जानेवारी महिन्याच्या अखेरीस राज्यात उघडकीस आलेल्या वाघांच्या शिकार सत्राने वनखाते हादरले आहे. कोट्यावधींचा व्यवहार यातून झाल्याने मोठ्या संख्येने वाघ मारले गेले आहेत, हे स्पष्ट आहे. महाराष्ट्रासह बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यांमध्ये वाघांच्या अवयवांच्या बेकायदा तस्करींचे प्रमाण अधिक आहे. तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे शिकारीचे प्रमुख ठिकाण ठरू शकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाघांच्या अवयवांना सर्वाधिक मागणी कुठे ?
चीनमध्ये वाघांच्या अवयवाला सर्वाधिक मागणी असून या अवयवाच्या खरेदीसाठी मोठे ग्राहक या देशात आहेत. पारंपरिक चिनी औषधांमध्ये वाघांच्या हाडांचा वापर केला जातो. तर वाघाची कातडी, नखे, दात यांना ‘फॅशन’ बाजारात सर्वाधिक मागणी आहे. ‘फॅशन’च्या वस्तू, दागिने बनवण्यासाठी किंवा घराच्या सजावटीसाठी त्याचा वापर केला जातो. चीनमध्ये वाघनखे, दात हे शौर्याचे प्रतीक मानले जाते. वाघाचे मांस, रक्त, हाडे, चरबी, जननेंद्रिय हे सर्व पारंपरिक औषध तसेच विविध आजारांवरील उपचारांमध्ये वापरले जातात. वाघाचे हाड उकळल्यानंतर ते ‘टायगर बोन ग्लू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिकट पदार्थात रूपांतरित होते. चीनसह अनेक देशांमधील पारंपरिक औषधांमधील तो एक घटक आहे. ‘टायगर वाईन’देखील वाघांच्या हाडांपासून तयार केली जाते.
तस्करी कोणत्या मार्गाने?
वाघांच्या अवयवांच्या तस्करीसाठी प्रामुख्याने चार मार्ग वापरले जातात. यात नेपाळ-भूतान सीमा, आसाम सीमा, ब्रह्मपुत्रा नदी आणि पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे हे मार्ग भारतातील पाच व्याघ्रसंवर्धन क्षेत्रांशी संबंधित आहेत. या आंतरराष्ट्रीय नेटवर्कच्या माध्यमातून तस्कर चीनमध्ये पोहोचतात. वाघांच्या अवयवांना त्यांच्या ठरावीक ठिकाणी पोहोचवण्यासाठी रेल्वे, विमान, कार, बोट यासारखी वाहने आणि प्रसंगी माणसांचाही वापर केला जातो. मात्र, या ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही तस्कर सराईतपणे त्यांचा माल इतर देशांत पोहोचवतात. भारतातून तस्करी करण्यासाठी प्रामुख्याने नेपाळ किंवा म्यानमारसारख्या देशांचा वापर केला जातो. मलेशिया आणि इंडोनेशियामधून होणारी तस्करी थायलंड, म्यानमार आणि व्हिएतनामद्वारा होते.
सर्वाधिक तस्करी कोणत्या राज्यातून?
अलीकडच्या कारवायांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू व आसाम या राज्यांमध्ये वाघांच्या अवयवांच्या जप्तीची तीव्रता अधिक आढळली आहे. त्याचवेळी पश्चिम घाट क्षेत्राजवळदेखील जप्तीचे प्रमाण अधिक आढळले आहे. महाराष्ट्रासह बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यांमध्ये वाघांच्या अवयवांच्या बेकायदा तस्करींचे प्रमाण अधिक आहे. तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे शिकारीचे प्रमुख ठिकाण ठरू शकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली ते आसाममधील गुवाहाटीपर्यंत वाघांची शिकार आणि अवयवांच्या तस्करीचे प्रकरण समोर आले. त्याखेरीज, मेघालयातील शिलाँगला जात असलेल्या पाच व्यक्तींकडून गुवाहाटी येथे वाघाची कातडी, हाडे, पंजे जप्त करण्यात आले. ते देखील गडचिरोली जिल्ह्यातील होते. त्यावेळी शिकाऱ्यांनी चार वाघांच्या शिकारीची कबुली दिली. तर आता २०२५ मध्येही वाघांच्या अवयवांच्या तस्करीचे मोठे प्रकरण समोर आले.
