अनिकेत साठे
इराणने ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी केलेला हल्ला इस्रायली ‘आयर्न डोम’ या क्षेपणास्त्ररोधक बचाव प्रणालीने निष्प्रभ ठरवला. क्षेपणास्त्रांच्या वर्षावात कुठल्याही देशाच्या शस्त्रागारात अशी संरक्षण प्रणाली महत्त्वाचे साधन झाली आहे. जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी क्षेपणास्त्रांसह अन्य हवाई हल्ल्यांपासून संरक्षण कवच प्राप्त करण्याचा हा मार्ग आहे. भारतानेही शत्रूूच्या क्षेपणास्त्राचा पाठलाग करून ती हवेत नष्ट करणारी (इंटरसेप्टर) क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे.
क्षेपणास्त्ररोधक बचाव प्रणाली कशी असते?
आपल्या भूमीवर हल्ला करण्यासाठी झेपावलेल्या क्षेपणास्त्रांची ओळख पटवून ते मार्गात नष्ट करणारी प्रणाली, अशी क्षेपणास्त्ररोधक बचाव वा हवाई संरक्षण प्रणालीची सर्वसाधारण ओळख. इस्रायलच्या बहुविध हवाई संरक्षण प्रणालीतील आयर्न डोमचा विचार करता ती रडार यंत्रणा, येणाऱ्या रॉकेट्सची मोजदाद व विश्लेषण करण्यासाठी संगणक आणि हल्ला रोखण्यासाठी क्षेपणास्त्र (इंटरसेप्टर) डागण्याची फिरती व्यवस्था, अशा तीन गटांत विभागली आहे. क्षेपणास्त्र डागण्याच्या विशेष व्यवस्थेने (लाँचर) सुसज्ज लष्करी वाहने देशात मोक्याच्या ठिकाणी तैनात असतात. अवकाशात रडारला काही धोका आढळल्यास माहिती त्वरित युद्ध व्यवस्थापन केंद्रात पाठविली जाते. येथे तिचे विश्लेषण होऊन येणाऱ्या धोक्याला निष्फळ करण्यासाठी फिरती पथके क्षेपणास्त्र डागण्यासाठी सज्ज असतात. हे सर्व कार्य अल्पावधीत पार पडते. अहोरात्र ही प्रणाली कार्यरत असते. आयर्न डोमची रचना ७० किलोमीटरपर्यंत कमी पल्ल्याच्या रॉकेट्सला रोखण्यासाठी केली आहे. हे क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण कवच शत्रूची ९० टक्के क्षेपणास्त्रे मार्गात रोखू शकते. इराणने डागलेल्या रॉकेट्सपैकी ९९ टक्के रॉकेट या प्रणालीने रोखले. ही प्रणाली नसती तर मृत किंवा जखमी झालेल्या इस्रायलींची संख्या कितीतरी अधिक असती, हे इस्रायली लष्कराने मान्य केले आहे.
हेही वाचा >>> Adolf Hitler: नरेंद्र मोदी सरकारने मान्य केलेल्या ‘आर्यां’चे हिटलरलाही आकर्षण होते, नेमकं कारण काय?
भारतीय प्रणाली काय आहे?
भारताने आयर्न डोमशी समतुल्य स्वदेशी बनावटीची आकाश (सॅम) हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली तयार केली आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केले. एकाच फायरिंग युनिटचा वापर करून, २५ किलोमीटर अंतरावर एकाच वेळी चार लक्ष्यांचा वेध घेण्यास सक्षम असणारी ही पहिलीच प्रणाली आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेडकडून आकाश सॅमचे उत्पादन होते. देशातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या भागीदारीतून त्याची निर्मिती झाली. यातील ९६ टक्के घटक देशात तयार होतात.
तिची वैशिष्ट्ये कोणती?
