दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मॉर्ने मॉर्केलची भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात मॉर्केलवर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मॉर्केलसमोर आगामी काळात कोणती आव्हाने असतील, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाजी बळकट करण्यासाठी तो काय करू शकतो, याचा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॉर्केलची प्रशिक्षक म्हणून कारकीर्द कशी?

मॉर्केल भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रेंची जागा घेणार आहे. सध्या तरी मॉर्केल मुख्य प्रशिक्षक गंभीर, साहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर व रायन टेन डॉएशे, तसेच क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी. दिलीप यांच्यासह काम करेल. मॉर्केलकडे गेल्या डिसेंबरपर्यंत पाकिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी होती. मॉर्केलने लखनऊ सुपर जायंट्ससाठी ‘आयपीएल’ हंगामात (२०२२-२३ ) गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली, त्यावेळी गंभीर मुख्य प्रशिक्षक होता. यासह ‘एसए२०’ मध्ये डरबन सुपर जायंट्सबरोबरही गंभीर आणि मॉर्केल एकत्र होते. ८६ कसोटी, ११७ एकदिवसीय व ४४ ट्वेन्टी-२० सामन्यांत मिळून ५४४ गडी बाद करणाऱ्या मॉर्केलने निवृत्तीनंतर जगातील अनेक संघांसोबत सल्लागार म्हणून काम पाहिले. त्याने २०२३ महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान न्यूझीलंड संघासोबत काम केले. तर पुरुषांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान नामिबिया संघालाही मॉर्केलचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा >>> New Zealand Cricketers: न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंचं ब्रेनड्रेन; देशाऐवजी फ्रीलान्स खेळायला प्राधान्य

गंभीर व मॉर्केल यांच्यातील नाते कसे?

गंभीरच्या पसंतीमुळेच मॉर्केललाची गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाली. भारताचा माजी गोलंदाज आर. विनय कुमारही या पदासाठी शर्यतीत होता. गंभीर व मॉर्केल यांची जवळीक समजली जात असली, तरीही एकेकाळी मॉर्केलचा सामना करताना गंभीरला अडचण येत होती. ‘‘मी जेव्हा दिल्ली डेअरडेव्हिल्स (आताची दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळायचो. तेव्हा मी त्याचा सामना करायचो. तेव्हा मला मॉर्केलसारखा गोलंदाज संघात असावा असे वाटायचे.’’ असे गंभीर एका मुलाखतीत म्हणाला होता. कसोटीतही मॉर्केलच गंभीरला वरचढ ठरला होता. भारतात २०१०च्या मालिकेत मॉर्केलने गंभीरला तीन डावांत दोन वेळा बाद केले होते. त्यानंतर पुढील वर्षी झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात गंभीरने तीन अर्धशतके झळकावली. ‘आयपीएल’ संघासोबत असताना गंभीर मॉर्केलबरोबर काम करत असताना काही सल्ला देण्यापूर्वी विचार करायचा. प्रशिक्षक म्हणून मॉर्केलच्या कारकीर्दीचा सुरुवातीचा टप्पा आहे. त्यामुळे तो कितपत यशस्वी ठरतो यावर गंभीरचे भविष्यही अवलंबून असेल.

