पंढरीतील विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन १५ मार्च ते १ जून या काळात यंदा मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी बंद ठेवले होते. हे दर्शन नुकतेच पुन्हा सुरू झाले. या निर्णयामुळे चर्चेत आलेल्या विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन परंपरा आणि पद्धतीचा हा वेध…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पदस्पर्श दर्शन म्हणजे काय?   

पदस्पर्श दर्शन म्हणजे विठ्ठल मूर्तीच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेणे. पंढरीचा विठुराया आणि रुक्मिणीमातेचे असे दर्शन घेताना भाविकांना मंदिराच्या थेट गर्भगृहामध्ये प्रवेश करता येतो. तसेच देवाच्या मूर्तीला हात लावून पायावर डोके ठेवून दर्शन घेता येते. वारकरी संप्रदायात ‘देव उरा उरी भेटे’ असे संतवचन आहे. शेकडो वर्षांपासून वारकरी संप्रदायात भेदाभेद अमंगळ मानला जातो. त्यामुळे विठ्ठलाच्या या मंदिरात इतर देवस्थानांप्रमाणे विशिष्ट पोशाख, सोवळे अशा कुठल्याही अडथळ्यांविना सर्वांना थेट प्रवेश आणि दर्शन घेण्याची परंपरा आहे.  

पदस्पर्श दर्शनाचे महत्त्व किती आणि कसे?

विठ्ठलाचा भाविक हा समाजातील सर्व स्तरांतील आणि देशव्यापी आहे. हा भाविक देवाच्या दर्शनाची आस घेत ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेकडो मैल पायी चालत येतो. देवाच्या पायावर डोके टेकवण्यासाठी तासन् तास रांगेत उभा राहतो. विठुरायाच्या या अशा स्पर्श अनुभूतीनंतर त्याला स्वर्गप्राप्तीचे सुख मिळते. दुसरीकडे केवळ भाविकांनाच नाही तर देवालादेखील भक्तांच्या दर्शनाची आस लागलेली असते. ‘वाट पाहे उभा भेटीचे आवडी, कृपाळू तातडी उतावीळ’ या अभंगाप्रमाणे विठुरायालादेखील भक्तांच्या दर्शनाची आस लागलेली असते. अशा या लाडक्या विठुरायाला पदस्पर्श दर्शनातून अगदी जवळून पाहता-अनुभवता येत असल्यामुळे याला वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘एमएमआरडीए’ आर्थिक संकटात कशी?

पदस्पर्श दर्शन आजवर कधी बंद ठेवले होते? 

विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन हे आजवर केवळ दोनदा अपवादात्मक वेळीच बंद ठेवण्यात आले आहे. २०२० मध्ये आलेल्या करोना साथीच्या काळात ते तब्बल दीड वर्षासाठी बंद होते. यानंतर या वर्षी १५ मार्च ते १ जून या कालखंडात मंदिराच्या संवर्धनाच्या कामासाठी ते दुसऱ्यांदा बंद ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर प्लेगच्या साथीतदेखील हे पदस्पर्श दर्शन सुरू होते. त्या वेळीदेखील निवडक भाविक दर्शनासाठी येत होते. या काळात बडवे उत्पातांनी देवाचे नित्योपचार सुरू ठेवले होते.

यंदा पदस्पर्श दर्शन बंद का ठेवले? 

विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी यंदा १५ मार्च ते १ जून या काळात पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते. या काळात मंदिरातील सभा मंडप, सोळखांबी, चौखांबी, गर्भगृहाच्या जतनाचे काम, दगडी बांधकामावर लावण्यात आलेल्या फरशा, रंगकाम, चांदीचे आवरण काढून मूळ स्थापत्याला संरक्षण, सुरक्षा पुरवणे, स्वच्छता आदी कामे करण्यात आली. मंदिराला मूळ ऐतिहासिक रूप प्राप्त करून देण्याच्या हेतूने ही सर्व क्रिया पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यामुळे सध्या मंदिराला पुन्हा एकदा ऐतिहासिक रूप प्राप्त झाले आहे. 

हेही वाचा >>> ‘आघाडीधर्मा’मुळे काही मोदींचे ‘वलय’ कमी होणार नाही!

पदस्पर्श दर्शन बंदचा परिणाम काय?

पंढरीला दर्शनासाठी येणारा भाविक हा मुख्यत्वे विठ्ठलाच्या प्रत्यक्ष पदस्पर्श दर्शनाची आस ठेवूनच येत असतो. ज्या काळात असे दर्शन बंद होऊन केवळ दुरून मुखदर्शन सुरू होते, त्या वेळी भाविकांचा पंढरीकडे येणारा ओघही कमी होतो. हे आजवर दोन्ही वेळी पाहण्यास मिळाले आहे. केवळ पदस्पर्श दर्शन बंद असल्यामुळे भाविकांची संख्या रोडावते आणि त्यातून पंढरीतील अर्थकारणही बिघडते. पंढरीत आलेला भाविक देवाचा प्रसाद म्हणून कुंकू, बुक्का, पेढा, चुरमुरे, तुळशीमाळ आदी खरेदी करतो. येणारे भाविक शहरातील विविध लॉज, मठ, धर्मशाळांमध्ये उतरतात. शेकडो हॉटेल व्यावसायिकांचाही रोजगार या भाविकांवर सुरू असतो. मात्र, केवळ पदस्पर्श दर्शन बंद झाले, की भाविकांची ही संख्या कमी होते आणि पंढरीच्या अर्थकारणालाही त्याचा फटका बसतो. 

मंदिर समितीचे म्हणणे…

भाविकांना दर्शन आणि देव अनुभवता यावा यासाठी पदस्पर्श दर्शन अखंडितपणे सुरू ठेवण्यात येतो. आजवर करोना माहामारी काळ आणि आता संवर्धन कामासाठी असे केवळ दोन वेळाच हे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते. या वेळी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी १५ मार्च ते १ जून या कालावधीत असे दर्शन बंद करण्यात आले. या दरम्यान पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचे मोठे काम पार पडले. या काळात गर्भगृहात जात प्रत्यक्ष पदस्पर्श दर्शन शक्य नसल्याने मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले. अखेर आता हे काम पूर्ण झाल्यानंतर आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर हे थेट दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. विठुरायाच्या भेटीची आस घेत पंढरीत येणाऱ्या भाविकाला आता पुन्हा एकदा ‘देव उरा उरी भेटे’ याची प्रचिती येणार असल्याचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथमहाराज औसेकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis pandharpur vitthal padsparsh darshan closed for conservation work of the temple print exp zws