दशकभरापासून आकाश प्रणाली भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या सेवेत आहे. असुरक्षित क्षेत्र व ठिकाणांचे हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही कमी पल्ल्याची हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आहे. एकाच वेळी अनेक लक्ष्ये वेधण्याची तिची क्षमता आहे. इलेक्ट्रॉनिक विरोधी उपायांमुळे ही प्रणाली शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक जॅमिंग आणि अन्य मार्ग चुकवण्याच्या प्रयत्नांना अटकाव करते. संपूर्ण शस्त्र प्रणाली एका वाहनावर समाविष्ट केलेली आहे. तिची रचना सध्याच्या व भविष्यातील हवाई संरक्षण परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अनुकूल आहे. जानेवारीत नव्या पिढीच्या आकाश-एनजी या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची अत्यंत कमी उंचीवर वेगवान हवाई लक्ष्याविरुद्ध यशस्वी चाचणी पार पडली. ती वेगवान, चपळ हवाई धोक्यांना रोखू शकते. या चाचणीमुळे वापरकर्त्याच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यापासून संरक्षण कवच पुरवणारी आकाश ही किफायतशीर प्रणाली आहे. अनेक देशांना तिची भुरळ पडली आहे. यानिमित्ताने शस्त्रास्त्र निर्यातीचे दालन खुले झाले आहे. आर्मेनिया हे आकाश सॅम भारताकडून खरेदी करणारे पहिले राष्ट्र ठरले. ब्राझील, फिलिपिन्स आणि इजिप्तसह अनेक दक्षिण अमेरिकन, आफ्रिकन आणि पश्चिम आशियाई देश तिच्यात स्वारस्य दाखवत आहेत.
हेही वाचा >>> गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? का आहे हे संशोधन महत्त्वाचे?
बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बचाव प्रणाली…
लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करण्यासाठी (बीएमडी) हाती घेण्यात आलेला हा प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्यात पृथ्वी हवाई संरक्षण आणि अश्विन प्रगत हवाई संरक्षण इंटरसेप्टर्सवर आधारित हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात एडी – एक आणि एडी – दोन या दोन क्षेपणास्त्रांचा विकास प्रगतीपथावर आहे. एडी – एक हे स्वदेशी इंटरसेप्टर क्षेपणास्त्र आहे. त्याची रचना लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि विमानांना निष्प्रभ करण्याच्या दृष्टीने करण्यात आली. पृथ्वीच्या वातावरणात आणि वातावरणाबाहेर जाऊनही ते पाठलाग करू शकते. दोन टप्प्यांतील यंत्रणेद्वारे ते संचालित होते. प्रगत नियंत्रण प्रणाली, दिशादर्शन आणि मार्गदर्शन व्यवस्थेमुळे हे क्षेपणास्त्र वायुवेगाने अचूक लक्ष्यभेद करू शकते.
बीएमडीचे महत्त्व कसे?
क्षेपणास्त्र आणि अन्य हवाई हल्ल्यांपासून मोठ्या क्षेत्राचे संरक्षण करण्यास ही परिपूर्ण प्रणाली असल्याचे डीआरडीओचे म्हणणे आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रणाली पाच हजार किलोमीटर मारक क्षमतेच्या क्षेपणास्त्रांना रोखू शकते. शक्तिशाली रडारने ती सुसज्ज आहे. रडारला शत्रूच्या क्षेपणास्त्राचा सुगावा लागला की, त्याचा माग काढून संरक्षण प्रणाली कार्यान्वित होईल. तिची अचूक लक्ष्यभेदाची संभाव्यता ९९.८ टक्के आहे. एकाच वेळी वेगवेगळी लक्ष्ये भेदण्याची तिची क्षमता आहे. चीन आणि पाकिस्तान या दोन शेजाऱ्यांकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वेगाने विकास होत आहे. चिनी क्षेपणास्त्र भारतातील कुठल्याही शहरावर हल्ला करण्याची क्षमता राखून आहे. या परिस्थितीत देशातील प्रमुख शहरे, ठिकाणांना हवाई हल्ल्यांपासून संरक्षण कवच देण्यात बीएमडी प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.