जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये होत असलेले सत्तांतर हे जागतिक राजकारणावर गंभीर आणि दूरगामी परिणाम करणारे आहे. आपल्या दुसऱ्या कारकीर्दीत नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय गोंधळ घालणार, याचे आडाखे बांधायला सुरुवात झाली असताना मंगळवारी आलेल्या एका बातमीने अनेकांच्या भुवया उंचावला… ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दूरध्वनीद्वारे संभाषण केल्याचे वृत्त अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिले. क्रेमलिनने ही बातमी तातडीने फेटाळली असली, तरी यामुळे ‘आता युक्रेनचे काय होणार?’ या चर्चेला सुरुवात झाली आहे.

ट्रम्प-पुतिन यांच्यातील कथित संभाषण काय?

‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकेतील प्रतिष्ठित दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांची अध्यक्षपदी निवड निश्चित झाल्यानंतर दोन दिवसांतच गुरुवारी (७ नोव्हेंबर रोजी) पुतिन आणि ट्रम्प यांच्यात दूरध्वनीद्वारे संभाषण झाले. ‘पोस्ट’ने ट्रम्प यांच्या अनेक निकटवर्तीयांचा हवालाही दिला आहे. युक्रेनमधील युद्ध आता आणखी वाढवू नये, असा सल्ला ट्रम्प यांनी दिल्याचे या बातमीत म्हटले आहे. युरोपमधील अमेरिकेच्या मोठ्या लष्करी उपस्थितीची आठवणही ट्रम्प यांनी करून दिली आहे. क्रेमलिनने या वृत्ताचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला असला, तरी ते समजण्यासारखे आहे. कारण ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील कथित ‘जिव्हाळ्या’चे संबंध जगजाहीर होऊ नयेत, यातच रशियाचे सध्यातरी भले आहे. पण या दोघांची मैत्री काही फार लपून राहिलेली नाही.

Donald trump, Elon Musk, Vivek Ramaswamy, Minimum Government, Maximum Governance
विश्लेषण : इलॉन मस्क, विवेक रामस्वामी ‘सरकार कार्यक्षमता’ मंत्री… ‘टीम ट्रम्प’ आतापासूनच का भरवतेय धडकी?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
elon musk role in trump administration
‘लाभार्थी’ इलॉन मस्कची ट्रम्प प्रशासनात काय भूमिका राहील? त्याच्या कंपन्यांना किती आणि कसा फायदा होणार? 
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”
Putin Ukraine hating Donald Trump victory hit Europe How long will Ukraine stand strong in front of Russia
पुतिनमित्र, युक्रेनद्वेष्टे ट्रम्प यांच्या विजयाने युरोपला धडकी… रशियासमोर युक्रेन किती काळ तग धरणार?
donald trump, US president, narendra modi
विश्लेषण : ‘फिर एक बार ट्रम्प सरकार’… भारताशी संबंध कसे? मोदी ‘कनेक्ट’चा किती फायदा?
Donald Trump won the US presidential election
अमेरिकेत पुन्हा ट्रम्प! अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड; कमला हॅरिस यांचा धक्कादायक पराभव

हेही वाचा >>> विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?

पुतिन आणि ट्रम्प यांची मैत्री?

ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात दोघांमध्ये अनेकदा खासग संभाषण झाल्याचे सांगितले जाते. २०१९ साली ‘पोस्ट’च्या एका बातमीनुसार ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या तीन वर्षांत दोघे किमान १६ वेळा बोलले होते. २०१८ साली हेलसिंकी येथे दोघांनी दोन तास बंद दाराआड चर्चा केली होती. कायदेमंळातील सदस्य आणि पत्रकारांनी अनेकदा विचारूनही ट्रम्प यांनी या भेटीबाबत फारशी माहिती कधीच दिली नाही. या प्रसिद्ध भेटीचा बहुतांश तपशील अद्याप गुलदस्त्यातच आहे. तत्पूर्वी जी २० परिषदांच्या निमित्ताने जर्मनीतील हॅम्बर्ग आणि अर्जेंटिनाची राजधानी ब्रुनोस आयर्स येथेही दोघांमध्ये अशीच ‘गुप्त’ चर्चा झाली होती. या चर्चांचे तपशीलही ‘अमेरिकेच्या अध्यक्षांनी उघड केलेले नाहीत.