वाघांच्या अवयवांचा उपयोग काय?
वाघाच्या रक्ताचा उपयोग केला जातो. शरीराला कुठे भाजले असेल तर वाघाच्या विष्ठेचा उपयोग मलमाप्रमाणे केला जातो. वाघाच्या अवयवांमध्ये हाडांना सर्वाधिक मागणी आहे. चीनमध्ये १०० प्रकारच्या पारंपरिक औषधांमध्ये वाघांच्या हाडांची भुकटी वापरली जाते. याशिवाय मद्यामध्येसुद्धा तिचा वापर होतो. शरीरातील गाठी, अशक्तपणा, डोकेदुखी, हातपाय अकडणे, कंबर व पायांमधील अर्धांगवायू आदी रोगांपासून मुक्ती देण्याची शक्ती वाघांच्या हाडांमध्ये असल्याचा समज आहे. वाघाच्या कातडीपासून तयार केलेले कपडे घालणे हा ‘स्टेटस सिम्बॉल’ मानला जातो. वाघाच्या कातडीवर बसून धार्मिक विधी केल्यास फलप्राप्ती होते, अशी धारणा आहे. घराच्या पडवीत वाघाची कातडी असणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. कातडीवर थोडा वेळ बसल्यास मानसिक रोग बरे होतात, ताप उतरतो अशी श्रद्धा आहे. वाघाच्या शेपटीची भुकटी त्वचारोगांवर उपचारासाठी वापरली जाते. निद्रानाश आणि इतर मानसिक आजारांवर उपचारासाठी तयार केल्या जाणाऱ्या औषधांमध्ये वाघनखांचा वापर केला जातो. कामोत्तेजना वाढविण्याच्या औषधात वाघाच्या लिंगाचा वापर केला जातो. वाघाच्या कवटीमुळे माणसाला जादूई शक्ती प्राप्त होते असा समज आहे. वाघाच्या शेपटीच्या भुकटीचा वापर मुलांना होणारा मेंदुज्वर बरा करण्यासाठी होतो. वाघाचे मांस आणि चरबी वातावरील उपचारासाठी वापरली जाते. याशिवाय उलट्या आणि रक्तस्राव थांबविण्यासाठी तसेच कुत्रा चावल्यास ती उपयुक्त मानली जाते. तिरिमिरी, मलेरियावर उपचारासाठी निर्मित औषधात या डोळ्यांचा वापर होते.
वाघांच्या अवयवांची किंमत काय?
वाघांच्या अवयवांची किंमत स्थिर नाही, तर ती सातत्याने बदलत आहे. भारतातून आंतरराष्ट्रीय बाजारात जातपर्यंत या अवयवांच्या किमतीत फार मोठे बदल होतात. महाराष्ट्रात २०१३ मध्ये वाघांच्या शिकारीचे सत्र समोर आले, त्यावेळी वाघाची शिकार करण्यासाठी तीन लाख रुपये खर्च होत होते. तर दिल्लीवरून चीनला पोहोचेपर्यंत त्याची किंमत दहा लाख रुपयांच्या घरात होती. हे त्यावेळी अटक करण्यात आलेल्या बहेलियांच्या डायरीतून स्पष्ट झाले होते. आताही वाघाच्या कातडीसाठी सुमारे १५ लाख रुपये तर हाडांसाठी दहा ते बारा लाख रुपये ही किंमत असल्याचे सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात ही किंमत आणखी जास्त होते. त्यामुळे जेव्हा वाघांच्या शिकारीचे सत्र समोर येते तेव्हा हा व्यवहार कोट्यवधीच्या घरात जातो.
rakhi.chavhan@expressindia.com