कसोटीतही धोका पत्करून खेळणाऱ्या फलंदाजांना माझे प्रोत्साहनच असेल. मला अपयशाची भीती नाही, असे वक्तव्य भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी केले होते. आक्रमक शैलीत खेळताना कधीतरी आम्ही १०० धावांतही गारद होऊ. मात्र, मला त्याची चिंता नाही, असेही गंभीर पुढे म्हणाला होता. परंतु, प्रशिक्षकांकडून मिळालेल्या या स्वातंत्र्यामुळे भारतीय फलंदाज आता फारच बेफिकरीने आणि बेजाबदारपणे खेळत असल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ४६ धावांत गारद झाल्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला केवळ १५६ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताला अतिआक्रमकतेचा फटका बसत आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
आक्रमक शैलीबाबत गंभीरचे म्हणणे…
‘मी फलंदाजांना कशासाठी रोखू? ते आपला नैसर्गिक खेळ करत असतील आणि कसोटीत एका दिवसात ४००-५०० धावा होत असतील, तर त्यात वाईट काय आहे? आम्ही असेच खेळत राहणार आहोत. जितका जास्त धोका, यशाची शक्यता तितकीच अधिक. धोका पत्करून खेळल्याने कधीतरी आम्ही १०० धावांतही गारद होऊ. मात्र, मला त्याची चिंता नाही. अपयशाला सामोरे जाण्याचे धाडस माझ्यात आहे. निकाल मिळवण्यासाठी जितका हवा तितका धोका पत्करण्याची आमची तयारी आहे,’ असे गंभीर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी म्हणाला होता.
हेही वाचा >>> लाहोरवर काजळी भारतामुळे? जगातील सर्वात प्रदूषित शहर होत ओढवली नामुष्की
गंभीरच्या या वक्तव्यामागे कारण काय?
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाने मायदेशात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यापासून गंभीरची ही पहिलीच कसोटी मालिका होती. या मालिकेतील कानपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ झाला, तर पुढील दोन दिवस संततधारेमुळे पूर्णपणे वाया गेले. त्यानंतरही भारताने सात गडी राखून हा सामना जिंकला होता. या यशाचे प्रमुख कारण होते, भारताची अतिआक्रमक फलंदाजी. भारताने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत जलद ५०, १००, १५०, २०० आणि २५० धावांचा विक्रम प्रस्थापित केला. केवळ ३४.४ षटके फलंदाजी करताना भारताने ९ बाद २८५ धावांची मजल मारल्यानंतर आपला पहिला डाव घोषित केला. भारताने षटकामागे तब्बल ८.२२च्या धावगतीने धावा फटकावल्या. विजय मिळवण्यासाठी आपली कितीही आक्रमक शैलीत खेळण्याची तयारी असल्याचे गंभीरच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाने दाखवून दिले होते. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी गंभीरने निडरपणे खेळत राहणार असल्याचे वक्तव्य केले होते.
हेही वाचा >>> 2,000-year-old temple:समुद्राखाली सापडलेले २००० वर्षे प्राचीन मंदिर कोणता इतिहास सांगते
गंभीरने दिलेली सूट महागात?
गौतम गंभीरने नैसर्गिक शैलीत खेळण्याची सूट दिल्याचा सकारात्मक परिणाम होण्यापेक्षा भारतीय फलंदाज बेजबाबदारपणे खेळताना दिसत आहेत. ‘आक्रमक शैलीत खेळण्याची मोकळीक असली, तरी फलंदाजांनी खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार खेळात बदल करणे आवश्यक आहे,’ असेही गंभीरने नमूद केले होते. मात्र, भारतीय फलंदाजांनी प्रशिक्षकांचे हे बोल लक्षात न ठेवल्याचे चित्र आहे. याचा प्रत्यय विशेषत: न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात आला.
आक्रमक की बेजबाबदार?
न्यूझीलंडच्या २५९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने कर्णधार रोहित शर्माला सुरुवातीलाच गमावले. रोहितला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर यशस्वी जैस्वाल (६० चेंडूंत ३०) आणि शुभमन गिल (७२ चेंडूंत ३०) यांनी खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांव्यतिरिक्त भारतीय फलंदाजांमध्ये संयमाचा अभाव दिसून आला. विराट कोहली फुलटॉस चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. ग्लेन फिलिप्सच्या एका सरळ चेंडूवर आततायी फटका खेळताना ऋषभ पंतने आपल्या यष्ट्या गमावल्या. हवेतून चेंडू टोलावण्याच्या नादात सर्फराज खान समोरील दिशेला उभ्या क्षेत्ररक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. गेल्या कसोटीत सर्फराजने शानदार दीडशतक झळकावले होते. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्याने खेळपट्टीवर वेळ घालविण्याचा प्रयत्नही केला नाही. सातत्याने हवेत चेंडू मारताना दोन वेळा तो बचावला. तिसऱ्यांदा असा फटका मारल्यावर त्याला माघारी परतावे लागले.
फिरकीविरुद्ध मर्यादा उघड्या?
पुणे येथील दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरने सात गडी बाद करत भारताला झटपट गुंडाळले. त्यामुळे फिरकीविरुद्ध खेळताना भारतीय फलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. काही भारतीय फलंदाज अतिआक्रमकतेने खेळताना मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झाले, तर काहींना चेंडू नक्की कोणत्या दिशेने वळणार हेच कळले नाही आणि ते पायचीत झाले. ‘‘अन्य देशांपेक्षा भारतीय फलंदाज फिरकीला अधिक चांगले खेळतात असा समज आहे. मात्र, त्यात तथ्य राहिलेले नाही. आता गांगुली, द्रविड, सचिन आणि लक्ष्मण यांसारखे फलंदाज भारताकडे नाहीत. आता फिरकीपटूंविरुद्ध खेळताना भारतीय फलंदाजांचा स्तर इतरांप्रमाणेच झाला आहे,’’ असे न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज आणि नामांकित समालोचक सायमन डूल म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य बोचरे असले, तरी त्यात कमीअधिक प्रमाणात तथ्य नक्कीच आहे. याच वर्षी हैदराबाद येथे झालेल्या कसोटीत इंग्लंडचा नवोदित फिरकीपटू टॉम हार्टलीने दुसऱ्या डावात सात बळी मिळवले होते. त्यामुळे भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. तसेच गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या टॉड मर्फी आणि नेथन लायन या ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले होते. भारतीय संघासाठी ही नक्कीच चिंतेची बाब आहे.