ज्ञानेश भुरे
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची मंगळवारी (३० एप्रिल) घोषणा करण्यात आली. यापूर्वीच्या चर्चेप्रमाणे कोणत्याही नव्या चेहऱ्याला निवड समितीने संधी दिली नाही किंवा कोणताही वेगळा प्रयोग केला नाही. भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन न दाखवता निवड समितीने विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंवरच विश्वास दाखवला, हे स्पष्ट दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणता दृष्टिकोन ठेवून संघनिवड?

भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आता कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहेत. खेळायची कितीही इच्छा असली, तरी सभोवतालचे वातावरण आणि शरीराची साथ, यावर या खेळाडूंचे भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळे निवड समिती एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील निर्विवाद वर्चस्वानंतरही जेतेपदाने हुलकावणी दिल्यावर वेगळा विचार करेल असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, क्रिकेटचे भवितव्य किती सुरक्षित आहे हे तपासण्याचा प्रयत्न निवड समितीने केला नाही. विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेताना निवड समितीने अत्यंत सावध भूमिका घेतल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा >>> एलॉन मस्क यांच्या चीन दौऱ्याच्या केंद्रस्थानी सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर… काय आहे ही प्रणाली? टेस्लासाठी चीन इतका महत्त्वाचा का?

रोहित, विराटला अखेरची संधी?

भारतातच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, विजेतेपदापासून भारत दूर राहिला. रोहित शर्मा, विराट कोहली या प्रमुख खेळाडूंना हे अपयश चांगलेच बोचले. देशासाठी मोठी कामगिरी करण्याचे राहून गेल्याची खंत या दोघांनाही होती. कदाचित ही खंत त्यांनी ‘बीसीसीआय’समोर व्यक्त केली असावी. त्यामुळेच या खेळाडूंना आपले स्वप्न साकारण्यासाठी अखेरची संधी म्हणून निवड समितीने ट्वेण्टी-२० विश्वचषकासाठी त्यांच्या अनुभवाला प्राधान्य दिले असावे. गोलंदाजीत केवळ जसप्रीत बुमरा हा नाव घेण्यासारखा अनुभवी खेळाडू आहे.

फलंदाजीत अनुभवालाच प्राधान्य

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये फलंदाजीच्या आघाडीवर अनुभवाचे निकष लावण्यात आले आहेत. रोहित, विराटखेरीज हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव या अनुभवी फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. ट्वेण्टी-२० क्रिकेट खेळताना आव्हान उभे करण्यात आणि पाठलाग करण्यासाठी फलंदाजांची भूमिका नेहमीच निर्णायक ठरते. यामुळेच निवड समितीने फलंदाजांची निवड करताना अनुभवाची पट्टी वापरली असे म्हणता येईल. आघाडीच्या फळीची धुरा रोहित आणि विराट या जोडीकडे सोपवून, मधल्या फळीत वेगाने धावा करू शकणाऱ्या सूर्यकुमार, हार्दिक आणि पंत यांचा विचार करण्यात आला.

हेही वाचा >>> विश्लेषण : भारताचे चीनवरील अवलंबित्व वाढले?

फिरकी गोलंदाजांची निवड कशी?

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये अमेरिकेत प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार रंगणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये यापूर्वी एकदिवसीय आणि ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धा झाली आहे. या वेळी दोन्ही ठिकाणी खेळपट्टी अधिक संथ राहणार असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळेच भारतच नाही, तर बहुतेक संघांनी फिरकी गोलंदाजांना अधिक महत्त्व दिले आहे. भारतानेही चार फिरकी गोलंदाजांची निवड केली आहेत. यात रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. या चौघांच्याही गाठीशी बराच अनुभव आहे. निवड समितीने युवा रवी बिश्नोईला संधी देणे टाळले. वेगवान गोलंदाजीत अनुभवी बुमरावर भारताची भिस्त असेल. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज हे अन्य दोनच वेगवान गोलंदाज संघात निवडण्यात आले आहेत. एकूणच तेथील खेळपट्ट्यांचे स्वरूप निश्चित समोर आल्यानंतरच संघांचे समीकरण ठरून फिरकी आणि वेगवान गोलंदाजांचे नियोजन होऊ शकेल.

निर्णय किती योग्य ठरेल?

खेळ कोणताही असला, तरी सामन्याच्या दिवशी तुमचा खेळ कसा होतो यावरच तुमचे यश अवलंबून असते. त्यामुळे अनुभवाचा फायदा होणार की नाही, यावर फार चर्चा होऊ शकत नाही. अर्थात, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना परिस्थितीनुसार खेळ करण्याची आवश्यकता असते आणि असा खेळ अनुभव असेल, तरच करता येतो. त्यामुळे विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळताना अनुभवाला प्राधान्य देण्याचा निर्णय ही सावध किंवा अपेक्षित भूमिका ठरते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis indian team for t20 world cup announced by bcci print exp zws