हेही वाचा >>> ‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?

ट्रम्प २.०मध्ये युक्रेनचे काय होणार?

डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरल्यापासूनच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की त्यांना भावनिक आवाहने करीत आहेत. युक्रेनच्या भवितव्यासाठी रशियाविरोधात लढत राहणे, हाच पर्याय असल्याचे ट्रम्प यांना पटवून देण्याचा झेलेन्स्की यांचा प्रयत्न आहे. मात्र यामुळे ट्रम्प यांच्या विचारांमध्ये काही बदल झाल्याचे अद्याप तरी दिसलेले नाही. ट्रम्प यांना युक्रेनबाबत कोणतीही सहानुभूती नाही आणि झेलेन्स्की यांना रसद पुरविण्याबाबत कोणतेही स्वारस्य नाही. अमेरिकेने फेब्रुवारी २०२२ पासून युक्रेनला तब्बल १७५ अब्ज डॉलरची आर्थिक आणि लष्करी मदत दिली आहे. मात्र आता ‘अमेरिका प्रथम’ अशी घोषणा देणारे ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर परिस्थिती अमूलाग्र बदलण्याची शक्यता आहे. ‘पुतिन यांना वाटाघाटी करायला लावणे आणि युक्रेन युद्ध थांबवून तिसऱ्या महायुद्धाचा धोका टाळणे,’ ही दोन महत्त्वाची आश्वासने पूर्ण केल्याचे मतदारांना दाखवून देण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असेल. त्यासाठी ते वाट्टेल त्या अटी मान्य करतील, अशी रास्त भीती झेलेन्स्की यांना आहे.

पुतिन यांच्या संभाव्य अटी कोणत्या?

पुतिन यांनी युक्रेनमध्ये सैन्य घुसविले, तेच मुळी युक्रेनसाठी ‘नेटो’चे (नॉर्थ ॲटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) दरवाजे किलकिले झाल्यावर… युक्रेनने तटस्थ राहावे, हा पुतिन यांचा सल्ला झेलेन्स्की यांनी न ऐकल्यामुळे पुतिन यांनी युद्ध छेडले. त्यामुळे त्यांची पहिली नैसर्गिक अट ही युक्रेनला किमान नजिकच्या भविष्यात ‘नेटो’चे सदस्यत्व नाकारणे, हीच असेल. रशियाच्या आक्रमणाला कडवा प्रतिकार करणाऱ्या झेलेन्स्की यांना हटवावे आणि त्यांच्या जागी क्रेमलिनला मान्य असलेल्या व्यक्तीला युक्रेनच्या अध्यक्षपदी बसवावे, अशी अटही पुतिन घालू शकतात. क्रायमियाबरोबरच २०२२नंतर युक्रेनपासून तोडलेले डोनेक्स आणि लुहान्स्क हे प्रांतही पुतिन मागू शकतात. अखेरीस, अर्थातच युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका, युरोप आणि संयुक्त राष्ट्रांनी लादलेले निर्बंध हटविण्याची त्यांची मागणी असू शकेल.

ट्रम्प यांची भूमिका काय असू शकेल?

तज्ज्ञांच्या मते यापैकी एकाही अटीमुळे अमेरिकेचे अहित होत नसल्याने त्या मान्य करण्यात ट्रम्प यांना कोणतीही अचडण नाही. मात्र पुतिन यांच्या मागण्या जशाच्या तशा मान्य केल्या, तर ट्रम्प यांची ‘मुत्सद्दी मध्यस्थ’ ही प्रतिमा डागाळली जाऊ शकेल. त्यामुळे वाटाघाटींवेळी ते पुतिन यांनाही काही पावले मागे घ्यायला लावण्याची शक्यता आहे. शिवाय अमेरिकेतील शस्त्रास्त्र निर्मिती उद्योजकांचे हितही ट्रम्प यांना बघावे लागेल. त्यामुळे मॉस्को आणि वॉशिंग्टन या दोन्ही ठिकाणी मान्य होईल, असा एखादा मध्यममार्गी तोडगा काढला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत असले, तरी यात युक्रेनचे अतोनात नुकसान होणार, हेदेखील निश्चित आहे. त्यामुळेच अध्यक्षपदाची दुसरी कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच ट्रम्प यांनी पुतिन यांच्याबरोबर संवाद सुरू करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

amol.paranjpe@expressindia.com