संदीप कदम
भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ४३४ धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात भारताच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव गडगडला. यामुळे त्याच्या ‘बॅझबॉल’ शैलीवर टीका होताना दिसत आहे. भारताने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ रणनीतीला मोडीत काढले का, भारताच्या गोलंदाजांची भूमिका आतापर्यंत कशी राहिली, उर्वरित कसोटी सामन्यांमध्येही इंग्लंडचा संघ याच शैलीने खेळणार का, याचा आढावा.
गेल्या दोन कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पराभवाचे कारण काय?
इंग्लंडच्या संघाने ब्रेंडन मॅककॅलम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना ‘बॅझबॉल’ शैलीचा अवलंब केला आणि कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. कसोटी क्रिकेटमध्ये संयमाने फलंदाजी करावी लागते. मात्र, इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीने त्याच्या फलंदाजीत बदल पाहायला मिळाला. मॅककलमला ‘बॅझ’ या टोपणनावाने संबोधले जाते. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक पवित्रा स्वीकारल्यानंतर त्यांच्या या शैलीला ‘बॅझबॉल’ अशा नावाने संबोधले जाऊ लागले. हैदराबाद येथील पहिल्या कसोटीत फलंदाजांच्या या शैलीचा फायदा संघाला झाला व संघाने दुसऱ्या डावात सरस खेळ करत भारताला नमवले. मात्र, विशाखापट्टणम व राजकोट येथे झालेल्या दुसऱ्या व तिसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडला याचा फटका बसला. विशेष म्हणजे या सामन्यांमध्ये त्यांचे फलंदाज ‘स्विप’, ‘रिव्हर्स स्विप’, ‘स्कूप’ सारख्या फटक्यांचा गरज नसताना अतिरेक करताना दिसले. त्यामुळे संयमाने फलंदाजी करण्याच्या वेळेही त्यांनी आक्रमक खेळ केला व भारतीय गोलंदाजांनी त्याचा फायदा घेत चमक दाखवली. त्यामुळे भारताने ‘बॅझबॉल’ शैलीचे कोडे सोडवल्याची सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : जेरबंद वाघांची सुटका का होत नाही?
इंग्लंडच्या पराभवात भारतीय गोलंदाजांची भूमिका निर्णायक का?
इंग्लंड भारत दौऱ्यावर आल्यानंतर भारतीय गोलंदाज त्यांच्या ‘बॅझबॉल’ शैलीसमोर टिकणार नाही, असे दिसत होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी परिस्थितीनुसार चतुराईने गोलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांच्या अडचणी वाढवल्या. भारताकडे मोहम्मद शमीसारखा अनुभवी खेळाडू नव्हता तरीही, भारताने सांघिक कामगिरीवर भर दिला. पहिल्या कसोटीतील पराभवातून सावरताना दुसऱ्या सामन्यात बुमराने नऊ गडी बाद केले. त्याला कुलदीप यादव व रविचंद्रन अश्विन यांची साथ मिळाली. तिसऱ्या कसोटीत आपल्या घरच्या मैदानावर खेळताना रवींद्र जडेजाने शतक झळकावण्यासह सात गडी बाद केले. ‘बॅझबॉल’ शैलीचा सामना करताना धावा असणेही तितकेच गरजेचे आहे. भारताच्या युवा फलंदाजांनी दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत धावा करीत भारतीय गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी पुरेसा वेळ दिला व त्याचा फायदाही संघाला झालेला पाहायला मिळाला.
रूटच्या निराशाजनक कामगिरीचा इंग्लंड संघाला फटका?
