संजय जाधव
गेल्या १५ वर्षांत भारताची चीनमधून औद्योगिक उत्पादनांची आयात २१ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर पोहोचली आहे. ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ (जीटीआरआय) या आर्थिक ‘थिंक टँक’च्या अहवालात ही बाब उघड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत-चीन व्यापार नेमका किती?

भारताची चीनला निर्यात २०१९ ते २०२४ या काळात वार्षिक १६ अब्ज डॉलरच्या आसपास स्थिर आहे. याच वेळी भारताची चीनमधून आयात २०१८-१९ मध्ये ७३ अब्ज डॉलर होती. ही आयात २०२३-२४ मध्ये १०१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. यामुळे मागील पाच वर्षांत चीनसोबतची भारताची व्यापारी तूट एकूण ३८७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या १५ वर्षांत भारताची चीनमधून औद्योगिक वस्तू आयात २१ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर पोहोचली आहे. भारताच्या एकूण आयातीच्या तुलनेत चीनमधून होणारी आयात वेगाने वाढत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची चीनमधून होणारी आयात २.३ पट वेगाने वाढत आहे.

हेही वाचा >>> रशियाकडून कच्चे तेल घेऊन भारताने १३ अब्ज डॉलर्सची बचत कशी केली?

कशाचे प्रमाण जास्त?

भारताची एकूण आयात २०२३-२४ मध्ये ६७७.२ अब्ज डॉलर होती. त्यातील १०१.८ अब्ज डॉलरची आयात चीनमधून होती. म्हणजेच भारताच्या एकूण आयातीत चीनचा वाटा १५ टक्के आहे. चीनमधून झालेली ९८.५ टक्के आयात प्रामुख्याने औद्योगिक उत्पादन श्रेणीतील आहे. भारताची औद्योगिक उत्पादनांची एकूण आयात ३३७ अब्ज डॉलर आहे. त्यातील ३० टक्के वाटा एकटया चीनचा आहे. हा वाटा १५ वर्षांपूर्वी २१ टक्के होता. चीनमधून होणाऱ्या आयातीत इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि इलेक्ट्रिकल उत्पादनांचे प्रमाण जास्त आहे. याचबरोबर रसायने, औषधे, लोह, पोलाद उत्पादने, प्लास्टिक, कपडे, वाहने, चामडे, कागद, काच, जहाजे, विमाने यांचाही समावेश आहे.

कोणती क्षेत्रे चीनवर अवलंबून?

एप्रिल-जानेवारी २०२३-२४ या कालावधीत भारतातील इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि इलेक्ट्रिकल उत्पादन क्षेत्राची आयात ६७.८ अब्ज डॉलर होती. त्यात चीनमधून झालेल्या आयातीचा वाटा २६.१ अब्ज डॉलर्स होता. त्यामुळे हे उद्योग चीनमधील वस्तू आणि सुटया भागांवर मोठया प्रमाणात अवलंबून असल्याचे समोर आले. यंत्रांची आयात चीनमधून १९ अब्ज डॉलर्स असून, ती भारताच्या या क्षेत्रातील आयातीच्या ३९.६ टक्के आहे. भारताची रसायने आणि औषधांची आयात ५४.१ अब्ज डॉलर्स असून, त्यातील १५.८ अब्ज डॉलर्सची आयात चीनमधून झाली.

हेही वाचा >>> यूएस फेडने चलनवाढीदरम्यान व्याजदर ठेवले स्थिर; भारतीय अर्थव्यवस्थेसाठी का महत्त्वाचे?

लघु, मध्यम उद्योगांवर संकट?

चीनमधून कच्च्या मालाऐवजी तयार वस्तू आयात होण्याचे प्रमाण जास्त आहे. चीनमधून कपडे, काचेच्या वस्तू, फर्निचर, कागद, पादत्राणे आणि खेळणी यांची आयातही मोठया प्रमाणात होते. या वस्तूंचे उत्पादन प्रामुख्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकडून होते. चीनमधील आयातीमुळे या उद्योगांच्या अडचणी वाढत आहेत. चीनमधून केवळ उच्च तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या वस्तूंचीच नव्हे तर अगदी सामान्य वस्तूंचीही आयात होत आहे. यामुळे भारतीय औद्योगिक क्षेत्राच्या कार्यक्षमतेतील कच्चे दुवे समोर आले आहेत. केंद्र सरकार आणि भारतीय उद्योगांनी या परिस्थितीचे मूल्यमापन करायला हवे. आयात धोरणात बदल घडवून त्यानुसार पावले उचलायली हवीत. चीनमधील मोठया आयातीमुळे होणारे आर्थिक धोके केवळ पाहण्यापेक्षा त्यांचा देशांतर्गत उद्योगांवर होणारा परिणाम तपासायला हवा. एकाच देशांवर अवलंबून असलेली आयात धोक्याची आहे. चीन हा आपला भूराजकीय प्रतिस्पर्धी असल्याने या परिस्थितीत सुधारणा करणे आवश्यक आहे, असा चिंताजनक सूर अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

चिनी कंपन्यांनी पाळेमुळे पसरली?

सध्या भारतातील कंपन्या चीनमधून वस्तू आयात करतात. आता चीनमधील अनेक कंपन्या भारतात उत्पादन सुरू करीत आहेत. देशातील ऊर्जा, दूरसंचार आणि वाहतूक क्षेत्रात या कंपन्या कार्यरत आहेत. स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक, प्रवासी वाहने, सौरऊर्जा, अभियांत्रिकी प्रकल्प आणि इतर अनेक क्षेत्रांत या कंपन्या महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. चीनमधील कंपन्यांकडून भारतात उत्पादन सुरू झाल्यानंतर चीनमधून औद्योगिक वस्तूंची आयात आणखी वाढणार आहे. यामुळे आगामी काही वर्षांत भारतातील रस्त्यांवर धावणाऱ्या तीनपैकी एक इलेक्ट्रिक, प्रवासी आणि व्यावसायिक वाहन चिनी कंपनीचे असेल. चीनमधील वाहननिर्मिती कंपन्यांमुळे देशातील कंपन्यांना फटका बसणार आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

sanjay.jadhav@expressindia.com