भरत अरुण व पारस म्हाम्ब्रे यांचा वारसा…

भरत अरुण यांनी २०१४ पासून भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची धुरा सांभाळली. यानंतर रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर २०१७ ते २०२१ दरम्यान भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. अरुण यांनी आपल्या कारकीर्दीदरम्यान मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा यांना घडविण्यात हातभार लावला. त्यानंतर त्यांनी जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन केले. सध्या हे दोघेही भारताचे प्रमुख गोलंदाज गणले जातात. शास्त्री यांच्या काळात अरुण यांनी अनेक युवा गोलंदाजांना स्थान दिले. त्यामध्ये अष्टपैलू शार्दूल ठाकूर व टी. नटराजनचा समावेश आहे. बुमरा अरुण यांच्या कार्यकाळात आला आणि सध्या तो जगातील दिग्गज गोलंदाज म्हणून ओळखला जातो. २०२१मध्ये माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. मग, पारस म्हाम्ब्रेंनी संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची भूमिका पार पाडली. अरुण यांचा वारसा म्हाम्ब्रे यांनी पुढे चालवला. कार्यभार व्यवस्थापनाने भारतीय गोलंदाजांची कामगिरी चांगली झाली. कुठल्या खेळपट्टीवर कोणता गोलंदाज प्रभावी ठरू शकतो, यानुसार गोलंदाजीत बदल करण्यात आले व त्याचा फायदा संघाला झाला. भारताने द्रविड यांच्या कार्यकाळात २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. तर, २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवले. मॉर्केलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्याकडूनही अशाच अपेक्षा असतील.

हेही वाचा >>> युक्रेनच्या आक्रमणाला ब्रिटिश रणगाड्यांची कुमक; रशियात तणाव

आगामी काळात आव्हाने…

गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने पहिल्यांदाच श्रीलंकेचा दौरा केला. यामध्ये भारताने ट्वेन्टी-२० मालिका जिंकली. मात्र, एकदिवसीय मालिकेत भारताच्या पदरी निराशा पडली. या दौऱ्यावर साईराज बहुतुलेंकडे भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी होती. आता मॉर्केल यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पुढील महिन्यात बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात कसोटी सामने खेळणार आहेत आणि त्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दोन्ही संघांचे मिळून पाच कसोटी सामने होतील. मग, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. हे सर्व सामने जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा भाग असल्याने मॉर्केलचे योगदान यामध्ये महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे मॉर्केलच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष राहील.

कोणते वेगवान गोलंदाज घडविण्यावर भर?

वेगवान गोलंदाज म्हटले की, त्यांच्या वाट्याला दुखापत आलीच. मोहम्मद शमी हा भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. मात्र, गेल्या काही काळापासून त्याला दुखापतींचा सामना करावा लागत आहे. त्याच्या अनुपस्थितीत सिराज व युवा अर्शदीप सिंगने चमक दाखवली. अर्शदीप आगामी काळात आपल्याला कसोटीतही खेळताना दिसेल. त्यामुळे चांगले वेगवान गोलंदाज घडविण्याची जबाबदारीही मॉर्केलवर असेल. गेल्या हंगामात मयांक यादवच्या वेगाने सर्वांचे लक्ष वेधले. मात्र, त्यालाही दुखापतीचा सामना करावा लागला. मॉर्केलने त्याची गोलंदाजी पाहिली आहे. त्यामुळे नक्कीच तो आगामी काळात त्याच्यावर मेहनत घेईल. गेल्या काही काळात ‘आयपीएल’मध्ये अनेक चांगले गोलंदाज पाहायला मिळाले. ज्यामध्ये प्रसिध कृष्णा, आकाश दीप, हर्षित राणा, आवेश खान व युवा उमरान मलिक यांसारख्या गोलंदाजांना घडविण्याची मोठी जबाबदारी मॉर्केलवर असेल. बुमरा, सिराज व अर्शदीप यांचे कार्यभार व्यवस्थापन केल्यास त्यांच्या जागी भारताला चांगले वेगवान गोलंदाज गरजेचे आहे. त्यामुळे मॉर्केल कसा या गोलंदाजांना हाताळतो यावर सर्वांचे लक्ष राहील.

बहुतुलेंच्या जबाबदारीचे काय?

गंभीरच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारताचा माजी लेगस्पिनर साईराज बहुतुलेवर गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी होती. मात्र, मॉर्केल याची निवड झाल्यानंतर बहुतुलेंच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला फिरकीपटूंची चांगली फळी उभी करायची आहे. त्यातच संघात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा व कुलदीप यादव हे फिरकीपटू आहेत. त्यामुळे बहुतुले फिरकी सल्लागार म्हणून आगामी काळातही संघासोबत दिसू शकतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis morne morkel india bowling coach prefers by gautam gambhir print exp zws