सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी नवनवीन क्लृप्त्यांचा वापर करतात. आता त्यांनी फसवणुकीची नवीन पद्धत शोधून काढली. भ्रमणध्वनीद्वारे एखाद्याला डिजिटल लग्नपत्रिकेची फाइल पाठवायची. संबधितांनी ती फाइल डाउनलोड केली की, त्या खात्यातील पैसे स्वतःच्या खात्यात वळते करून घ्यायचे, असा हा फसवणुकीचा हा नवा प्रकार असून तो ‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ या नावाने ओळखला जातो. याद्वारे आतापर्यंत महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात हजारो लोकांची फसवणूक करण्यात आली आहे.
काय आहे ‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’?
सायबर गुन्हेगारांनी आता ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी भावनिक कार्ड वापरले आहे. ते ‘डॉट एपीके’ फाइलचा वापर करून ग्राहकांच्या बँक खात्यावर किंवा पेमेंट ॲपवर डल्ला मारत आहेत. लग्नाचे निमंत्रण पाठवल्याचे सांगून ‘डॉट एपीके’ फाइल वॉट्सॲपवर पाठवण्यात येते. ती फाइल उघडल्यास मोबाइल काही वेळासाठी बंद पडतो आणि पुन्हा आपोआप सुरू होतो. अनेकांना वाटते की काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा. परंतु, त्या दोन मिनिटाच्या काळात आपल्या मोबाइलवर सायबर गुन्हेगार पूर्णपणे नियंत्रण मिळवतो.
हेही वाचा >>> पाकिस्तानातील पहिले हिंदू पोलीस अधिकारी; कोण आहेत राजेंद्र मेघवार?
काय असते ही ‘डॉट एपीके’ फाइल?
‘एपीके’ फाइल म्हणजेच अँड्रॉइड पॅकेजिंग किट होय. या फाइलचा वापर सायबर गुन्हेगार एखाद्याच्या मोबाइलमध्ये किंवा संगणकामध्ये छुप्या पद्धतीने व्हायरस सोडण्यासाठी करतात. ती फाइल इन्स्टॉल झाली की आपल्या मोबाइलमधील फोटो गॅलरी, टेक्स्ट मेसेज, मोबाइल नंबर, फोटो, व्हिडिओ, बँक खाते, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट ॲप यासोबतच ‘व्हॉट्सॲप’, फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे नियंत्रण सायबर गुन्हेगाराकडे जाते. मोबाइलमध्ये डाउनलोड केलेल्या आधारकार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो व अन्य कागदपत्रांचाही गैरवापर केला जातो.
अशी होते फसवणूक…
सायबर गुन्हेगार एपीके फॉरमॅटमध्ये एक फाइल पाठवतात. त्यावर लग्नपत्रिका किंवा इंग्रजीत Wedding Invitation असे लिहिलेले असते. नातेवाईकाकडून निमंत्रण असल्याचे वाटल्याने अनेक जण उत्सुकतेपोटी ती एपीके फाइल ओपन करतात. काही सेकंदात ती फाइल मोबाइलमध्ये इन्स्टॉल होते. सायबर गुन्हेगार मोबाइलवर ताबा मिळवून आपल्या बँक खात्याची तपासणी करतात. आपल्या मोबाइलमधील पेटीएम, गुगल पे व अन्य पेमेंट ॲपचा बिनधास्त वापर करतात. महागड्या वस्तू ऑनलाइन खरेदी करतात. जाळ्यात अडकलेल्या ग्राहकाच्या ‘पेमेंट ॲप’मधून त्याचे पेमेंट करण्यात येते. तसेच बँक खात्यातील रक्कम सायबर गुन्हेगार स्वतःच्या खात्यात वळते करतात.
हेही वाचा >>> ‘Nomura’ कंपनीच्या सीईओने केली स्वतःच्या पगारात कपात; कारण काय? ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची कारणं काय?
सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य कोण?
सायबर गुन्हेगाराचे लक्ष्य शासकीय नोकरी करणारे, शासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी, मोठे व्यापारी आणि बँक खात्यात मोठी रक्कम ठेवणाऱ्या व्यक्ती असतात. यापैकी कुणाच्याही मोबाइलमध्ये एपीके फाइल इन्स्टॉल झाल्यास सायबर गुन्हेगार लगेच बँक खात्याची माहिती घेतात. खात्यातून परस्पर पैसे आपल्या खात्यात वळते करतात. ज्यांच्या खात्यात कमी पैसे आहेत, अशा लोकांच्या मोबाइलमधून एपीके फाइल्स निष्क्रियसुद्धा करतात.
कोणत्या राज्यातून चालते ही साखळी?
झारखंडमधील जामतारा, राजस्थानमधील अलवर, नूह, मेवात, देवघर, बोकारो, करमातांड आणि गिरीडोह या शहरांतून सायबर गुन्हेगार सध्या सक्रिय आहेत. सर्वाधिक सायबर गुन्हेगार आता जामतारा आणि अलवर शहरातून सूत्रे हलवतात. एपीके फाइल्स पाठवण्याचे सर्वाधिक प्रकार झारखंड आणि राजस्थान दोन राज्यांतून करण्यात येत आहेत. दोन्ही राज्यांतील सायबर गुन्हेगारांमध्ये एपीके फाइल्स पाठविण्याची स्पर्धाच लागलेली आहे. सध्या भारतातून जवळपास १२०० कोटी रुपयांची फसवणूक सायबर गुन्हेगारांनी केली आहे.
फसवणूक झाल्यावर काय करावे?
‘एपीके’ (अँड्रॉइड पॅकेजिंग किट) स्वरूपाच्या ‘फाइल्स मोबाइलमध्ये डाउनलोड’ करू नये. परंतु, अनावधानाने किंवा उत्सुकतेपोटी अशी फाइल डाउनलोड झाल्यास सायबर तज्ज्ञाकडून ती फाइल शोधून अनइन्स्टॉल करता येते. परंतु, आपल्या खात्यातून परस्पर पैसे काढल्या गेल्यास त्वरित १९३० या क्रमांकावर फोन करावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी. तसेच सायबर https://cybercrime.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार करावी.
anil.kamble@expressindia.com