इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाने सनरायजर्स हैदराबाद संघावर आठ गडी राखून एकतर्फी विजय नोंदवत आपले तिसरे जेतेपद मिळवले. या हंगामात अनेक संघांच्या कामगिरीत चढ-उतार पाहायला मिळाले. मैदानावर असताना संघासाठी कर्णधारच सर्व निर्णय घेत असतो. त्यावर संघाचे यश-अपयशही अवलंबून असते. यंदाच्या हंगामात भारतीय आणि विदेशातील खेळाडूंनी संघाची धुरा सांभाळली होती. त्यात कोण कितपत यशस्वी झाले याचा आढावा आपण घेणार आहोत. प्रत्येक कर्णधाराला कामगिरीच्या बळावर दहापैकी किती गुण मिळतात हे जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस अय्यर (कोलकाता नाइट रायडर्स) (८/१०)

कोलकाताच्या जेतेपदात मुंबईकर खेळाडूने निर्णायक भूमिका पार पाडली. गेल्या हंगामात दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या श्रेयसने संघाला जेतेपद मिळवून देत सर्व कसर भरून काढली. संघाने त्याच्या नेतृत्वाखाली नऊ विजय नोंदवत गुणतालिकेत अग्रस्थान मिळवत ‘प्ले-ऑफ’मध्ये पात्रता मिळवली होती. त्यानंतर पहिल्या क्वॉलिफायरमध्ये संघाने हैदराबादला नमवत अंतिम फेरी गाठली होती. श्रेयसने या हंगामातील १५ सामन्यांत ३५१ धावा केल्या. त्यामध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली. श्रेयसला देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवी प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि साहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरचे मार्गदर्शन मिळाले.

हेही वाचा >>> विश्लेषण: राज्य आहे, पण राजधानीच नाही! आंध्र प्रदेशवर २ जूनपासून ही वेळ का येणार?

पॅट कमिन्स (सनरायजर्स हैदराबाद) (७/१०)

ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवून देणारा कर्णधार पॅट कमिन्स सनरायजर्स हैदराबाद संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला. मात्र, त्याला जेतेपद मिळवून देण्यात अपयश आले. कमिन्सच्या हंगामाच्या आधी झालेल्या लिलावात २० कोटी ५० लाखांना आपल्या ताफ्यात घेतले. त्यांचा हा निर्णय संघाच्या पथ्यावरही पडला. मात्र, त्याचे काही निर्णय संघाच्या पथ्यावर पडले नाहीत. हैदराबादने या हंगामात फलंदाजीत मोठे इमले रचले. मात्र, निर्णायक क्षणी संघाची फलंदाजी ढेपाळली. कमिन्सने या हंगामात १८ बळी बाद करत आपले योगदान दिले. काही खेळाडूंवर दाखवलेल्या अतिआत्मविश्वासामुळे कमिन्सला जेतेपदापासून दूर रहावे लागले.

संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स) (७/१०)

यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाला जेतेपदासाठी पसंती मिळत होती. मात्र, हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर संघाला त्याचा फटका बसला. संघाच्या ‘प्ले-ऑफ’ पर्यंतच्या वाटचालीत सॅमसनने आपले नेतृत्वगुण व फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने १६ सामन्यांत ५३१ धावा केल्या व त्यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याची भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक संघात निवड झाली. निर्णायक ‘प्ले-ऑफ’ सामन्यांत सॅमसनला फलंदाजीत योगदान देता आले नाही व त्याचा फटका संघाला बसला.

हेही वाचा >>> २ दिवसात ३५ जण आगीच्या भक्ष्यस्थानी; नियमांकडे दुर्लक्ष होतंय का?

फॅफ ड्युप्लेसिस (राॅयल चॅलेंजर्स बंगळूरु) (७/१०)

दक्षिण आफ्रिकेच्या संघातून निवृत्ती घेतलेल्या फॅफ ड्यूप्लेसिस यावेळी संघाला ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवून दिले. मात्र, संघाला पुढे वाटचाल करता आली नाही. सध्याच्या ‘आयपीएल’ हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीला (७४१ धावा) ड्युप्लेसिसने फलंदाजीत चांगली साथ दिली. त्यानेही १५ सामन्यांत ४३८ धावा केल्या. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर बंगळूरुने ड्युप्लेसिसच्या नेतृत्वाखाली आपली कामगिरी उंचावली. आपल्या फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ड्युप्लेसिसचे नेतृत्वगुणही या हंगामात दिसले. निर्णायक सामन्यात त्याच्या निर्णयाचा फायदाही संघाला झाला.

ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्ज) (६/१०)

चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामात युवा ऋतुराज गायकवाडवर संघाची धुरा सोपवली. गतविजेत्या चेन्नईला पुन्हा ‘प्ले-ऑफ’पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ऋतुराजवर होती. मात्र, संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. प्रथमच संघाचे कर्णधारपद भूषवत असल्याने त्याच्या नेतृत्वगुणात नवखेपणा जाणवला. मात्र, त्याने फलंदाजीत निराशा केली नाही. ऋतुराजने १४ सामन्यांत ५८३ धावा केल्या. त्यामध्ये एक शतक व चार अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे. ऋतुराजच्या कर्णधारपदासाठीचा अनुभव या हंगामात कमी पडला. पुढील हंगामात त्याच्याकडून अपेक्षा असतील.

ऋषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स) (६/१०)

कार अपघातानंतर सावरलेला ऋषभ पंत यावेळी संघाचे नेतृत्व कसे करतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्याने आपल्या वैविध्यपूर्ण फटक्यांनी संघासाठी धावा केल्या. यष्टीमागेही त्याच्यात चुणूक पाहायला मिळाली. परिणामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यात तो यशस्वी झाला असला, तरीही दिल्लीला ‘प्ले-ऑफ’ पर्यंत पोहोचवण्यात तो अपयशी ठरला. पंतने १३ सामन्यांत ४४६ धावा करताना फलंदाजीत योगदान दिले. मात्र, चुरशीच्या सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवता न आल्याने संघाची निव्वळ धावगती कमी राहिली व संघ ‘प्ले-ऑफ’मध्ये पोहचू शकला नाही. पुढील हंगामात ही कसर भरून काढण्याचा त्याचा प्रयत्न राहील.

केएल राहुल (लखनऊ सुपर जायंट्स) (६/१०)

लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोएंका व केएल राहुल यांच्यातील ध्वनीचित्रफीत या ‘आयपीएल’ हंगामात चर्चेचा विषय ठरली. नंतर या प्रकरणावर सारवासारव करण्यात आली. राहुलने या हंगामातील १४ सामन्यांत ५२० धावा केल्या. मात्र, या धावा संथगतीने केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. काही सामन्यांत त्याच्या संथगतीच्या फलंदाजीचा फटका संघाला बसला. त्यातच ट्वेन्टी-२० विश्वचषकात संघात त्याला स्थान मिळाले नाही. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये राहुलने चांगले नेतृत्व केले. मात्र, वेगवान गोलंदाज मयांक यादव जायबंदी झाल्यानंतर संघाचे योग्य संतुलन राखण्यात राहुल अपयशी ठरला.

शुभमन गिल (गुजरात टायटन्स) (४/१०)

हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आल्यानंतर गुजरातची धुरा युवा शुभमन गिलवर सोपवण्यात आली. मात्र, त्याच्या नेतृत्वगुणाची छाप या हंगामात पाहायला मिळाली नाही. त्याने फलंदाजीत १२ सामन्यांत ४२६ धावा केल्या. यादरम्यान त्याने शतकही झळकावले. मात्र, काही निर्णायक सामन्यांत त्याचे नेतृत्वगुण कमी पडले. त्यातच दोन सामने पावसामुळे न झाल्याचा फटकाही संघाला बसला. गिल प्रथमच कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत होता. त्यामुळे त्याचा अनुभव कमी वाटला. आगामी हंगामात संघ व्यवस्थापन त्याच्याकडे पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी देईल का, याकडे लक्ष राहील.

सॅम करन (पंजाब किंग्ज) (३/१०)

शिखर धवनने सुरुवातीच्या सामन्यात संघाचे नेतृत्व केल्यानंतर तो जायबंदी झाला. यानंतर संघाची धुरा सॅम करनवर सोपवण्यात आली. करनने १३ सामन्यांत संघासाठी २७० धावा करण्यासह १६ बळीही मिळवले. मात्र, संघाची योग्य मोट बांधण्यात त्याला अपयश आले. करनने स्वत: अनेकदा फलंदाजीचा क्रम बदलला. त्यामुळे त्यांची फलंदाजी फळी स्थिरावू शकली नाही. गोलंदाजी करतानाही काहीसे असेच घडले. करनमध्ये अनेक निर्णायक सामन्यात नेतृत्वगुणांचा अभाव पाहायला मिळाला.

हार्दिक पंड्या (मुंबई इंडियन्स) (२/१०)

या हंगामात गुजरातकडून मुंबईच्या ताफ्यात दाखल झालेल्या हार्दिक पंड्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. संघाला पाच जेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्माकडून जबाबदारी काढून घेतल्यानंतर चाहत्यांमध्ये हार्दिकविषयी राग होता. मैदानाबाहेरही हार्दिकला शेरेबाजीचा सामना करावा लागला. त्याच्या कामगिरीवर याचा परिणाम पाहायला मिळाला. सर्वच आघाड्यांवर हार्दिक यंदाच्या हंगामात अपयशी ठरला. तो तणावाखाली खेळत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर फरक जाणवला. मुंबईचा संघ हंगामात अवघे चार विजय नोंदवत गुणतालिकेत तळाशी राहिला. हार्दिकनेही संघासाठी २१६ धावा करण्यासह ११बळी मिळवले. त्यामुळे आगामी हंगामात त्याच्याकडेच कर्णधारपदाची जबाबदारी राहील का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis report card of captains of the 17th season of ipl 2024 print exp zws
Show comments