अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन (३२) याने नुकतीच पोलीस कोठडीत आत्महत्या केली. गेल्या नऊ महिन्यांत मुंबईत पोलीस कोठडीत आरोपीने आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे. गंभीर बाब म्हणजे हा प्रकार घडला त्यावेळी तेथे चार सुरक्षा रक्षक तैनात होते. या पार्श्वभूमीवर कोठडीतील आरोपींचे मृत्यू, त्यांची चौकशी याबाबत आढावा
अनुज थापन मृत्यू प्रकरण काय आहे?
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घरावर गोळीबार केल्याप्रकरणात गुन्हे शाखेने सागर पाल (२१), विकीकुमार गुप्ता (२४), सोनूकुमार बिश्नोई (३५) आणि अनुज थापन (३२) यांना अटक केली होती. त्यांना गुन्हे शाखेने मुंबई पोलीस आयुक्तालयातील कोठडीत ठेवले होते. मुंबई पोलीस आयुक्तालयातील ज्या कोठडीत अनुज थापन याला ठेवण्यात आले होते, तेथे आर्थिक गुन्हे शाखेचे आणि गुन्हे शाखेचे आरोपी एकत्र होते. सुरक्षा आणि देखरेखीसाठी चार पोलिसांना तैनात करण्यात आले होते. थापन याने बुधवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान कोठडीतील शौचालयात फाडलेल्या चादरीचा तुकडा आणि खिडकी यांच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. थापन याच्या कोठडीतील मृत्यूची नोंद आझाद मैदान पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सीआयडीकडून याप्रकरणी तपास करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालातही गळफासामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : इस्रायल आणि हमासदरम्यान युद्धविरामाला उशीर का? चर्चेचे घोडे नेमके कुठे अडते?
मुंबईत यापूर्वीही असे प्रकार…
एखाद्या आरोपीने कोठडीत आत्महत्या केल्याची नऊ महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी ८ सप्टेंबर २०२३ रोजी, मरोळ (पवई) निवासी सोसायटीतील हाऊसकीपिंग कर्मचारी विक्रम अटवाल (४०) याने अंधेरीतील पोलीस कोठडीत कथितरित्या आत्महत्या केली होती. त्याच्यावर ३ सप्टेंबर रोजी हवाई सेविका तरुणीचा मरोळ येथील सदनिकेत खून केल्याचा आरोप होता. अटवालनेही कोठडीतील शौचालयात गळफास घेतला होता. त्याने टोकाचे पाऊल का उचलले त्यामागचे कारण स्पष्ट झाले नाही. परंतु त्याच्या गुन्ह्यामुळे त्याच्या कुटुंबाची बदनामी होऊ शकते, या चिंतेने त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अटवालच्या आत्महत्येपूर्वी साधारण दीड महिना आणखी एका खुनाच्या घटनेतील आरोपीने आत्महत्या केली होती. दीपक जाधव (२८) याने २८ जुलै रोजी बोरिवली येथे कोठडीत आत्महत्या केली होती. बोरिवली पश्चिमेतील रहिवासी असलेल्या जाधवला पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी एका खुनाच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथे त्याला मारहाण केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेतले होते आणि त्याला २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली होती. त्याला सामान्य पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र पुन्हा न्यायालयात हजर करण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. सलमान खानच्या घरावरील गोळीबार झाल्या प्रकरणातील आरोपींवर नुकताच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येनंतर शहरातील पोलीस कोठडीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हेही वाचा >>> विश्लेषण : पीक कर्जवाटपात शेतकरी समाधानी आहेत?
देशभरातील आकडेवारी काय सांगते?
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार २०२१-२२ (फेब्रुवारीपर्यंत) दोन हजार १५२ आरोपींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. तसेच १५५ आरोपींचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. न्यायालयीन कोठडीतील मृत्यू उत्तर प्रदेशात सर्वाधिक आहेत. तेथे ४४८ आरोपींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्या खालोखाल महाराष्ट्रात १२९ जणांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. देशात दररोज सरासरी ६ आरोपींचा कोठडीत मृत्यू होतो.
कोठडीतील मृत्यूप्रकरणी चौकशी कशी होते?
कोठडीत एखाद्या आरोपीचा मृत्यू झाल्यास त्याप्रकरणी त्रयस्थ तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येते. मुंबईत गुन्हे शाखा याबाबत तपास करते, तर राज्य पातळीवर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास केला जातो. पण अनुज थापनचा मृत्यू गुन्हे शाखेच्या कोठडीत असताना झाल्यामुळे याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे चौकशी करण्यात येत आहे. आरोपीच्या कोठडीतील मृत्यूननंतर सीआरपीसी कायद्याच्या कलम १७४ अन्वये तपास यंत्रणेद्वारे चौकशी केली जाते. याशिवाय सीआरपीसी कायद्याच्या कलम १७६ अन्वये न्यायालयीन चौकशी करण्यात येते. त्याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर कोणी दोषी आढळल्यास त्या पोलिसावर कारवाई करण्यात येते.