सीएसआयआर-नीरीचे तत्कालीन संचालक डॉ. राकेश कुमार आणि संस्थेच्या चार शास्त्रज्ञांवर केंद्रीय तपास यंत्रणेने गुन्हे दाखल केल्यानंतर नागपूरमध्ये नीरी या संस्थेत प्रचंड खळबळ उडाली. बनावट कंपन्या दाखवून कंत्राट मिळवणे, महागडे साहित्य खरेदी करणे आणि बनावट संशोधन उपकरणे खरेदी केल्याप्रकरणी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) नागपुरातील कार्यालयासह चार राज्यात १७ ठिकाणी सीबीआयने छापे टाकले.
डॉ. राकेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप कोणते?
नीरीचे संचालक असताना डॉ. राकेश कुमार यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले होते. अनेक दिवसांपासून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेमध्ये याबाबत तक्रारी केल्या जात होत्या. सीएसआयआरनेही या प्रकरणाची चौकशी केली. अनेक महिने चाललेल्या या तपासणीत काही गैरप्रकार उघडकीस आले. पावसाळ्यातच नीरीच्या परिसरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या छाटणे, पात्र कर्मचाऱ्यांऐवजी नातेवाईकांनाच प्राधान्य देणे याला डॉ. राकेश कुमार यांनी प्राधान्य दिले होते. नीरीमधील अनेक पदांवर रिक्त जागा सोडल्या आणि नंतर मुलाखतींमध्ये त्यांच्या दूरच्या नातेवाईकांना आणि ओळखीच्यांना नोकऱ्या दिल्या. संशोधनाच्या नावाखाली केवळ त्यांचे आराखडे बनवले गेले, कागदपत्रे तयार केली गेली. अशा अनेक संशोधनांवर त्यांनी पैसे दिले. विभागात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून त्यातील खर्चावरही आक्षेप घेण्यात आले.
हेही वाचा >>> तीन ते पाच वर्षांचा कारावास… दहा लाखांपर्यंत दंड… स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटीला नवीन कायद्याने आळा बसेल?
संचालक पदावरून हकालपट्टी ते निलंबन…
नीरीमधील तक्रारींच्या चौकशीत आरोप सिद्ध झाल्यानंतर नऊ एप्रिल २०२१ मध्ये त्यांना संचालक पदावरून काढण्यात आले आणि सीएसआयआर दिल्लीच्या मुख्यालयात त्यांना पाठवण्यात आले. डॉ. राकेश कुमार यांच्याविरोधात त्यांचेच कर्मचारी उघडपणे समोर आले होते. काहींनी नावे घेऊन तक्रारी केल्या होत्या तर काहींनी अधिकृतपणे तपासात सहभाग घेतला होता. या संपूर्ण प्रकरणातील विशेष बाब म्हणजे डॉ. राकेश कुमार ३० एप्रिल २०२४ला सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्याआधीच २७ एप्रिल २०२४ला त्यांना निलंबित करण्यात आले. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद नवी दिल्ली यांनी निलंबनाचा आदेश जारी केला.
गैरव्यवहार कुणामुळे उघडकीस?
वादग्रस्त ठरलेल्या सीएसआयआर-नीरीचे तत्कालीन संचालक डॉ. राकेश कुमार यांनी विविध नावांवर बनावट कंपन्या तयार केल्याचा आरोप होता. त्यांच्या कार्यकाळात याच कंपन्यांना नीरीअंतर्गत कोट्यवधींची कामे देण्यात आली. संस्थेतीलच एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती मिळवली आणि सीएसआयआरकडे तक्रार केली. या तक्रारीकडे कानाडोळा करण्यात आल्याने त्यांनी केंद्रीय सतर्कता आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने सीएसआयआरला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या आधारावर ऑगस्ट २०२० मध्ये या प्रकरणाच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली. डॉ. राकेश कुमार यांनी समितीच्या स्थापनेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. दरम्यान, चौकशी समितीने डॉ. राकेश कुमार यांच्यासह १३ जणांना नोटीस बजावली होती. चौकशीत संस्थेच्या अधिकाऱ्याने केलेले आरोप सिद्ध झाले.
हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या ४१ वर्षे आधी इंदिरा गांधींनी दिली होती ऑस्ट्रिया भेट; काय होते दौऱ्याचे महत्त्व?
नीरी प्रकरणात किती व कुणाविरोधात गुन्हे?
पहिल्या प्रकरणात नीरीचे तत्कालीन संचालक डॉ. राकेश कुमार, डॉ.अत्या कपले (तत्कालीन वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, संचालक संशोधन कक्ष, नीरी), संचालक-मेसर्स अलकनंदा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ऐरोली, नवी मुंबई, संचालक-मेसर्स एन्व्हायरो पॉलिसी रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे, मेसर्स एनर्जी एन्व्हारो प्रायव्हेट लिमीटेड, पवई-मुंबई यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात नीरीचे तत्कालीन संचालक राकेश कुमार, डॉ. रितेश विजय (तत्कालीन प्रधान शास्त्रज्ञ), संचालक-मेसर्स वेस्ट टू एनर्जी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल-इंडिया, प्रभादेवी, मुंबई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तिसऱ्या प्रकरणात डॉ. सुनील गुलिया, (दिल्ली झोनल सेंटर, नीरीचे तत्कालीन सीनियर सायंटिस्ट, सीएसआयआर-नीरी, नागपूर), डॉ. संजीव कुमार गोयल (तत्कालीन वरिष्ठ प्रधान शास्त्रज्ञ, नीरी) नागपूर, संचालक-मेसर्स ईएसएस एन्व्हायर्नमेंट कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि संचालक-मेसर्स. अलकनंदा टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
सीबीआयकडे तक्रार का?
नीरीमध्ये साहित्य खरेदी, निविदा प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार नवी दिल्लीच्या सीबीआय कार्यालयाला मिळाली होती. नीरी ही संस्था केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद अंतर्गत काम करणारी आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणाऱ्या या नामांकित संशोधन संस्थेत सीबीआयचे पथक चौकशीसाठी येताच एकच खळबळ उडाली. नीरीत ठराविक आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनच महागड्या संशोधन उपकरणांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
rakhi.chavan@expressindia.com