विषयानुरूप परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांची मांडणी करून विद्यार्थ्यांची ‘प्रगती’ किंवा अधोगती ठरवणाऱ्या प्रगती पुस्तकाचे स्वरूप आता बदलणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि परख या यंत्रणेने ही संकल्पना मांडली आहे…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रगती पुस्तकात काय बदल होतील?

सध्या वार्षिक परीक्षा किंवा वर्षभर घेण्यात येणाऱ्या लेखी, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिके, प्रकल्प यांतील गुणांआधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते. त्यातून शैक्षणिक मूल्यमापन होते. विशिष्ट विषय किंवा संकल्पना किती अवगत आहेत त्याचे मोजमाप होते. मात्र त्यापुढे जाऊन या नव्या प्रारूपात विद्यार्थ्यांची सामाजिक, भावनिक जाण, सर्जनशीलता किती विकसित झाली त्याचाही अदमास घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनाच त्यांच्या प्रगतीचे मोजमाप करण्याच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:चे मूल्यमापन करायचे आहे. त्यांची बलस्थाने आणि कमकुवत क्षेत्रे त्यांनी नमूद करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा >>> मिथेन वायूची मानवी इतिहासातील मोठी गळती, तयार राहा परिणामांना कारण…

हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी

अगदी पहिलीपासून या पद्धतीची ओळख करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी त्यांच्या सहाध्यायांबद्दल मत व्यक्त करायचे आहे. पाल्याच्या कौशल्य विकासात नेमके काय अपेक्षित होते आणि त्यापैकी पाल्याने काय अवगत केले याबाबत पालकांचे मतही समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक प्रगती, प्रकल्प, उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अवगत केलेली कौशल्ये याचेही तपशील प्रगती पुस्तकात असतील. पहिली ते आठवी म्हणजे पूर्वप्राथमिक ते उच्च प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या प्रगती पुस्तकाचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

हा बदल कशासाठी?

एखाद दिवशी घेण्यात आलेल्या परीक्षेतून विद्यार्थ्यांची कौशल्ये जोखता येतात का हा गेली अनेक वर्षे वादाचा मुद्दा आहे. परीक्षेच्या वेळची एकंदर स्थिती, विद्यार्थ्यांची तत्कालीन मानसिक स्थिती यांचा परिणाम त्यांच्या परीक्षा देण्यावर होत असतो. तसेच, शैक्षणिक विषयांच्या मूल्यमापनातून विद्यार्थ्यांचा नेमका विकास कळतो का, असे प्रश्न सध्याच्या मूल्यमापन प्रणालीबाबत वारंवार उपस्थित झाले. या सगळ्या बाबींचा विचार करून सर्वंकष मूल्यमापन आराखडा तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> हजरतबल विकास प्रकल्प: पंतप्रधान मोदी आणि भाजपाने का घेतला पुढाकार? काय आहे त्याचे महत्त्व?

विद्यार्थी स्वयंमूल्यमापन कसे करणार?

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्वत:बाबत, शिकलेल्या कौशल्यांबाबत, भावनांबाबत विचार प्रवृत्त करणारे प्रश्न विचारण्यात येतील. त्या माध्यमातून त्यांचा कल समजून घेण्यात येईल. कुटुंब, परिसर यांबद्दल विद्यार्थ्यांची समज जाणून घेण्यात येईल. जागरूकता, संवेदनशीलता, कल्पकता अशा तीन घटकांचे मूल्यमापन होणार आहे. त्याची पातळी स्ट्रीम, माउंटन आणि स्काय अशा तीन पातळ्यांवर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याची प्राथमिक समज म्हणजे स्ट्रीम स्तर, विद्यार्थ्याला परिस्थितीनुसार किंवा विषयानुसार प्रश्न पडणे प्राथमिक स्तरावरील विश्लेषण करणे म्हणजे माऊंटन स्तर आणि मिळालेली माहिती, कौशल्य, ज्ञान याचा वापर करून प्रश्न सोडवणे म्हणजे स्काय असे मूल्यमापन करण्यात येईल. स्वयंमूल्यमापनात सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे लक्ष्य निश्चित करायचे आहे. तसेच ते कधीपर्यंत गाठणार त्याची मुदतही निश्चित करायची आहे. त्यानुसार त्यांनी त्यांचे वर्षाअखेरीस मूल्यमापन करायचे आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून असलेल्या अपेक्षा, कोणत्या विषयात काय स्वरूपाची मदत हवी तेही नमूद करायचे आहे.

अंमलबजावणीतील आव्हाने काय?

राज्यांनी या आराखड्याचे अनुकरण करावे किंवा आनुषंगिक बदल करून नव्या धाटणीचे प्रगती पुस्तक द्यावे, अशी सूचनाही राज्यांना देण्यात आली आहे. स्वयंमूल्यमापन ही पद्धत जागतिक पातळीवर अनेक ठिकाणी वापरली जाते. मात्र लहान मुलांना स्वयंमूल्यमापनाबाबत जागरूक करणे हे काहीसे आव्हानात्मक ठरणारे आहे. शिक्षकांनाही या नव्या पद्धतीचे योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. राज्यांनी आराखडा स्थानिक परिस्थितीनुसार बदलताना त्याचा मूळ हेतू साध्य होईल इतपत बदल करणे आवश्यक आहे.

मुलांच्या विकासाचे सर्वंकष चित्र मांडणे हा प्रस्तावित प्रगती पुस्तकामागील हेतू आहे. मात्र त्यासाठी सध्याची अध्यापन पद्धत, परीक्षा पद्धत यातही बदल करणे आवश्यक आहे. ते बदलही प्रस्तावित आहेत. यापूर्वीच सर्वंकष मूल्यमापनाची कल्पना मांडण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजेच वर्षभर प्रकल्प, खेळ, उपक्रम आशा विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांनी अवगत केलेल्या कौशल्यांचे मोजमाप करणे अपेक्षित होते. चाचणी, सहामाही, वार्षिक अशा प्रचलित परीक्षा पद्धतीला पर्याय म्हणून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धत सुचवण्यात आली होती. मात्र परीक्षाच रद्द असा त्याचा अर्थ लावल्यामुळे अंमलबजावणीच्या पातळीवर ती पद्धत फसली. आता मांडण्यात आलेली संकल्पना ही सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या पुढील टप्पा आहे. त्यामुळे अंमलबजावणीच्या दृष्टीने निगुतीने विचार आवश्यक आहे.

rasika.mulye@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis ncert and parakh proposed redesigning the assessment system of school students zws