गेल्या काही वर्षांत देशातील गृहनिर्माण क्षेत्राची जोरदार आगेकूच सुरू आहे. मात्र, ही वाढ सर्वच प्रकारच्या घरांमध्ये एकसमान दिसून येत नसल्याचे समोर आले आहे. आलिशान घरांना दिवसेंदिवस मागणी वाढू लागल्याने विकासक त्यांना प्राधान्य देत आहेत. यामुळे परवडणाऱ्या घरांचा पुरवठा आणि विक्री मंदावली आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये गेल्या पाच वर्षांत घरांच्या एकूण विक्रीत परवडणाऱ्या घरांचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आले आहे. अनारॉक ग्रुपने देशातील मालमत्ता क्षेत्राचा जानेवारी ते मार्च तिमाहीचा अहवाल जाहीर केला असून, त्यातून ही वस्तुस्थिती उघड झाली आहे.
गृहविक्रीची नेमकी स्थिती काय?
देशातील सात महानगरांत यंदा पहिल्या तिमाहीत एक लाख ३० हजार घरांची विक्री झाली. यात दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई या सात महानगरांचा समावेश आहे. यंदा पहिल्या तिमाहीमध्ये घरांच्या एकूण विक्रीत ४० लाख रुपयांपर्यंत किंमत असलेली परवडणारी घरे २६ हजार ५४५ म्हणजेच २० टक्के आहेत. यंदा पहिल्या तिमाहीत घरांच्या एकूण विक्रीत दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेली आलिशान घरे २७ हजार ७० म्हणजेच २१ टक्के आहेत. याच वेळी ४० लाख ते १.५ कोटी रुपयांपर्यंत किंमत असलेली मध्यम ते उच्च श्रेणीतील घरे ७६ हजार ५५५ म्हणजेच ५९ टक्के आहेत. देशातील सात महानगरांत पहिल्या तिमाहीत एक लाख १० हजार ८६० नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, त्यातील २५ टक्के आलिशान घरे आणि १८ टक्के परवडणारी घरे आहेत.
हेही वाचा >>> विश्लेषण : मचाणपर्यटन उपक्रमावर आक्षेप कोणते?
पाच वर्षांपूर्वी काय चित्र?
देशात पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ च्या पहिल्या तिमाहीत घरांच्या एकूण विक्रीत परवडणाऱ्या घरांचे प्रमाण ३७ टक्के होते. गेल्या पाच वर्षांत परवडणाऱ्या घरांची संख्या सातत्याने कमी होत गेली आहे. देशभरात २०१९ च्या पहिल्या तिमाहीत घरांच्या एकूण विक्रीत आलिशान घरांचे प्रमाण केवळ चार टक्के होते. गेल्या पाच वर्षांत ते वाढत जाऊन २१ टक्क्यांवर पोहोचले. देशात पाच वर्षांपूर्वी अगदी उलट चित्र होते. परवडणाऱ्या घरांची विक्री त्या वेळी सर्वाधिक, तर आलिशान घरांची विक्री अतिशय कमी होती. देशात पाच वर्षांपूर्वी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या एकूण घरांमध्ये ४४ टक्के परवडणारी घरे आणि नऊ टक्के आलिशान घरे असे प्रमाण होते.
महानगरनिहाय परिस्थिती कशी?
महानगरांचा विचार करता घर विक्रीचे वेगवेगळे चित्र दिसून आले आहे. दिल्लीत घरांच्या एकूण विक्रीत आलिशान घरांचे प्रमाण सर्वाधिक ३९ टक्के आहे. याच वेळी कोलकात्यात परवडणाऱ्या घरांचे प्रमाण तब्बल ४९ टक्के आहे. कोलकात्यात पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत गृहनिर्माण बाजारपेठेत फारसा बदल झालेला दिसून आला नाही. मात्र, दिल्लीत पाच वर्षांपूर्वी परवडणाऱ्या घरांचे प्रमाण सर्वाधिक होते, तर आता आलिशान घरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. बंगळुरू, मुंबई, चेन्नई, पुणे आणि हैदराबादमध्ये ४० लाख ते १.५ कोटी रुपये किमतीच्या मध्यम ते उच्च श्रेणीतील घरांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
हेही वाचा >>> ‘हेपिटायटिस ए’ रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, १२ जणांच्या मृत्यूनंतर केरळमध्ये अलर्ट; हा संसर्गजन्य आजार किती घातक?
करोना संकटानंतर काय बदल झाले?
करोना संकटानंतर आलिशान घरांचा पुरवठा आणि विक्री वाढत गेली. करोना संकटापूर्वी नवीन घरांच्या एकूण पुरवठ्यात आलिशान घरांचे प्रमाण केवळ ११ टक्के होते. यंदा पहिल्या तिमाहीचा विचार करता आलिशान घरांचा पुरवठा २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील सात महानगरांत २०१९ मध्ये पूर्ण वर्षभरात २५ हजार ७७० आलिशान घरांचा पुरवठा झाला. यंदा पहिल्या तिमाहीत त्यापेक्षा अधिक २८ हजार २० आलिशान घरांचा पुरवठा झाला आहे. करोना संकटाच्या आधी परवडणाऱ्या घरांना ग्राहकांची पसंती होती. मात्र, करोना संकटानंतर ग्राहकांकडून मोठ्या आकाराच्या आणि आलिशान घरांना प्राधान्य दिले जात आहे.
भविष्यात चित्र कसे असेल?
सध्या आलिशान घरांचा पुरवठा आणि विक्री वाढत असून, परवडणाऱ्या घरांची संख्या कमी होत आहे, असे निरीक्षण नोंदवून अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले, की मोठे विकासक मोक्याच्या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प उभारत आहेत. त्यामुळे आलिशान घरांना मागणी वाढत आहे. सध्या देश लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यातून जात आहे. निवडणुकीनंतर केंद्रात सत्तेत येणाऱ्या सरकारने परवडणाऱ्या घरांसाठी विकासक आणि ग्राहकांना सवलती, तसेच प्रोत्साहनपर अनुदान दिल्यास या घरांचीही संख्या वेगाने वाढू शकेल.
sanjay.jadhav@expressindia.com