जगातील सर्वांत मोठा आंब्याचा उत्पादक म्हणून भारताची ओळख आहे. त्या तुलनेत देशातून आंबा निर्यात होत नाही. जागतिक आंबा बाजारात चीन भारताचा स्पर्धक म्हणून समोर येतो आहे, त्या विषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक आंबा बाजाराची स्थिती काय?

जागतिक आंबा उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के आंबा उत्पादन भारतात होते. पण, देशांतर्गत मागणी मोठी असल्यामुळे देशातून फारशी आंबा निर्यात होत नाही. मे २०२४ मधील आकडेवारीनुसार मेक्सिको आंबा निर्यातीत आघाडीवर आहे. मेक्सिकोने २०२३ मध्ये २०२२ च्या तुलनेत सुमारे सहा टक्क्यांच्या वाढीसह जगात सर्वाधिक ५७५३.६ लाख डॉलर किमतीच्या आंब्याची निर्यात केली आहे. जगातील एकूण निर्यातीत १९९१ पर्यंत मेक्सिकोचा वाटा ५० टक्क्यांवर होता. तो हळूहळू कमी होत आहे. शिवाय मेक्सिको आंबा उत्पादनात आठव्या क्रमांकावर असून, एकूण उत्पादनाच्या २० टक्के आंब्याची निर्यात करतो. नेदरलॅण्ड्स, ब्राझील, भारत, अमेरिका, जर्मनी, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटन हे जगातील प्रमुख आंबा निर्यातदार देश आहेत.

हेही वाचा >>> Egyptian Mummies:९०० वर्षे जुनी दफने, भाजलेली माती, शवपेटी आणि बळी देण्याची जागा पाहून पुरातत्त्वज्ञ चक्रावले; इजिप्तमधील नवीन उत्खनन काय सांगते?

भारतात जगात सर्वाधिक आंबा उत्पादन?

भारतात जगात सर्वाधिक आंबा उत्पादन होते. २०२२ मध्ये जगात सुमारे ५९० लाख टन आंब्याचे उत्पादन झाले होते. त्यापैकी ४४ टक्के आंबा उत्पादन एकट्या भारतात झाले होते. देशातून हापूस, केशर, तोतापुरी आणि बेंगनपल्ली, दशहरी, लंगडा या प्रमुख जातींच्या आंब्यांची निर्यात होते. देशातून ताज्या फळांसह मॅगो पल्प, मॅगो स्लाईस आदींची निर्यात होते. देशात आंब्यांच्या एक हजारांहून जास्त जाती आहेत. आंब्याच्या निर्यातीत भारताला स्पर्धक देश म्हणून ब्राझील, मेक्सिको, पाकिस्तान, पेरू, थायलंड, येमेन, नेदरलॅण्ड्सचा उल्लेख केला जातो. आता चीन स्पर्धक देश म्हणून समोर येतो आहे. देशातील आंब्याच्या लागवडीखालील क्षेत्र २११२४ हेक्टर असून, दरवर्षी सरासरी चार टक्क्यांनी वाढ होत आहे. एप्रिल २०२३ ते ऑगस्ट २०२४, या काळात ४७९.८ लाख डॉलर किमतीच्या आंब्याची निर्यात झाली आहे. मागील वर्षांच्या तुनलेत यंदा अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत १९ टक्क्यांनी वाढ होऊन ४०३.३ लाख डॉलर किमतीच्या आंब्याची निर्यात झाली आहे.

हेही वाचा >>> Kolkata Rape-Murder Case: पॉलिग्राफ चाचणी म्हणजे नक्की काय? कोलकाता प्रकरणात ही चाचणी कशासाठी?

चीन भारताचा स्पर्धक?

