जयेश सामंत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चर्चेच्या शेवटच्या फेऱ्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठाण्याची जागा, तसेच विद्यमान खासदारांच्या जागा पदरात पाडून घेण्यात बऱ्यापैकी यश मिळविल्याचा दावा निकटवर्तीयांकडून केला जात आहे.

राज्यातील महायुतीच्या जागावाटप चर्चेवर दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरू असलेली खलबते आता अंतिम टप्प्यात आली आहेत. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापैकी कोण किती आणि कुठल्या जागांवर निवडणूक लढविणार हे लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये आणि विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या १३ खासदारांच्या मनातील धाकधुक मात्र वाढू लागली आहे. 

आशा-निराशेचा खेळ… 

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला एक आकडी जागांवर समाधान मानावे लागेल अशी चर्चा होती. त्यामुळे पवारांपेक्षा मुख्यमंत्र्यांच्या गोटात कमालीची अस्वस्थता होती. असे असले तरी दिल्ली दरबारी झालेल्या चर्चेच्या शेवटच्या फेऱ्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठाण्याची जागा, तसेच विद्यमान खासदारांच्या जागा पदरात पाडून घेण्यात बऱ्यापैकी यश मिळविल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे. अर्थात अंतिम जागावाटप जाहीर झाल्यानंतरच भाजपच्या दिल्ली दरबारी मुख्यमंत्र्यांचा मान किती राखला गेला हे स्पष्ट होईल.

हेही वाचा >>> विश्लेषण : गाय-दूध अनुदान योजना का रखडली ?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले खासदार कोण?

शिंदे यांच्या बंडात महाराष्ट्रातील ४० आमदारांचा एक मोठा गट सहभागी झाला. या आमदारांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. या बंडानंतर मुख्यमंत्री पदाची सूत्रेही नाट्यमय घडामोडींनंतर शिंदे यांच्याकडे आली. थेट मुख्यमंत्रीपद आणि भाजपमधील ‘महाशक्ती’चा खुला पाठिंबा पाहून नंतरच्या काळात शिंदे यांच्यासोबत येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या १८ पैकी १३ खासदारांची फळी शिंदे यांच्यामागे उभी राहिली. यामध्ये शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे (कल्याण), राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई) , हेमंत पाटील (हिंगोली), प्रतापराव जाधव (बुलडाणा), कृपाल तुमाणे (रामटेक), भावना गवळी (यवतमाळ-वाशीम), श्रीरंग बारणे (मावळ), संजय मंडलिक (कोल्हापूर), धैर्यशील माने (हातकणंगले), सदाशिव लोखंडे (शिर्डी), हेमंत गोडसे (नाशिक), राजेंद्र गावित (पालघर) आणि गजानन किर्तीकर (वायव्य मुंबई) यांचा समावेश आहे.

शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या जागा कोणत्या?

मागील लोकसभा निवडणुकीत एकसंध असलेल्या शिवसेनेने एकूण २२ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी मुंबईतील दक्षिण मुंबई, रायगड, शिरूर या जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीचा आग्रह असल्याने जागावाटपाच्या चर्चेची सुरुवातच मुख्यमंत्र्यांसाठी वजाबाकीने झाली. चर्चेच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्यासोबत आलेल्या १३ खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवून देण्याचे आव्हान शिंदे यांच्यापुढे निर्माण झाले. त्यातही ठाणे या प्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघावर भाजपने यंदा जोरकसपणे दावा केल्याने शिंदे यांची मोठी अडचण झाल्याची चर्चा आहे. हेमंत गोडसे यांचा नाशिक, कृपाल तुमाणे यांचा रामटेक, सदाशिव लोखंडे यांचा शिर्डी, राजेंद्र गावित यांचा पालघर, गजानन किर्तीकर यांचा वायव्य मुंबई हे मतदारसंघ पुन्हा पदरात पाडून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागत असल्याची चर्चा आहे. याशिवाय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भावासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघही मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचा ठरला आहे. येथून भाजपतर्फे नारायण राणे यांचा उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा >>> तुम्ही दिवसभरात ७ ते ११ तास बसून काम करता? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

मुख्यमंत्र्यांसाठी किती जागा ‘सन्मानजनक’ ठरतील?

मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का देण्याचा प्रयत्न सातत्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोटातून होताना दिसतो. असे असले लोकसभेच्या जागावाटपात त्यांच्या पक्षाला नेमक्या किती आणि कोणत्या जागा मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकसंध शिवसेनेने मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि वायव्य मुंबईच्या जागा मागील निवडणुकीत जिंकल्या होत्या. यापैकी दक्षिण मुंबई आणि वायव्य मुंबईवर भाजपचा दावा यंदा प्रबळ मानला जातो. जोगेश्वरी मतदारसंघाचे आमदार रविंद्र वायकर यांचा शिवसेनाप्रवेश घडवून मुख्यमंत्र्यांनी वायव्य मुंबईवरील दावाही प्रबळ केला असला तरी दक्षिण मुंबईचा मतदारसंघ त्यांच्या हातून जाईल असेच चित्र आहे. मुंबईत किमान दोन जागा लढवायला मिळाल्या तरी त्या मुख्यमंत्र्यांसाठी सन्मानजनक ठरतील. विदर्भात रामटेकची जागा, कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जागा पक्षाच्या पदरात पाडून घेण्यात यश आल्यास मुख्यमंत्र्यांसाठी तो मोठा विजय ठरेल. शिवाय दिल्ली दरबारी अजूनही आपल्या शब्दाला मान आहे हे त्यांना ठसविता येईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis maharashtra cm eknath shinde firm on tickets for all 13 sitting mps print exp zws