इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही विश्वातील सर्वांत लोकप्रिय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा. जगभरातील क्रिकेटप्रेमींचे या स्पर्धेकडे लक्ष असते. मात्र, भारतातील जवळपास निम्मे क्रिकेटप्रेमी ‘आयपीएल’मधील कोणत्याही एका संघाला समर्थन करत नसल्याचे आता एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. नक्की हे सर्वेक्षण काय आणि अन्य कोणत्या संघाला मोठा चाहतावर्ग आहे, याचा आढावा.
काय सांगते सर्वेक्षण?
क्रिस्प आणि कॅडेन्स या कंपन्यांनी मिळून एक सर्वेक्षण घेतले. या सर्वेक्षणात भारतामधील १३ शहरांतील साधारण २० हजार लोकांना ‘आयपीएल’बाबत त्यांचे मत विचारण्यात आले. यापैकी जवळपास ३२ टक्के लोकांनी चेन्नई सुपर किंग्ज संघाला पाठिंबा दर्शवला. चेन्नईसह रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांनाही चांगला चाहतावर्ग असल्याचे समोर आहे. मात्र, सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या निम्म्या लोकांनी आपण कोणत्याही एका संघाला समर्थन करत नसल्याचे सांगितले.
चेन्नईच्या संघाला सर्वाधिक चाहते का?
महेंद्रसिंग धोनीची लोकप्रियता आणि त्याचा प्रभाव, हे चेन्नईला सर्वांत मोठा चाहतावर्ग लाभल्याचे प्रमुख कारण आहे. चेन्नईतील ८६ टक्के लोक या संघाला समर्थन करतात. त्यामुळे आपल्याच शहराच्याच ‘आयपीएल’ संघाला समर्थन करणाऱ्यांमध्ये चेन्नईकरांनी दिल्ली आणि लखनऊकरांना मागे टाकले आहे. यापूर्वी दिल्लीत डेअरडेविल्स (आताचा कॅपिटल्स) संघाला, तर लखनऊत सुपर जायंट्स संघाला चाहत्यांकडून मोठा पाठिंबा मिळायचा.
हेही वाचा >>> विश्लेषण : परदेशी शिष्यवृत्तीबाबत उत्पन्न मर्यादेच्या अटीला विरोध का?
मैदानावरील कामगिरी कितपत महत्त्वाची?
चाहते एखाद्या संघाला त्या संघाच्या केवळ मैदानावरील कामगिरीमुळेच समर्थन करतात असे नाही, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. चेन्नईने पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे या संघाला समर्थन देणे सोपे आहे. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या संघाला अद्याप एकदाही ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवता आलेले नाही. असे असले तरी या संघाची लोकप्रियता खूप मोठी आहे. आपला संघ जिंकावा असे या चाहत्यांना वाटतेच, पण संघ पराभूत झाला, तरी आपले समर्थन जराही कमी होणार नाही, असे बंगळूरुचे चाहते सांगतात. त्यामुळे बंगळूरुचे चाहते भावनिकदृष्ट्या या संघाशी जोडले गेले असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. विराट कोहलीसारखा नामांकित खेळाडू संघात असल्याचाही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला फायदा होत आहे.
‘ब्रँड व्हॅल्यू’बाबत काय?
चेन्नईच्या संघाला सर्वांत मोठा चाहतावर्ग लाभला असला, तरी ‘ब्रँड व्हॅल्यू’च्या बाबतीत हा संघ काहीसा मागे असल्याचे समोर आले आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ चाहत्यांच्या बाबतीत मागे असला, तरी ‘ब्रँड व्हॅल्यू’च्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघही याबाबतीत खूप पुढे असल्याचे सर्वेक्षण सांगते. ‘ब्रँड व्हॅल्यू’ जास्त असणे म्हणजेच विविध कंपन्यांकडून या संघांना अधिक जाहिराती आणि पैसे मिळतात. या संघाशी जोडले गेल्यास आपला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो याची कंपन्यांना खात्री असते.
हेही वाचा >>> केजरीवालांच्या घरी ‘आप’ च्या महिला खासदारांना मारहाण; कारण काय? कोण आहेत स्वाती मालीवाल?
जाहिरातींचे दर ‘जैसे थे’…
यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये टीव्ही आणि डिजिटल माध्यमातून प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत नवे विक्रम रचले गेले असले, तरी जाहिरातींचे दर मात्र गेल्या वर्षीइतकेच कायम राहिले आहेत. स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमा यांच्याकडे अनुक्रमे टीव्ही आणि डिजिटल माध्यमातील प्रसारण हक्क आहेत. प्रायोजकांना ‘स्टँडर्ड डेफिनिशन’मधील (एसडी) १० सेकंदाच्या जाहिरातीसाठी १२.५ लाख रुपये, तर ‘हाय डेफिनिशन’मधील (एचडी) जाहिरातीसाठी ५.३ लाख रुपये द्यावे लागत आहेत. जिओ सिनेमावरही गेल्या वर्षीइतकेच जाहिरातीचे दर आहेत. त्यामुळे ‘आयपीएल’च्या लोकप्रियतेत वाढ होत असली, तरी प्रसारणकर्त्यांना मिळणारी रक्कम पूर्वीइतकीच आहे.