अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे पुत्र हंटर यांचीच ‘शिकार’ झाली आहे. नशा करीत नसल्याची खोटी माहिती देऊन हत्यार खरेदी केल्याचा आणि अनधिकृतपणे हत्यार बाळगल्याचा, त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे.
हंटर बायडेन यांचा गुन्हा काय?
हंटर बायडेन यांनी सुमारे सहा वर्षांपूर्वी ‘कोल्ट कोब्रा .३८’ ही हँडगन खरेदी केली. पिस्तूल खरेदी करण्यापूर्वी आणि नंतरही हंटर ‘क्रॅक कोकेन’ या अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचा आरोप होता. अमेरिकेच्या केंद्रीय कायद्यानुसार बेकायदा अमली पदार्थांचे सेवन करणारी व्यक्ती हत्यार बाळगू शकत नाही. हंटर यांनी पिस्तुलासाठी अर्ज केला, त्यात अमली पदार्थांचे सेवन करीत नसल्याचे म्हटले होते. या अर्जात आणि परवानाधारक विक्रेत्याला खोटी माहिती दिल्याचे हंटर यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. बायडेन यांचेच मूळ राज्य असलेल्या डेल्वेअरमधील विल्मिंग्टनच्या न्यायालयातील १२ ज्युरी सदस्यांनी हंटर दोषी असल्याचा निकाल दिला. अमली पदार्थांच्या प्रभावाखाली असताना पिस्तूल बाळगल्याच्या तिसऱ्या प्रकरणातही हंटर यांना दोषी मानण्यात आले आहे.
प्रकरण उजेडात कसे आले?
हंटर यांच्या दिवंगत भावाची पत्नी- हॅली बायडेन या प्रकरणातील प्रमुख साक्षीदारांपैकी एक आहेत. भावाच्या मृत्यूनंतर हंटर आणि हॅली यांचे काही काळ प्रेमसंबंध होते. तेव्हा हंटर यांच्या मोटारीमध्ये हॅली यांना पिस्तूल सापडले. ते त्यांनी कचऱ्याच्या पेटीत टाकले. पिस्तूल गहाळ झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मोबाइल संदेशाद्वारे हॅलींकडे विचारणा केली. हंटर स्वत:चे काही बरेवाईट करून घेतील, या भीतीपोटी आपण ते फेकल्याचे हॅली यांनी मान्य केले व कचरापेटीत पिस्तूल शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कचरावेचकाने ते आपल्या घरी नेले होते. कालांतराने पोलिसांनी ते जप्त केले. डेल्वेअरचे सरकारी वकील डेव्हिड वाईस यांनी हंटर यांना न्यायालयात खेचले. पिस्तूल प्रकरणाबरोबरच करचुकवेगिरीचाही आरोप हंटर यांच्यावर असून ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे.
हेही वाचा >>> न्यूझीलंडच्या नागरिकांचे ऑस्ट्रेलियात स्थलांतर; कारण काय?
आणखी कोणते आरोप आहेत?
वाईस यांनी हंटर बायडेन यांना करचुकवेगिरी प्रकरणातही न्यायालयात खेचले आहे. २०१४ साली युक्रेनमधील बरिझ्मा समूह या ऊर्जा क्षेत्रातील खासगी कंपनीने हंटर बायडेन आपल्या संचालक मंडळात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांचे उपाध्यक्ष असलेले जो बायडेन त्या वेळी युक्रेन धोरणाचे निरीक्षक होते. विशेष म्हणजे, बरिझ्मावर सुरू असलेले खटले युक्रेनच्या अध्यक्षांनी त्याच काळात मागे घेतले. हंटर यांनी प्रशासनातील महत्त्वाच्या व्यक्तीचा नातलग असल्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुनावणी सप्टेंबरमध्ये, अध्यक्षीय निवडणुकीच्या दोन महिने आधी होण्याची शक्यता आहे.
कधी आणि किती शिक्षा होणार?
डेल्वेअरच्या जिल्हा न्यायाधीश मेरिलेन नोरिका यांनी सुनावणीची पुढील तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र दोषी ठरल्यापासून साधारणत: १२० दिवसांच्या आत शिक्षा सुनावली जाते. हंटर यांना करचुकवेगिरीच्या प्रकरणात १७ वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. दोन्ही प्रकरणांत मिळून २५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. मात्र पिस्तूल प्रकरणातील सर्वांत गंभीर गुन्ह्यालाही १५ ते २१ महिने तुरुंगवासाची तरतूद असून ते सर्व शिक्षा एकाच वेळी भोगू शकतात. जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्व प्रकारचे कायदेशीर मार्ग चोखाळले जातील, असे हंटर यांचे वकील एब लोवेल यांनी जाहीर केले आहे. लोवेल यांनी बचाव करताना तीन मुद्दे मांडले होते. २०२२मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हत्यार अधिकार कायद्याचा विस्तार केल्यानंतर डेल्वेअरचा प्रस्तुत कायदा असंविधानिक असल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे. पिस्तूल खरेदीवेळी हंटर हे व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत होते, त्यामुळे त्यांनी खोटी माहिती दिलेली नाही आणि तिसरे म्हणजे, हा खटला राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे.
बायडेन यांना फटका बसेल?
डेव्हिड वाईस यांची नियुक्ती तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ट्रम्प विरुद्ध बायडेन असा सामना होऊ घातला आहे. गेल्याच महिन्यात न्यू यॉर्कच्या न्यायालयात ‘हश मनी’ (गप्प राहण्यासाठी पॉर्न स्टारला पैसे दिल्याचे प्रकरण) खटल्यात ट्रम्प दोषी आढळले आहेत. त्यामुळे ‘आमचे ट्रम्प तर तुमचे हंटर’ या न्यायाने रिपब्लिकन पक्षाने आणि त्यांच्याशी संबंधित वकिलांनी हे प्रकरण मोठे केले आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईपर्यंत हंटर प्रकरण पेटते ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, हे नक्की… याला बायडेन प्रशासन आणि डेमोक्रेटिक पक्ष कसा सामोरा जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
amol.paranjpe@expressindia.com