चीनच्या भारतातील राजदूतांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने दशहरी, चौसा, लंगडा आणि हापूस या जातीच्या आंब्यांची निर्यात केली आहे. या जातींचे मूळ भारतीय आहे. जगात प्रामुख्याने हापूस, लंगडा, दशहरी जाती भारतातच मिळतात. जगातील ग्राहकांना या जातींच्या आंब्यासाठी भारतावर अवलंबून राहावे लागते. पण आता चीनमधून याच जातींच्या आंब्यांची निर्यात सुरू झाली आहे. त्यामुळे चीन भारताचा स्पर्धक म्हणून समोर येत आहे. चीनने २०२३ मध्ये ५९४.३ लाख डॉलर किमतीच्या आंब्याची निर्यात केली आहे. तर भारतातून ५५९.४ लाख डॉलरची किमतीच्या आंब्याची निर्यात केली आहे. भारताच्या तुलनेत चीनची निर्यात सुमारे सहा टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे भारतीय आंबा निर्यातीत चीन मोठा अडथळा ठरू शकतो, कारण भारतीय जातींच्या आंब्यांचीच चीन निर्यात करतो आहे.

भारतीय आंब्यांच्या जाती चीनमध्ये कशा?

चीनच्या दक्षिणेकडील राज्यांचा अपवाद वगळता चिनी लोकांना १९६० पर्यंत आंबा फारसा परिचित नव्हता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, १९५० मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आंबा राजनयाचा (मॅगो डिप्लोमसी) मार्ग स्वीकारला. नेहरूंनी भारतातून आंब्यांची आठ रोपे चीनच्या तत्कालीन पंतप्रधानांना भेट दिली. त्यात दशहरीची तीन, चौसा, हापूसची प्रत्येकी दोन आणि लंगडा जातीच्या आंब्याच्या एका रोपाचा समावेश होता. या भेट दिलेल्या रोपांची लागवड चीनमधील आंबा उत्पादनात क्रांती करण्यास कारणीभूत ठरली आहेत.

चीनमध्ये आंबा उत्पादन

चीनने आपल्या विविध प्रांतातील हवामान आणि जमिनीनुसार विविध संशोधन करून स्थानिक वातावरणाला पोषक विविध प्रजातींची निर्मिती केली आहे. सध्या चीनमध्ये हापूस, केशर, लंगडा जातींच्या आंब्यांची लागवड दक्षिणेकडील हैनान आणि ग्वांगडोंग प्रांतात सुरू केली आहे. या दोन प्रांतांतील हवामान आंबा लागवडीसाठी अनुकूल आहे.

भारताच्या आंबा निर्यातीसमोरील अडथळे?

भारतातील हापूस, दशहरी, केशर, चौसा, लंगडा आणि तोतापुरी या प्रमुख निर्यातक्षम जाती आहेत. पण, याच जातींच्या आंब्याचे उत्पादन पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, काही आफ्रिकन देशांसह आता चीनमध्येही होऊ लागले आहे. एकीकडे फळमाशी, रसायनांचे उर्वरित अंश सापडल्यामुळे भारतीय आंब्याची निर्यात अडचणीत आली आहे. शिवाय अमेरिकेसारख्या प्रगत देशांना निर्यातीसाठी आंब्यावर विकिरण प्रक्रिया करावी लागते. ही व्यवस्था फारच थोड्या बंदरांवर आहे. त्यामुळे राज्यातील हापूस, केशरसह उत्तरेकडील राज्यात उत्पादित होणाऱ्या लंगडा, दशहरी, बेंगनपल्ली आंब्यांची निर्यात महाराष्ट्र राज्य कृषी, पणन मंडळाच्या मुंबईतील सुविधा केंद्रावरून होते. देशातून आंबा निर्यात करणाऱ्या केंद्रांचा तुटवडा आहे. शिवाय भारतीय शेतकरी आंबा उत्पादित करताना आंतरराष्ट्रीय दिशानिर्देशांचे पालन करीत नाहीत. दुसरीकडे पाकिस्तान, बांगलादेश हा भारतात उत्पादित झालेला आंबाच निर्यात करतात. त्यात आता चीनची भर पडली आहे. त्यामुळे भविष्यात चीनच्या रूपाने आंबा निर्यातीत एक मोठा स्पर्धक देश निर्माण झाला आहे.

dattatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis indian varieties of mango grown in china impact on india export print exp zws