संदीप कदम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इटलीच्या यानिक सिन्नेरने २०२३च्या अखेरपासून आपली कामगिरी उंचावताना अनेक आघाडीच्या खेळाडूंना नमवले. आता नव्या वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद त्याने पटकावले. नोव्हाक जोकोविच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या त्रिकुटानंतर सिन्नेर, विम्बल्डन विजेता कार्लोस अल्कराझ हे नव्या पिढीतील खेळाडू आता टेनिसविश्वात आपला जम बसवू पाहत आहे. त्यांची आजवरची कामगिरी, आगामी काळातील त्यांच्यासमोर असलेली आव्हाने याचा आढावा.

सिन्नेरची ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील कामगिरी महत्त्वाची का?

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सिन्नेरने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित आंद्रे रुब्लेव्हला ६-४, ७-६ (७-५), ६-३ असे नमवले. उपांत्य फेरीत त्याच्यासमोर १० ऑस्ट्रेलियन जेतेपदे मिळवणाऱ्या आणि २४ ग्रँडस्लॅम विजेत्या नोव्हाक जोकोविचचे आव्हान होते. या सामन्यात जोकोविच विजय मिळवेल अशी अपेक्षा होती. मात्र, सिन्नेरने जोकोविचला ६-१, ६-२, ६-७ (६-८), ६-३ असे नमवत धक्कादायक निकाल नोंदवला आणि जोकोविचची या स्पर्धेतील मक्तेदारी मोडीत काढली. यानंतर अंतिम सामन्यात त्याच्यासमोर डॅनिल मेदवेदेवचे आव्हान होते. पाच सेटपर्यंत झालेल्या या लढतीत सिन्नेरने पहिले दोन सेट गमावले होते. मात्र, त्यानंतर दमदार पुनरागमन करताना त्याने दिमाखदार विजय मिळवला. त्याने ही लढत ३-६, ३-६, ६-४, ६-४, ६-३ अशी जिंकताना कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले.

हेही वाचा >>> घरबसल्या ॲमेझॉनवरून आता खरेदी करता येणार ‘कार’; कंपनी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

सिन्नेरची आजवरची कामगिरी कशी राहिली आहे?

वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी जोकोविचला नमविणाऱ्या सिन्नेरने वयाच्या तिसऱ्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली. व्यावसायिक ‘आयटीएफ’ सर्किटमध्ये तो २०१८ पासून खेळू लागला. त्याने २०१९मध्ये ‘एटीपी’ चॅलेंजरचे जेतेपद पटकावले आणि अशी कामगिरी करणारा तो इटलीचा सर्वांत युवा खेळाडू ठरला. २०१९मध्येच त्याने नेक्स जेन ‘एटीपी’ फायनल्सचे जेतेपद मिळवले. त्याने ‘एटीपी’ उद्योन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळवला. २०२०मध्ये त्याने डेव्हिड गॉफिन व ॲलेक्झांडर झ्वेरेव्ह यांना पराभूत करत त्याने फ्रेंच खुल्या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. २०२१मध्ये त्याने पाच जेतेपदे पटकावली आणि ‘एटीपी’ अंतिम टप्प्यातील स्पर्धेत (फायनल्स) स्थान मिळवले. २०२२मध्येही त्याने ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर, २०२३मध्ये तो विम्बल्डनच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता.

सिन्नेरप्रमाणेच अल्कराझकडून अपेक्षा 

सिन्नेरपूर्वी स्पेनच्या युवा कार्लोस अल्कराझने आपल्या खेळामुळे सर्वांचे लक्ष वेधले. नदालचा उत्तराधिकारी म्हणून अल्कराझकडे पाहिले जाते. २०२०मध्ये त्याने ‘एटीपी’मध्ये पदार्पण केले होते. २०२१मध्ये वयाच्या १७व्या वर्षी अल्कराझने ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेची मुख्य फेरी गाठली. २०२२मध्ये अल्कराझने तिसऱ्या मानांकनासह अमेरिकन टेनिस स्पर्धेत प्रवेश केला आणि जेतेपद पटकावले. आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या वाटचालीत त्याने मारिन चिलिच, सिन्नेर, कॅस्पर रूडसारख्या खेळाडूंना नमवले आणि या कामगिरीनंतर तो क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचला. असे करणारा तो सर्वांत युवा खेळाडू ठरला. २०२३मध्ये अल्कराझने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. याच वर्षी त्याने विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्याने अंतिम सामन्यात जोकोविचला नमवले होते. आता ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्याने मजल मारली. त्यामुळे आगामी काळात अल्कराझकडून खूप अपेक्षा बाळगल्या जात आहेत.

हेही वाचा >>> “ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर हिंदू मंदिर अस्तित्वात होते”; भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून इतिहासातील पुरावे सादर

सिन्नेर, अल्कराझ यांच्याकडे टेनिसमधील भविष्य म्हणून का पाहिले जात आहे?

सध्या पुरुष टेनिसमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहे. २००० नंतर जन्माला आलेले खेळाडू आता ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवताना दिसत आहेत, ज्यामध्ये सिन्नेर व अल्कराझ यांचा समावेश आहे. पुरुषांच्या टेनिसमध्ये फेडरर, नदाल व जोकोविच या त्रिकुटाने गेली दोन दशके आपले वर्चस्व राखले. फेडररच्या निवृत्तीनंतर नदाल व जोकोविच हे दोन खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसले. मात्र, गेला काही काळ नदाल दुखापतीने त्रस्त असल्याने मैदानात उतरू शकलेला नाही. जोकोविचने सातत्य टिकवले असले, तरी आता त्याला युवा खेळाडू आव्हान देत आहेत. जोकोविचला नमवत अल्कराझने विम्बल्डनचे जेतेपद मिळवले, तर सिन्नेरने जोकोविचला ऑस्ट्रेलियन टेनिसच्या उपांत्य सामन्यात नमवले. अल्कराझ अवघ्या २० वर्षांचा असून सिन्नेरचे वय २२ वर्षे आहे. त्यामुळे त्यांना या पुढेही अनेक ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी आहे. वाढत्या वयामुळे जोकोविच आणखी काही काळ खेळणार हे निश्चित नाही. त्यामुळेच सिन्नेर आणि अल्कराझला टेनिसचे भविष्य मानले जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis jannik sinner and carlos alcaraz lead the next generation print exp zws