प्रज्ञा तळेगावकर
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षांच्या तयारीसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी कोटा येथे येतात. अकरावी आणि बारावीनंतर येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या वर्षी मोठी घट झाल्याचे दिसून येते. याचा फटका कोचिंग इन्स्टिट्यूटसह त्यावर आधारीत इतर उद्योगांनाही बसला आहे. विद्यार्थी संख्या कमी होण्याची नेमकी कारणे कोणती याचा ऊहापोह.
पालकांनी कोटाकडे पाठ का फिरवली?
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी येथे येतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणि पालकांच्या अपेक्षांतही मोठी वाढ झाली होती. याचा परिणाम अपेक्षांचे ओझे सहन न झाल्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढण्यात झाली. कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांनंतर पालक आपल्या मुलांना घराजवळील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना कोटा येथे येण्याच्या मानसिक दडपणातूनही दिलासा मिळात आहे.
संख्येत घट किती आणि कशामुळे?
कोटामध्ये कोचिंग प्रवेश साधारणपणे डिसेंबर ते जून या कालावधीत होतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. येथील अनेक शिक्षक या घसरणीची वेगवेगळी कारणे देत आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांच्या घराजवळ नवीन कोचिंग सेंटर सुरू होणे, हे होय. कोटामधील अनेक संस्थांनी राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये त्यांची नवीन केंद्रे उघडली आहेत. तेथे प्रवेश घेण्यास पालक आणि विद्यार्थी उत्सुक असल्याचे दिसून येते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळच शिकता येते. तसेच बाहेर राहण्याचा, खाण्याच्या खर्चासह अन्य खर्च कमी होऊन पालकांवरील आर्थिक भार देखील कमी होतोच. शिवाय बाहेर राहण्याच्या आणि शिकण्याच्या दडपणातून विद्यार्थ्यांची सुटका होऊन त्यांचे भावनिक आणि मानसिक आरोग्य देखील उत्तम राहते. असे अनेक कोचिंग इन्स्टिट्यूटचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण: आरटीई प्रवेशांचा मार्ग मोकळा कसा झाला?
संख्या घटल्याचा परिणाम कुणावर आणि कसा?
विद्यार्थ्यांच्या कमी नोंदणीचा परिणाम शिक्षक, वसतिगृह मालक, पुस्तकांची दुकाने, खाणावळी, रस्त्यालगतचे दुकानदार या सर्वांवरच झालेला दिसून येत आहे. कोटामधील अनेक कोचिंग इन्स्टिट्यूटनी त्यांच्या विद्यार्थी नोंदणीत ३५ ते ४० टक्क्यांनी घट झाली असल्याने त्यांच्या शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन २० ते ४० टक्क्यांनी कमी केले आहे. काही इन्स्टिट्यूटनी कोटा बाहेरील नवीन केंद्रांवर शिक्षक पाठवण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या कमी प्रवेशामुळे खाणावळ (मेस) चालवणाऱ्यांचे ५० टक्के नुकसान झाले आहे. या घसरणीमुळे परिसरातील अनेक छोट्या खाणावळी बंद झाल्याचे सांगण्यात येते. अनेक पुस्तकांच्या दुकानदारांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : भालाफेक, कुस्ती, शुटिंग, बॅडमिंटन… पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कोणत्या खेळात पदकांची आशा?
वसतिगृह मालकांची समस्या कोणती?
कोटामध्ये कोचिंगसाठी प्रवेश घेणाऱ्यांत सर्वात मोठी घट बिहार आणि झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत झाली आहे, जे पूर्वी कोटामध्ये मोठ्या संख्येने येत. विद्यार्थी कमी झाल्याने वसतिगृहातील रिकाम्या खोल्या आणि कमी भाडे या समस्येने वसतिगृह मालक त्रस्त आहेत. वसतिगृहांचे भाडे २०-३० टक्क्यांनी कमी झाले आहे, असे कोटा हॉस्टेल असोसिएशनने सांगितले. असोसिएशन मालक आणि लीजधारकांमधील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. वसतिगृह घेण्यासाठी पट्टेदारांनी भरमसाट पैसे दिले होते, पण आता वसतिगृहात त्यांच्याकडे पुरेसे विद्यार्थी नाहीत. करोना काळात वसतिगृह मालकांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते, तशीची स्थिती आता असल्याचे वसतिगृह मालकांचे म्हणणे आहे. २०२२ मध्ये येथील नोंदणी तीन लाखांपर्यंत झाली होती. या वर्षा ती दोन लाखांपर्यंत झाली आहे.
येथील व्यावसायिकांचे म्हणणे काय?
करोना काळात येथील इन्स्टिट्यूटसह त्यावर आधारीत इतर व्यावसायिकांना महासाथीची एकच समस्या भेडसावत होती. पण आता इतर शहरांतील नवीन कोचिंग सेंटर्स, कोचिंग इन्स्टिट्यूटचे सरकारी नियम आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे निर्माण झालेल्या समस्यांचाही सामना करावा लागत आहे. नीट-यूजी पेपर फुटीच्या वादामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. मात्र, कोटातील व्यावसायिक अजूनही आशावादी आहेत. कोटाच्या कोचिंग संस्थांचा दर्जा आणि त्यांच्या चांगल्या निकालांमुळे पुढील वर्षी ही संख्या पुन्हा वाढेल, असे त्यांना वाटते.