जो रूट हा इंग्लंडच्या मध्यक्रमातील दिग्गज फलंदाज ओळखला जातो. ‘फॅब फोर’मधील एक खेळाडू अशी ओळख असलेल्या रूटने मात्र आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या कसोटीत २९ व २, दुसऱ्या कसोटीत ५ व १६ आणि तिसऱ्या कसोटीत १८ व ७ अशी कामगिरी केली. रूट मॅककॅलमच्या ‘बॅझबॉल’ शैलीला रुळला नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे. रूट हा संयमी खेळासाठी ओळखला जातो. मात्र, सध्या सुरू असलेल्या मालिकेत रूट स्वत:च्या चुकीने बाद झाला आहे. तो ‘बॅझबॉल’ शैलीचा अवलंब करण्याच्या नादात आपला मूळ खेळ विसरला आहे, असे अनेकांना वाटते. रूटने आपल्या कसोटी कारकीर्दीत १३८ सामन्यांत ११४९३ धावा केल्या आहेत. यामध्ये ३० शतकांचाही समावेश आहे. तो जेम्स अँडरसननंतर संघातील दुसरा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. मात्र, त्याला लय न सापडणे ही संघाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यामुळे इंग्लंडला मालिकेत पुनरागमन करायचे झाल्यास रूटला लय सापडणे महत्त्वाची आहे.
हेही वाचा… शेतकर्यांबरोबर चर्चेच्या चौथ्या फेरीत काय ठरले? शेतकऱ्यांसाठी केंद्राची पंचवार्षिक योजना काय आहे?
तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार बेन स्टोक्स काय म्हणाला?
सामन्यात पराभव मिळाला असला, तरीही आमच्याकडे अजूनही दोन सामने शिल्लक आहेत आणि कर्णधार म्हणून आम्ही मालिका ३-२ अशी जिंकू असा विचार आम्ही करीत आहोत, असे स्टोक्स सामन्यानंतर म्हणाला. सलग दोन सामन्यांमधील पराभवानंतर कसोटी क्रिकेटमधील आमच्या खेळण्याच्या दृष्टिकोनात बदल होणार नसल्याचे स्टोक्सने स्पष्ट केले. ‘‘आमच्या फलंदाजी क्रमवारीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील फलंदाज आहेत. त्यामुळे ते परिस्थितीनुसार खेळू शकतात. त्यामुळे आम्ही खेळण्याची शैली बदलणार नाही. गेल्या दोन सामन्यांत भारताने मोठी धावसंख्या उभारली व त्यांना अशाच शैलीत खेळायचे आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये आमचा प्रयत्न सातत्यपूर्ण कामगिरीचा राहील,’’ असे स्टोक्सने सांगितले.
इंग्लंडच्या माजी कर्णधारांनी ‘बॅझबॉल’ शैलीवर का टीका केली?
इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन व मायकल वॉन यांनी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीवर टीका करताना संघाने प्रत्येकवेळी आक्रमक खेळ करण्याऐवजी सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळ करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. बेन स्टोक्स व ब्रेंडन मॅककॅलम यांच्या नेतृत्वाखालील संघाची ही निराशाजनक कामगिरी होती. प्रत्येक वेळी तुम्ही आक्रमक खेळ करू शकत नाही. तुम्हाला परिस्थितीनुसार खेळ करावा लागतो. स्टोक्स व इतर खेळाडूंसाठी तिसऱ्या कसोटीतील पराभव ही चेतावनी आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी तिसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल यांनी कशी फलंदाजी केली हे पाहायला हवे. त्यांनी सुरुवातीचे ३० ते ४० चेंडू सावधपणे खेळ केला. नंतर फटके मारण्यास सुरुवात केली. असे वॉनने सांगितले. रूटच्या फटक्यांच्या निवडीबाबत हुसेन यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘रूटला फटके मारण्यासाठी योग्य वेळ समजून घ्यावी लागेल. भारताकडे अश्विनच्या रूपात एक गोलंदाज कमी होता. जडेजा दुखापतीनंतर खेळत होता. तर, बुमरा सलग तिसरी कसोटी खेळत होता. जेथे रूटला संयमाने खेळण्याची गरज होती, तेथे तो चुकीचा फटका मारून बाद झाला. जे संघासाठी फायद्याचे नव्हते,’’ असे हुसेनने सांगितले.