भारतात २०२५ पर्यंत कर्करुग्णांच्या संख्येत १२.७ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दुसरीकडे सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे रुग्णांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर्सची संख्या कमी आहे. ही संख्या वाढण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर जागा वाढवणे आवश्यक असले तरी त्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे भविष्यात तज्ज्ञांच्या तुटवड्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारावर होण्याची शक्यता आहे.
देशात कर्करुग्णांची सद्यःस्थिती काय आहे?
महाराष्ट्रात २०१३ मध्ये कर्करोग रुग्णांची संख्या ९७ हजार ७५९ इतकी होती. मागील १० वर्षांत राज्यात रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ७१७ इतकी झाल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अहवालानुसार देशात २०२० मध्ये १३ लाख ९२ हजार कर्करोगाचे रुग्ण होते. २०२१ मध्ये ही रुग्णसंख्या १४ लाख २६ हजार तर २०२२ मध्ये १४ लाख ६१ हजार होती. २०२५ पर्यंत ही संख्या १२.७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक रुग्ण कोणत्या राज्यात?
भारतात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक कर्करोगाचे रुग्ण आढळले आहेत. २०२३ मध्ये नोंद झालेल्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक २ लाख ११ हजार रुग्ण उत्तर प्रदेश, १ लाख २१ हजार रुग्ण महाराष्ट्र, १ लाख १३ हजार रुग्ण पश्चिम बंगालमध्ये, १ लाख १० हजार रुग्ण बिहारमध्ये, ८२ हजार रुग्ण तामिळनाडूमध्ये आढळले. यात ओठ आणि तोंड, स्तन, गर्भाशय, फुफ्फुस, अन्ननलिकेच्या कर्करोगाचे रुग्ण सर्वाधिक कर्करुग्ण होते.
हेही वाचा >>> ‘सरकारकडून हेरगिरी!’ काँग्रेस नेत्याचा आरोप; ॲपल कंपनीने पाठवलेल्या इमेलमध्ये काय म्हटलंय?
कर्करोग वाढण्याची कारणे कोणती?
महाराष्ट्रासह भारतात जंक फूड, फास्ट फूड सेवनाच्या वाढत्या प्रमाणासह इतरही खानपानाच्या वाईट सवई, बदलती जीवनशैली, मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थाचे (गुटखा, खर्रा, पानमसाला) सेवन, धूम्रपान, प्रदूषण, वाढते ताण-तणाव, शारीरिक व्यायामाचा अभाव अशा अनेककारणांमुळे मागील काही वर्षांपासून कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आनुवंशिकपणामुळेही कर्करोगाची जोखीम वाढते, अशी माहिती नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयाचे डॉ. बी. के. शर्मा यांनी दिली.
तज्ज्ञ डॉक्टर्सचे प्रमाण पुरेसे आहे का?
देशात कर्करुग्ण वाढत असतानाच आजच्या घडीला केवळ २ हजारांच्या जवळपास कर्करोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतातील कर्करुग्णांची एकूण स्थिती बघता प्रत्येक २ हजार कर्करुग्णांमागे देशात केवळ १ कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याचा दावा कर्करोग तज्ज्ञांच्या संघटनांकडून केला जातो. महाराष्ट्राचीही स्थितीही अशीच आहे. राज्यातील कर्करुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता कर्करोग तज्ज्ञांची संख्या वाढवण्यासाठी विविध शासकीय व खासगी महाविद्यालयात पदव्युत्तरच्या जागा वाढवण्याची गरज आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्थिती काय?
राज्यात मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अखत्यारित असलेल्या कामा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर, सांगली या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतच स्वतंत्र कर्करोग विभाग आहे. त्यापैकी छत्रपती संभाजीनगरला २ लिनिअर एक्सिलेटर, २ ब्रेकोथेरपी यंत्रासह इतरही काही अद्ययावत यंत्रे आहेत. शिवाय नागपूरमध्ये कालबाह्य कोबाल्टवर रुग्णांवर उपचार होतात. परंतु येथे लिनिअर एक्सिलेटर व ब्रेकोथेरपी यंत्र नाही. त्यामुळे कालबाह्य कोबाल्टवर रुग्णांवर उपचार होतात. सांगलीमध्ये कोबाल्ट यंत्र बंद असून येथेही अद्ययावत यंत्रांची वानवा आहे. या शासकीय रुग्णालयांत सरकार आवश्यक पायाभूत सुविधांसाठी पैसे देत नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर वगळता इतर भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये कर्करुग्णांना उपचारासाठी प्रचंड मनस्ताप करावा लागत आहे.
हेही वाचा >>> ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला… आतापर्यंत चार अमेरिकी अध्यक्षांच्या हत्या; तिघांच्या हत्येचा प्रयत्न!
पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सध्या स्थिती काय?
राज्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या दोनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्येच विकिरणोपचार व कर्करोगशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. त्यापैकी मेडिकलला ५ तर औरंगाबादला २ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण २२ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. दरम्यान यंदा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आरोगाने नागपुरातील मेडिकलच्या पदव्युत्तर जागेवर पायाभूत सुविधांच्या त्रुटीवर बोट ठेवत प्रवेश थांबवला आहे. त्यामुळे शासकीय संस्थेतील आणखी पाच जागा कमी होणार आहेत.
काय सुधारणा व्हायला हव्या?
राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोग विभाग स्थापन करून तेथे प्राध्यापकांसह मुख्य रेडिएशन ऑन्कोलाॅजिस्ट, रेडिएशन सुरक्षा अधिकारी आणि इतर पदे भरायला हवी. सोबत येथे लिनिअर एक्सिलेटर, ब्रेकोथेरपीसह इतरही आधुनिक यंत्र खरेदी करून आवश्यक पायाभूत सुविधा उभारायला हवी. त्यातून जास्तीत जास्त कर्करोग तज्ज्ञांची संख्या वाढवणे शक्य होईल. दुसरीकडे सर्वत्र कर्करोगाचे रुग्ण कमी व्हावे म्हणून तंबाखूजन्य पदार्थ, मद्यपानासह इतरह वाईट गोष्टींपासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दिवान यांनी सांगितले.