केंद्रीय अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांना झुकते माप दिल्याचा आरोप सुरू आहे. अर्थात भाजपने त्याचे खंडन केले आहे. मात्र आता चर्चा राष्ट्रीय पातळीवर नव्या राजकीय समीकरणांची सुरू झाली. आंध्र प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला वाय.एस.आर. काँग्रेस विरोधकांच्या इंडिया आघाडीत जाणार काय, हा मुद्दा आहे.
जगनमोहन यांचा अप्रत्यक्ष संदेश
वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा व आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी दिल्लीत एका प्रदर्शनाचे आयोजन केले होते. जूनमध्ये राज्यात सत्तांतर होऊन तेलुगू देसम-जनसेना आणि भाजप यांना संधी मिळाली. मात्र या सव्वा ते दीड महिन्याच्या काळात सत्तारूढ पक्षांनी विशेषत: तेलुगू देसमने वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप जगनमोहन यांचा आहे. याबाबत मारहाणीच्या छायाचित्रांचे प्रदर्शन त्यांनी थेट दिल्लीत आयोजित केले. आपल्या ३१ कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा, तर छळवणुकीने ३५ जणांनी आत्महत्या केल्याचा या पक्षाचा दावा आहे. ‘रक्त चरित्र’ नावाची पुस्तिकाच या प्रदर्शनावेळी प्रकाशित करण्यात आली. या प्रदर्शनाला समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हजेरी लावली. याखेरीज तृणमूल काँग्रेस तसेच द्रमुकचे नेतेही उपस्थित होते. तसेच अण्णा द्रमुक, आपच्या नेत्यांनी हजेरी लावत पाठिंबा व्यक्त केला. यामुळे जगनमोहन हे भाजपविरोधी गोटात जाण्याची चर्चा सुरू झाली.
हेही वाचा >>> विश्लेषण : ‘मुंबई महानगर प्रदेशा’त पालघर, अलिबागही…
तटस्थता संपवणार काय?
जगनमोहन यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत २०११ मध्ये वायएसआर काँग्रेसची स्थापना केली. जगनमोहन यांचे वडील व तत्कालीन मुख्यमंत्री वाय.एस.राजशेखर रेड्डी यांचे २००९ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्या वेळच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने आंध्रचे विभाजन केले. यानंतर काँग्रेसला राज्यात उतरती कळा लागली. जगनमोहन यांनी पक्ष स्थापनेपासून १३ वर्षांत भाजप किंवा काँग्रेस या दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांशी आघाडी केली नाही. उलट राज्यसभेत वेळोवेळी भाजपच्या मदतीला ते धावून आले. त्यामुळे या पक्षाचे ते सहानुभूतीदार अशीच त्यांची ओळख. मात्र आता आंध्रमध्ये भाजपचा नवा मित्रपक्ष तेलुगू देसम पकड निर्माण करू पाहात आहे. या पक्षाचे सर्वेसर्वा व राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाची मदत भाजपला केंद्रातील स्थैर्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतेय. जगन यांचे लोकसभेत चार, तर आंध्र विधानसभेत केवळ ११ सदस्य आहेत. आता जगनमोहन भाजपला आव्हान देणार काय, असा प्रश्न आहे. मात्र इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसची अडचण आहे. राज्यात जगनमोहन यांच्या भगिनी शर्मिला या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे जगनमोहन यांना आघाडीत घेतल्यास त्यांची कोंडी होणार. यामुळेच जगनमोहन यांनी निमंत्रण देऊनही काँग्रेसचे नेत्यांनी प्रदर्शनाकडे पाठ फिरवल्याचे सांगितले जाते. विरोधात असल्याने कोंडीत सापडलेले जगनमोहन थेट इंडिया आघाडीत जातात काय, हा मुद्दा आहे.
हेही वाचा >>> राष्ट्रपतींकडून नऊ राज्यांसाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती; राज्यपालांची निवड कशी होते? काय असते प्रक्रिया?
सहानुभूती मिळण्याची शक्यता
आंध्र प्रदेशचे राजकारण मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डी या दोन नेत्यांभोवतीच फिरत आहे. अन्य पक्षांना येथे फारसा जनाधार नाही. भाजप जरी राज्यातील सत्तेत असला तरी तेलुगू देसमच्या मदतीनेच त्यांना काही जागा जिंकता आल्या. यामुळे केंद्र आणि राज्यातील राजकीय समीकरणे पाहता भाजप चंद्राबाबूंना साथ देणार हे उघड आहे. अशा वेळी अस्तित्व राखण्यासाठी जगनमोहन यांना नवे पर्याय पडताळावे लागतील. आजही राज्यसभेत त्यांचे ११ सदस्य आहेत. लोकसभा निकालानंतर भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ ८४ च्या आसपास आहे. यामुळे विधेयके संमत होण्यासाठी जगनमोहन यांच्या पक्षाची महत्त्वाची भूमिका ठरेल. जगनमोहन मुरब्बी राजकारणी आहेत. यापूर्वीही प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी राज्यभर यात्रा काढत पक्षाला यश मिळवून दिले होते. ७४ वर्षीय चंद्राबाबूंचे पुत्र नारा लोकेश यांच्याकडे आंध्र सरकारमध्ये माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी आहे. आगामी काळात ते अधिक सक्रिय होतील अशी चिन्हे आहेत. विरोधी कार्यकर्त्यांवर राज्यात हल्ले होत आहेत असा संदेश गेला तर जगनमोहन यांना देशभरातील राजकीय पक्षांची सहानुभूती मिळण्याची शक्यता अधिक आहे. मग भाजपची कोंडी होईल. कारण जगनमोहन यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येणार अशी चर्चा पूर्वी होती. मात्र जगनमोहन यांनी कटाक्षाने भाजपशी थेट युती टाळली. जनसेना पक्षाचे प्रमुख असलेले अभिनेते पवन कल्याण यांच्या पुढाकाराने भाजपची तेलुगू देसमशी आघाडी झाली. केंद्रीय अर्थसंकल्पातच आंध्रचा वारंवार झालेला उल्लेख पाहता भाजपने चंद्राबाबू यांच्या मागण्यांना प्रतिसाद दिला. यामुळे जगनमोहन व भाजप यांच्यातील सौहार्द कमी होईल. अशा वेळी ते विरोधकांच्या जवळ जाऊ शकता. त्यातून राष्ट्रीय राजकारणात फेरमांडणी होऊन १५ खासदार (राज्यसभा व लोकसभा) असलेले जगनमोहन सत्ताधाऱ्यांपुढे नवे आव्हान उभे करू शकतात.
hrishikesh.deshpande@expressindia.com