देशात २०१७ मध्ये करण्यात आलेल्या हत्ती गणनेतून पुढे आलेली हत्तींची संख्या अचूक नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आता हत्ती गणनेसाठी नवीन पद्धतीचा शोध घेतला जात आहे.हत्ती गणनेच्या नव्या पद्धतीचा अभ्यास कुठे?

भारतीय वन्यजीव संस्था, विविध शास्त्रज्ञांच्या सहकार्याने देशभरातील हत्तींची गणना करते. विविध पद्धतींच्या माध्यमातून केलेल्या या मोजणीच्या आधारे, देशात उपस्थित असलेल्या हत्तींची संख्या निश्चित केली जाते. उत्तराखंडमधील राजाजी राष्ट्रीय उद्यानात हत्ती गणनेच्या नवीन पद्धतीचा अभ्यास केला जात आहे. वैज्ञानिकांना राजाजी राष्ट्रीय उद्यान हे हत्ती मोजण्याच्या नवीन पद्धतींवर संशोधनासाठी सर्वोत्तम असल्याचे आढळले. त्यामुळे राजाजी राष्ट्रीय उद्यानात हत्ती मोजण्यासाठी अवलंबलेल्या ११ पद्धतींची चाचणी घेण्यात येत आहे. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेतर्फे गेल्या दोन वर्षांपासून यावर अभ्यास केला जात आहे.

वन्यजीव शास्त्रज्ञांचा दावा काय?

डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेतील शास्त्रज्ञांच्या मते येत्या पाच ते सहा महिन्यांत हत्ती गणनेच्या नवीन पद्धतीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. हत्ती गणनेसाठी जो ‘प्रोटोकॉल’ तयार करण्याकरिता संशोधन केले जात आहे, ते काम बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाले आहे. आता थोडे काम बाकी असून येत्या काही महिन्यांत ते पूर्ण होईल, असा विश्वास संस्थेच्या शास्त्रज्ञांना आहे. या संस्थेच्या वतीने देशात उपलब्ध असलेल्या हत्ती गणनेच्या ११ पद्धतींचे मूल्यांकन करून नवीन ‘प्रोटोकॉल’ तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी सर्व ११ पद्धतींची चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा >>> मुंबईत तैवानचं आर्थिक केंद्र; चीनने दर्शवला विरोध, काय आहेत कारणं?

देशात प्रदेशनिहाय हत्तींची संख्या किती?

देशातील १४ राज्यांमध्ये सुमारे ३१ वनक्षेत्रे हत्तींसाठी संरक्षित आहेत. गेल्या तीन वर्षांत कर्नाटक राज्याने दांडेली हे हत्तींसाठी राखीव असल्याचे अधिसूचित केले आहे, नागालँडमधील ‘सिंगफन एलिफंट रिझर्व्ह’ आणि छत्तीसगढमधील ‘लेमरू हत्ती रिझर्व्ह’ यांचा नवीन जंगलांमध्ये समावेश आहे. जगभरात असणाऱ्या एकूण हत्तींपैकी ६० टक्क्यांहून अधिक जंगली आशियाई हत्ती भारतात आहेत. २०१७ मध्ये झालेल्या गणनेनुसार, भारतात एक लाख दहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळात २९ हजार ९६४ हत्तींचे वास्तव्य आहे. ईशान्य प्रदेशात १० हजार १३९ हत्ती आहेत. पूर्व-मध्य प्रदेशात ३ हजार १२८, वायव्य भागात २ हजार ८५ आणि दक्षिण भागात ११ हजार ९६० हत्ती आहेत. कर्नाटक राज्यात सर्वाधिक ६ हजार ४९ हत्ती आहेत.

हत्तींबद्दल अचूक माहिती मिळणे शक्य आहे का?

हत्ती गणनेसाठीची नवी पद्धत गणनेच्या आणि गणनेतून येणाऱ्या संख्येच्या वास्तविकतेच्या जवळ जाणारी आहे. त्यामुळे या नव्या पद्धतीनुसार हत्तींची गणना झाल्यास अधिक अचूकपणे आकडे समोर येऊ शकतील. तसेच हत्तीच्या अवयवांच्या तस्करीलादेखील आळा घालता येईल. मात्र, भारतात नेमके हत्ती किती हे जाणून घेण्यासाठी जून २०२५ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था ईशान्येकडील वन कर्मचाऱ्यांना सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रशिक्षण देणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत पहिल्या टप्प्यातील तपशील गोळा होईल आणि तो भारतीय वन्यजीव संस्थेला पाठवला जाईल. हत्तींच्या गणनेसाठी नवीन पद्धतीचा वापर करण्यात येत असल्यानेही या अंदाजाला उशीर होत आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: अधिक मुले जन्माला घाला… लोकसंख्या वृद्धीविषयी चंद्राबाबूंचे अजब आवाहन… पण ते असे का म्हणतात?

कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जात आहे?

नवीन पद्धत तयार झाल्यानंतर ती अमलात आणण्यासाठी तीन विशेष गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यात हत्ती गणनेसाठी प्रथम तयार केला जाणारा ‘प्रोटोकॉल’ तांत्रिक, लॉजिस्टिक आणि वैज्ञानिक या तिन्ही मापदंडावर चांगला असावा. हत्ती गणनेसाठी अधिक वेळ लागणार नाही, अशा पद्धतीचाही शोध घेतला जात आहे. तसेच या नवीन पद्धतीद्वारे हत्ती गणना करणे सोपे होईल आणि त्याच वेळी ही पद्धत फार खर्चीक असणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे. देशभरातील मोठ्या भागात हत्तींची गणना करणे हे एक मोठे आव्हान आहे. एका अंदाजानुसार जगभरात ५० हजारांहून अधिक आशियाई हत्ती आहेत. त्यापैकी ६० टक्के हत्ती एकट्या भारतात आहेत. त्यामुळे हत्ती गणनेसाठीची नवी पद्धत येत्या काही महिन्यांत पूर्णपणे तयार असेल आणि त्या माध्यमातून भविष्यात संपूर्ण देशात हत्तींची अचूक गणना केली जाईल.