ट्रॅव्हल कंपन्यांनाही प्रभावित करत आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केव्हा होणार? शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची स्थिती काय?
राजकीय अस्थिरतेचा रुग्णांवर परिणाम?
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे ढाका येथील भारतीय दूतावासाने सध्या व्हिसा देणे तात्पुरते थांबवले आहे. यामुळे मोठ्या संख्येने तेथील रुग्णांनी त्यांच्या भेटी रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. ज्यांना तातडीने शस्त्रक्रिया आवश्यक आहे अशा रुग्ण मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच बांगलादेशात अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद आहे. त्याचा परिणामही रुग्णसेवेवर होत असून डॉक्टरांना मोठ्या वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता असलेल्या रुग्णांशी संवाद साधणे कठीण झाले आहे. त्यामुळे आणखी गुंतागुंत वाढली आहे. मात्र, भारतातील वैद्यकीय व्यावसायिक बांगलादेशातील त्यांच्या रुग्णांबरोबर या कठीण काळातही, तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज असलेल्यांना अडकून पडावे लागणार नाही यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहेत. रुग्णांना आवश्यक ती सेवा मिळावी यासाठी दोन्ही देश एकत्र काम करत आहेत.
हेही वाचा >>> बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसक संघर्ष; सत्तांतरानंतरही बांगलादेशी निषेध का करत आहेत?
आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्यांचे काय म्हणणे आहे?
बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीत रुग्णांशी सातत्यपूर्ण संवाद साधणे जवळजवळ अशक्य आहे. ते उपचार आणि मदत मिळत नसल्याने हताश झाले आहेत. परिस्थितीमुळे त्यांना वेळेवर सेवा प्रदान करणे अत्यंत कठीण झाले असले तरी त्यांच्याशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला जात आहे. टेलिमेडिसिन पर्यायांचा शोध घेत आहोत. तसेच स्थानिक रुग्णालये आणि वैद्यकीय व्यावसायिकांबरोबर संवाद साधत तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना ती तेथेही काही प्रमाणात का होईना मिळेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे भारतातील महत्त्वाच्या रुग्णालयातील प्रतिनिधींनी सांगितले. भारत-बांगलादेश वैद्यकीय पर्यटन संबंधांमधील परस्पर विश्वास आणि सामर्थ्य लक्षात घेऊन लवकरच यावर तोडगा काढला जाण्याची त्यांनी आशा व्यक्त केली.
बांगलादेश सरकारचे काय म्हणणे आहे?
नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली असून, परिस्थिती स्थिर करण्यासाठी ते काम करत आहे. मोहम्मद युनूस यांनी नुकतेच सांगितले की अंतरिम सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट सर्व नागरिकांसाठी मानवी हक्क आणि भाषण स्वातंत्र्य प्रदान करणे आहे. ही स्थिती लवकच निवळेल. रुग्णांना आवश्यक ते उपचार मिळावे यासाठी दोन्ही देश एकत्र काम करत आहेत.