संजय जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान चालवण्यापूर्वी वैमानिक चांगल्या स्थितीत आहेत याची खात्री करण्यासाठी नवे फ्लाइट डय़ूटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) नियम आणले आहेत.

नवे नियम कशासाठी?

व्यावसायिक विमान चालविण्यास परवानगी देण्यापूर्वी व्यावसायिक वैमानिकांना अनेक महिने कठोर प्रशिक्षण आणि चाचण्या द्याव्या लागतात. पूर्ण कार्यक्षमतेने उड्डाण करण्यास पात्र होण्यासाठी वैमानिकांनी काही विश्रांती नियमांचे पालन करणे गरजेचे असते. जगभरात नागरी विमान वाहतूक नियामक वैमानिकांमधील थकवा कमी करण्यासाठी विमान कर्मचाऱ्यांच्या कामाचे वेळापत्रक आणि विश्रांतीचा कालावधी निश्चित करण्यासाठी विविध निकष वापरतात. त्यामुळे हवाई सुरक्षेत सुधारणा होते. आपल्याकडे  नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) यासाठी नवे फ्लाइट डय़ूटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) नियम आणले आहेत. हे निकष लागू करण्यासाठी विमान कंपन्यांना नेमका किती वेळ लागेल याची विचारणाही करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत नियामकांना निर्देश दिले आहेत.

हेही वाचा >>> जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?

वैमानिकांच्या तक्रारी काय आहेत?

थकवा येणे म्हणजे कामगिरी करण्याची क्षमता कमी होणे असते. त्यात मानसिक किंवा शारीरिक कार्यावर परिणाम होतात. अपुरी झोप, दिवस-रात्रीच्या वेळापत्रकातील बदल ही यासाठी प्रमुख कारणे आहेत. वैमानिक अनेकदा अपुऱ्या झोपेशी निगडित तीव्र थकव्याबद्दल तक्रार करतात. रात्रीची उड्डाणे, वेगवेगळे टाइम झोन ओलांडणे आणि वारंवार झोपेतून लवकर उठण्याच्या आवश्यकतांसह कामाच्या वेळापत्रकाशी निगडित वैमानिकांच्या तक्रारी आहेत. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेने (आयसीएओ) विमान कंपनी ज्या देशातील असेल त्या देशातील नियामकांनी यासंदर्भात नियम लागू करणे बंधनकारक केले आहे. देशातील नियामकांनी उड्डाणाची वेळ, उड्डाण करण्याचा कालावधी, कामाचे तास आणि विश्रांती कालावधी मर्यादा यासाठी नियम लागू करणे आवश्यक आहे. यामुळे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने वैमानिकांना चांगली विश्रांती मिळावी आणि जलद निर्णय घेता यावेत यासाठी नवे नियम तयार केले आहेत.

नवीन नियम कोणते आहेत?

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने ८ जानेवारीला नवीन एफडीटीएल नियम लागू केले. त्यात वैमानिकांना अतिरिक्त विश्रांती, रात्रपाळीच्या नियमांमध्ये सुधारणा आणि विमान कंपन्यांना वैमानिकाचा थकवा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियामकांनी विमान कंपन्यांना १ जूनपर्यंत नवीन नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. नवीन नियमानुसार विमानातील कर्मचाऱ्यांचा साप्ताहिक विश्रांतीचा कालावधी ३६ तासांवरून ४८ तासांपर्यंत वाढविण्यात आला आहे. याचबरोबर रात्रीच्या व्याख्येत सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वीच्या नियमांनुसार मध्यरात्री ते पहाटे पाचऐवजी मध्यरात्री ते पहाटे सहापर्यंतचा कालावधी रात्रीत समाविष्ट असेल. या तासाच्या वाढीमुळे वैमानिकाला अधिक विश्रांती मिळेल. नवीन नियमांमध्ये आता वेगवेगळया टाइम झोनमधील उड्डाणांचा विचार करण्यात आला आहे. रात्रीच्या उड्डाणांचा जास्तीत जास्त आणि कामाचा कमाल कालावधी अनुक्रमे आठ आणि १० तास करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> Too Much Heat: प्रचंड उकाड्यामुळे वकिलांना ड्रेसकोडमधून सवलत; काय आहेत नियम?

नवीन नियमांची गरज का निर्माण झाली?

नियोजित प्रशिक्षण सत्रासाठी ३७ वर्षीय कॅप्टन हिमनील कुमार हे १६ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांच्या सुट्टीवरून परत येत होते. दिल्ली विमानतळावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि जवळच्या खासगी रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे, ऑगस्ट २०२३ मध्ये ४० वर्षीय मनोज सुब्रमण्यम यांचा नागपुरात उड्डाणाच्या काही मिनिटांपूर्वी अशाच परिस्थितीत मृत्यू झाला. यातून विमान उद्योगातील वैमानिकांच्या तणावाचे वास्तव प्रकर्षांने समोर येते. नुकतेच, इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशनने (आयसीपीए) एअर इंडियाला पत्र लिहून कामाच्या वेळापत्रकाच्या विरोधातील त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याची मागणी केली होती. विमानातील कर्मचाऱ्यांना अगदी कमी वेळात सूचना देऊन कामाच्या वेळेत बदल केले जात असल्याचा मुद्दा आयसीपीएने अधोरेखित केला. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला होता.

विमान कंपन्यांना मुदतवाढ का हवी?

फेडरेशन ऑफ इंडिया एअरलाइन्सने (एफआयए) नवीन नियमांना आक्षेप घेतला आहे. त्यात इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा आणि स्पाइसजेट या कंपन्यांचा समावेश आहे. नवीन नियमांमुळे वैमानिकांची संख्या २५ टक्क्यांनी वाढवावी लागेल आणि त्यांना नियुक्ती आणि प्रशिक्षण द्यावे लागेल. हे १ जूनपर्यंत शक्य होणार नाही. यामुळे २० टक्के उड्डाणे रद्द करावी लागतील. नवीन नियम संदिग्ध असून इतर देशांतील नियमांपेक्षा कठोर आहेत. यामुळे भारतीय विमान वाहतूक उद्योग इतर देशांच्या तुलनेत स्पर्धा करू शकणार नाही, असे फेडरेशनचे म्हणणे आहे. विमान कंपन्या नवीन नियम लागू करण्यासाठी वेळ मागत आहेत.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis importance of rest for airline pilots print exp zws
Show comments