संजय जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने आता ६५ वर्षांची आरोग्य विम्याची अट काढून टाकली आहे. यामुळे ८० अथवा ९० वयाच्या ज्येष्ठांनाही आरोग्य विमा खरेदी करून त्याचे संरक्षण मिळवता येईल.

कधीपासून अंमलबजावणी?

भाजपने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ७० वर्षांवरील सर्वांना सरकारच्या आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेअंतर्गत संरक्षण दिले जाईल, असे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर विमा नियामकांच्या निर्णयाकडे पाहिले जात आहे. आरोग्य विमा नियामवली २०१६ चे नियम ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू होते. त्यामुळे आता नवीन नियम १ एप्रिलपासून लागू झाले आहेत. नवीन नियम लागू झाल्याने कंपन्या ज्येष्ठांसाठी तातडीने नवीन आरोग्य विमा योजना आणू शकतील.

सर्वसमावेशकतेकडे वाटचाल?

विमा नियामकांकडून आरोग्य विमा सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने पावले उचलली जात आहेत. त्यामुळे आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी वयाची कमाल अट काढून टाकण्यात आली आहे. यामुळे आरोग्य व्यवस्था अधिक सर्वसमावेशक होणार आहे. याचबरोबर अनावश्यक वैद्यकीय खर्चापासून ज्येष्ठांचे संरक्षण होईल. आधी एखाद्या व्यक्तीला वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत आरोग्य विमा खरेदी करता येत होता. नव्या सुधारणेमुळे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती आरोग्य विमा खरेदी करू शकेल. यामुळे आरोग्य विमा खरेदी करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार आहे. याचबरोबर आरोग्य विमा बाजारपेठेचा विस्तार होण्यासोबत आरोग्य सुविधांवरील भरमसाट खर्चापासून ज्येष्ठ नागरिकांची काही प्रमाणात सुटका होणार आहे.

हेही वाचा >>> VVPAT चा वापर कधीपासून सुरु झाला? EVM च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह का उपस्थित केले जाते?

वयोगटानुसार योजना येणार का?

आरोग्य विम्याच्या वयोगटानुसार नवीन योजना सादर करण्याचे निर्देश विमा नियामकांनी कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे विमा कंपन्या विमा उत्पादनांची रचना ज्येष्ठ नागरिकांच्या गरजेनुसार करू शकतात. याचबरोबर प्रसूतीसह लहान मुले आणि इतर गटांसाठीही विमा कंपन्या वेगळी विमा उत्पादने आणू शकतील. वेगवेगळया वयोगटांतील आणि आरोग्य गरजांनुसार विमा उत्पादनांची रचना यामुळे विमा कंपन्या करू शकणार आहेत. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना आणण्याचे निर्देशही नियामकांनी दिले आहेत.

आधीच्या आजारांपासून संरक्षण?

एखाद्या व्यक्तीला विमा खरेदी करण्याच्या कालावधीच्या आधी असलेल्या आजारांना विमा सरंक्षण देणे आता बंधनकारक आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कर्करोग, हृदयविकार, एड्स अथवा मूत्रिपड निकामी होणे असे गंभीर आजार असतील तरी त्यांना विमा संरक्षण नाकारता येणार नाही. या आजारांच्या आधारावर विमा कंपनी आरोग्य विमा नाकारू शकत नाही. सध्या आरोग्य विम्यामध्ये असलेल्या पूर्वीच्या आजाराचा प्रतीक्षा कालावधी ४८ महिन्यांवरून ३६ महिन्यांपर्यंत आणण्यात आला आहे. त्यानंतर झालेल्या आजारांना विमा संरक्षण आहे. आधीच्या आजाराचे कारण सांगून विमा कंपनी संरक्षण नाकारू शकत नाही.

हेही वाचा >>> भारतीय मुस्लिमांकडे किती संपत्ती? इतर धर्मीयांची काय स्थिती?

आधी निर्बंध होते का?

६५ वर्षांखालील सर्व वयोगटातील व्यक्तींनी आरोग्य विमा संरक्षण द्यावे, हा उल्लेख विमा नियामकांनी नवीन नियमात केलेला नाही. याचा अर्थ आधी ६५ वर्षांखालील व्यक्तींना विमा संरक्षण देणे बंधनकारक होते. मात्र, ६५ वर्षांवरील व्यक्तींना विमा संरक्षण देण्यास मनाई नव्हती. याचबरोबर सध्या काही विमा कंपन्यांकडूनही ज्येष्ठांसाठी अशा प्रकारच्या आरोग्य विमा योजना सुरू आहेत. मात्र, नवीन नियमामुळे ज्येष्ठांसाठी विमा कंपन्यांकडून व्यापक स्तरावर आरोग्य विमा योजना आणल्या जातील.

काय सावधगिरी बाळगावी लागेल?

ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य विमा संरक्षण मिळणार असले तरी त्यांना आजारांचा प्रतीक्षा कालावधी नेमका किती याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागेल. ज्येष्ठ व्यक्तीला असलेल्या आजाराचा विमा संरक्षणावर कोणता परिणाम होत आहे, हेही पाहावे लागेल. आरोग्य विमा योजनेत मिळणारे संरक्षण आणि त्यातून वगळण्यात आलेल्या गोष्टी ज्येष्ठांना बारकाईने पाहाव्या लागतील. विमा योजनेत एखाद्या शंकेला वाव असल्यास पूर्ण निरसन करूनच ती खरेदी करावी अन्यथा विमा खरेदी करूनही त्याचा फायदा न होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis irda remove age restriction for health insurance purchase print exp zws