देवेश गोंडाणे
नागपुरात दर तीन वर्षांनी होणाऱ्या प्रतिनिधी सभेचे वैशिष्ट्य म्हणजे यात संघात सरसंघचालकांनंतर दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद असलेल्या सरकार्यवाह या पदावर निवड केली जाते.
दहा वर्षे केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या यशात आणि राम मंदिर उभारणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अशातच आता लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर नागपूरमध्ये होणाऱ्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला महत्त्व आहे. ही प्रतिनिधी सभा नेमकी काय असते, संघाच्या एकूण कार्यप्रणालीत या बैठकीचे महत्त्व काय, हे जाणून घेण्याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.
संघाची प्रतिनिधी सभा काय असते?
देशभरात भरणाऱ्या नियमित शाखा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कणा आहे. सध्या देशात ७३ हजार नियमित शाखा सुरू आहेत. याशिवाय ३५ पेक्षा अधिक स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून संघाचे सेवाकार्य आणि विविध उपक्रम सुरू असतात. या सर्व कामांचा आढावा घेणे आणि पुढील वर्षासाठी नियोजन करणे यासाठी दरवर्षी देशाच्या विविध भागात संघातर्फे अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आयोजित केली जाते. नागपूरमध्ये ती दर तीन वर्षांनी संघाच्या स्मृती मंदिर परिसरात होते. यंदा १५ ते १७ मार्च अशी तीन दिवस ही सभा चालणार आहे. सभेसाठी नियमित संघ शाखांमधून ( ४० शाखांमधून एक ) निवडलेले २०३ प्रतिनिधी, देशभरातील १५०० हून अधिक स्वयंसेवक, प्रांत संघ चालक, प्रांत कार्यवाह, त्यांचे सहाय्यक असे अखिल भारतीय कार्यकारी मंडळ मंडळाचे ४३५ प्रतिनिधी, ४५ प्रांतांतील कार्य विभागाचे ३०० प्रमुख, संघाच्या ३५ पेक्षा अधिक संघटनांचे प्रमुख आणि ४५ महिला प्रतिनिधी बैठकीला उपस्थित आहेत. या प्रतिनिधींकडून त्यांच्या कामांचा आढावा घेऊन भविष्यातील योजनांची त्यांना माहिती दिली जाते. तसेच विविध प्रस्तावांवर बैठकीमध्ये चर्चा होते.
हेही वाचा >>> विश्लेषण : पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला का? बीडचे मैदान कितपत आव्हानात्मक?
नागपूरच्या प्रतिनिधी सभेचे महत्त्व काय?
संघाच्या प्रतिनिधी सभेची सुरुवात ही कार्यकारी मंडळाच्या बैठकीने होते. यामध्ये सरकार्यवाह वर्षभरातील कामांचा अहवाल सादर करतात. तसेच विविध राज्यातून आलेल्या प्रतिनिधींकडून त्यांच्या कामांची माहिती घेतली जाते. याशिवाय सरसंघचालकांच्या वर्षभरातील शाखा भेटी आणि कार्यक्रमांची आखणी केली जाते. नागपुरात दर तीन वर्षांनी होणाऱ्या प्रतिनिधी सभेचे वैशिष्ट्य म्हणजे यात संघात सरसंघचालकांनंतर दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद असलेल्या सरकार्यवाह या पदावर निवड केली जाते. यासाठी सुरुवातीला क्षेत्र संघचालकांची निवड होऊन त्यानंतर संघाचे प्रतिनिधी सरकार्यवाह यांची निवड करतात. त्यामुळे यंदाच्या बैठकीमध्ये विद्यमान सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची फेरनिवड होणार, की नवीन चेहरा येणार याची उत्सुकता आहे. भारतीय जनता पक्षाच्या यशात संघाचा मोठा वाटा आहे. आता लोकसभा निवडणुका असल्याने सभेला भाजपचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. सभेत संघाकडून भाजपला कोणते दिशानिर्देश दिले जातात हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
रामजन्मभूमीच्या प्रस्तावात काय असेल?
रामजन्मभूमी आंदोलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. संघाच्या यापूर्वीच्या प्रतिनिधी सभांमध्ये अनेकदा रामजन्मभूमीचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. राम मंदिर प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्ताने अक्षता वाटपाच्या माध्यमातून संघाने ५ लाख ९८ हजार गावांत १९ कोटी ३८ लाख लोकांशी संपर्क साधला. ज्यामध्ये ४४ लाख कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. २२ जानेवारीला झालेल्या श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सरसंघचालक डॉ. माेहन भागवतही उपस्थित होते. “ही नव्या पर्वाची सुरुवात आहे” असे भागवत त्यावेळी म्हणाले होते व त्यांनी हिंदू बळकटीकरणाचा नारा दिला होता. राममंदिराची निर्मिती ही ऐतिहासिक घटना आहे, असे संघाला वाटते. त्यामुळे भविष्यातील योजना ठरवण्यासाठी प्रतिनिधी सभेत यासंदर्भात प्रस्ताव ठेवला जाणार आहे.
विश्लेषण : निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांचे सर्वांत मोठे देणगीदार कोण?
शताब्दी वर्षात संघाचे नियोजन काय?
संघ स्थापनेला २०२५ च्या विजयादशमीला शंभर वर्षे पूर्ण होणार असल्याने प्रतिनिधी सभेत संघ भविष्यातील काही लक्ष्य निर्धारित करून त्यावर चर्चा घडवून आणण्याची शक्यता आहे. संघाच्या शाखांमध्ये दरवर्षी वाढ होत असली तरी शताब्दी वर्षात कार्यविस्तारावर योजना तयार केली जाणार आहे. सध्या संघाच्या ७४ हजार शाखा नियमित सुरू असून शताब्दी वर्ष सुरू होण्याआधी ही संख्या १ लाख शाखांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. तरुण आणि नोकरदार वर्गाला संघामध्ये जोडण्यासाठी संघाच्या प्रशिक्षण वर्ग प्रणालीत यावर्षीपासून बदल होणार आहे. अगोदर प्राथमिक, प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष वर्ग असायचे. मात्र आता संघ समजून घेण्यासाठी तीन दिवसांचा प्रारंभिक वर्ग, ७ दिवसांचा प्राथमिक वर्ग, १५ दिवसांचा संघ शिक्षा वर्ग, २० दिवसांचा कार्यकर्ता विकास वर्ग-१ आणि तृतीय वर्षाच्या जागेवर २५ दिवसांचा कार्यकर्ता विकास वर्ग-२ असे स्वरूप असेल.
संघाचे पंच परिवर्तन काय आहे?
संघाने शताब्दी वर्षात पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र राबवण्यावर भर दिला आहे. या सूत्रात सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्व-आधारित व्यवस्थेचा आग्रह आणि नागरी कर्तव्य यांचा समावेश राहणार आहे. या पाचही सूत्रांवर प्रतिनिधी सभेत विचारमंथन होईल. पंचपरिवर्तनांतर्गत सामाजिक परिवर्तनाचे काम केले जाणार आहे. देशाच्या राज्यघटनेलाही ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. अशा स्थितीत लोकांना त्यांच्या नागरी कर्तव्याची जाणीव करून देण्यावर संघाचा भर राहणार आहे.