‘शिवसेनेतून जो फुटला तो अल्पकाळ टिकला’ या समीकरणाला उभा छेद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर मिळवलेले यश हे अनेकांना थक्क करणारे ठरले आहे. आधी छगन भुजबळ, नंतर नारायण राणे, त्यानंतर राज ठाकरे या नेत्यांच्या फुटीनंतरही शिवसेना तग धरून राहिली आणि वाढलीदेखील. यापैकी छगन भुजबळ यांचे बंड तर थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच आव्हान देणारे ठरले. बाळासाहेबांचा व्यक्तिगत करिष्मा आणि त्यांचे शिवसैनिकांवर असलेले गारूड या बळावर भुजबळांसोबत आलेले बहुसंख्य आमदारांना मतदारांनी घरी बसविले. राणे आणि राज यांचे बंडही बाळासाहेब हयात असतानाच झाले. परंतु या बंडखोरांचा राग होता तो उद्धव ठाकरे यांच्यावर. या दोघांच्या बंडामुळे शिवसेनेची क्षती निश्चितच झाली, परंतु त्यानंतरही शिवसेना मुंबई आणि राज्यातही सत्तेत आली. शिंदे यांचे बंड मात्र ‘मातोश्री’च्या मुळावरच आघात करणारे ठरले आहे. ‘माझ्यासोबत आलेला एकही आमदार फुटू देणार नाही’ असे भाषण शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरच पहिल्याच अधिवेशनात केले होते. पाच आमदारांचा अपवाद सोडला तर शिंदे यांनी ३५ आमदार निवडून आणलेच शिवाय त्यात २० नव्या आमदारांची भर घातली. शिंदे यांच्या नेतृत्वात उभे राहिलेल्या शिवसेनेच्या या नव्या प्रारूपामुळे ते महाराष्ट्रातील एक यशस्वी ‘बंडखोर’ ठरले आहेत.

शिवसेना आणि बंड हे समीकरण…

शिवसेनेला बंड हे काही नवे नाही. भुजबळ, राणे, राज या मोठ्या नेत्यांचे बंड गाजले असले तरी अनेक लहान-लहान नेत्यांनीही यापूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. पण शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधातील हे बंड तळागाळातील शिवसैनिकांच्या बळावर फारसे कधीच यशस्वी झाले नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर त्यांना नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी कडवे आव्हान उभे केले. त्यानंतरही मुंबई, ठाणे, मराठवाडा या बालेकिल्ल्यात या दोन्ही नेत्यांना शिवसैनिकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. राणे यांच्या बंडाला तळकोकणात मोठी साथ मिळाली. मात्र काही वर्षे उलटताच या भागात पुन्हा एकदा ठाकरे यांच्या शिवसेनेने जोर धरल्याचे पाहायला मिळाले. राणे आणि राज यांना ठाण्याने तर कधीच साथ दिली नाही. उद्धव यांनी शिवसेनेत जे नवे नेते उभे करण्यास सुरुवात केली, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे राज आणि राणे यांचे बंड ठाण्यात मोडून काढल्याचे पाहायला मिळाले. अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसैनिकाची ताकद त्यांच्यामागे उभी होतीच.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

हेही वाचा >>> ‘Walking pneumonia’ काय आहे? जाणून घ्या या गंभीर आजाराची लक्षणे अन् उपाय…

शिंदे यांचे बंड ‘मातोश्री’ने गांभीर्याने घेतले नाही…

शिवसेनेतील यापूर्वीच्या बंडांचा अनुभव लक्षात घेता शिवसैनिक बंडखोरांची फारशी साथ करत नाहीत असेच दिसले. एकनाथ शिंदे यांना ४० आमदारांना सोबत घेत केलेल्या बंडाविषयी सुरुवातीच्या काळात शिवसैनिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. ‘मातोश्री’ला मानणारा मतदार शिंदे यांच्यासोबत राहणार नाही, त्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही अशीच चर्चा सुरुवातीला होती. आदित्य यांनी आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वत: महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत दौरे काढत संवाद यात्रा काढली. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. लोकसभा निवडणुकीतही उद्धव यांनी आक्रमकपणे प्रचार केला. गद्दारी, खोके असे मुद्दे त्यांच्या भाषणातून येत राहिले आणि त्यास प्रतिसादही मिळत गेला. महाराष्ट्रातील पक्षफोडीचे राजकारण मतदारांना रुचत नसल्याचे उद्धव यांच्या सभांना मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसू लागले होते. ठाकरे यांनी उभ्या केलेल्या प्रचाराच्या बळावर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले. त्यानंतर मात्र ठाकरे थंडावल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती होईल या भ्रमात महाविकास आघाडीचे नेते राहिले. दुसरीकडे, एकनाथ शिंदे लोकसभेतील पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले. राज्य सरकारमार्फत आखण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजनांचा रतीब मांडण्याची पद्धतशीर व्यूहरचना शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांनी आखली. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा निवडणुकीत टिकाव लागणार नाही या भ्रमात ठाकरे राहिले. निवडणुकांपूर्वी एका भाषणात शिंदे यांनी ‘मला हलक्यात घेऊ नका’ असा आवाज विरोधकांसह मित्रपक्षांनाही दिल्याची चर्चा रंगली. परंपरागत पद्धतीने त्यांच्या बंडाकडे पाहणाऱ्यांनी नेमकी हीच चूक त्यांच्या बाबतीत केल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा >>> देश संकटात आणि राजाच्या राज्याभिषेकावर दौलतजादा; नागरिकांची आगपाखड

विधानसभेतील यशासाठी पेरणी कशी?

शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची बक्षिसी दिली, तेव्हा शिंदे हे भाजपच्या हातचे ‘बाहुले’ ठरतील आणि सरकारची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राहतील असे दावे राजकीय विश्लेषक करत होते. ठाणे जिल्ह्यात ‘मातोश्री’चे मनसबदार इतकीच काय ती शिंदेंची ओळख. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राची त्यांना ओळख नाही. शिवाय मुख्यमंत्रीपद संभाळण्याइतका त्यांचा राजकीय वकूबही नाही, असे बोलले गेले. लोकसभा निवडणुकीपुरतीच त्यांची उपयुक्तता असेल आणि वापर संपला की भाजप त्यांचे ‘ओझे’ फार काळ खांद्यावर घेणार नाही असेही बोलले गेले. शिंदेंनी मात्र या सर्व शक्यता फोल ठरविल्याचे दिसते. गेल्या सव्वादोन वर्षांत शिंदेंनी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. आपलीच शिवसेना खरी हे पटवून देण्यासाठी ठाकरेंच्या गोटातील अनेकांना आपल्या गोटात आणले. त्यासाठी जे काही करावे लागते ते सगळे हातखंडे त्यांनी वापरले. आपल्यासोबत आलेल्या आमदारांना, नेत्यांना त्यांनी पद्धतशीर बळ दिले. अनेक आमदारांना मतदारसंघातील कामांसाठी काही हजार कोटींच्या घरात निधी त्यांनी दिला. आमदारांसाठी सदैव उपलब्ध असलेला मुख्यमंत्री अशी ओळख त्यांनी निर्माण केलीच. शिवाय पक्ष संघटनेत अनेकांना बळ दिले. विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार कोण असू शकतील याची आखणी त्यांनी केली. वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांत तसेच उमेदवार त्यांनी निवडले. ज्या ठिकाणी उमेदवार नव्हते तेथे भाजपकडे उमेदवार मागितले. संभाव्य उमेदवारांना हेरून त्यांना निवडणुकीच्या काही काळ आधीपासूनच ताकद दिली गेली. आपला उमेदवार कुठेही कमी पडणार नाही याची पद्धतशीर आखणी त्यांनी केली. निवडणुकीसाठी म्हणून जी काही रसद लागते त्यासाठी हात मोकळा सोडला. या सर्वांचा फायदा शिंदे यांना झालेला दिसतो.

शिवसेनेच्या बलस्थानांवरच लक्ष केंद्रित…

एकसंध शिवसेनेची राज्यातील ठराविक भागांत अशी एक ताकद होती. मुंबई हा शिवसेनेचा प्राण तर ठाणे, मराठवाडा, कोकण ही या पक्षाची बलस्थाने राहिली आहेत. या भागात शिवसेनेचे तळागाळात एक जाळे पसरले आहे. रांगडा, रस्त्यावरचा शिवसैनिक ही शिवसेनेची मोठी ताकद राहिली आहे. या संपूर्ण पट्ट्यात शिवसेनेची ही तयार ताकद मुख्यमंत्रीपदाच्या बळावर शिंदे यांनी खेचून आणली. दिल्लीतील ‘महाशक्ती’चे त्यांना लाभलेले समर्थन, राज्यातील संपूर्ण शासकीय यंत्रणेवर मिळवलेला ताबा या बळावर त्यांनी सगळे उपाय आखत वेगवेगळ्या भागांमधील शिवसेनेतील प्रभावी नेत्यांना आपल्या कवेत घेतले. जे सहज आले त्यांचे स्वागत केले. जे येत नाहीत त्यांची चहुबाजूंनी कोंडी केली. आपल्याकडे ‘ठाकरे’ नावाचा करिष्मा नाही याची जाणीन शिंदेंना सुरुवातीपासून होती. आपल्या शिवसेनेचा राज्यभर विस्तार करण्यासाठी त्यांनी साम, दाम, दंड, भेद असे सर्व हातखंडे वापरले. प्रशासन, पोलीस, उद्योग वर्तुळात स्वत:चा दबदबा कायम राहील अशा पद्धतीची रचना केली. त्यासाठी योग्य ठिकाणी आपली माणसे नेमली, पेरली. या सर्वांचा फायदा त्यांना झालेला दिसतो.