संदीप नलावडे
विमानाचे उड्डाण विलंबाने होणार असल्याची उद्घोषणा करणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या वैमानिकावर प्रवाशाने हल्ला केल्याची घटना नुकतीच दिल्ली विमानतळावर घडली. या प्रवाशाला अटक करण्यात आली असून विमान वाहतूक प्रशासनही त्यावर कारवाई करणार आहे. विमानातील प्रवाशांची बेशिस्त वर्तणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने २०१७ मध्ये नियमावली तयार केली होती आणि विमान प्रवास प्रतिबंध करण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे लागू केली होती. त्याविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली विमानतळावर नेमके काय घडले?

दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहे, तर काही विमाने रद्द करण्यात आली. काही विमानांना उड्डाण करण्यास विलंब झाला. ‘इंडिगो’च्या एका विमानाचे उड्डाण विलंबाने होणार असल्याची उद्घोषणा या विमानातील वैमानिक करत असताना साहिल कटारिया या प्रवाशाचा राग अनावर झाला आणि त्याने या वैमानिकाला मारहाण केली. या प्रवाशाला तात्काळ अटक करण्यात आली असून या घटनेच्या तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रवाशाचे वर्तन आक्षेपार्ह असल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिला आहे, तर आरोपीच्या विमान प्रवासावर प्रतिबंध आणण्यासाठी हे प्रकरण स्वतंत्र समितीकडे पाठविण्यात आल्याचे इंडिगो कंपनीने सांगितले.

हेही वाचा >>> ‘घरबसल्या पैसे कमवा’च्या नावाने नेमकी कशी फसवणूक होते? काय काळजी घ्यावी?

विमानातील प्रवाशांची बेशिस्त वर्तणूक रोखण्यासाठी काय नियम आहेत?

केंद्र सरकारने २०१७ मध्ये विमान उड्डाणामध्ये प्रवाशांचे बेशिस्त आणि आक्षेपार्ह वर्तन रोखण्यासाठी नियमावली लागू केली. आरोपीच्या विमान प्रवासावर प्रतिबंध आणण्यासाठी (नो फ्लाय लिस्ट) तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एखाद्या विमान कंपनीला प्रवाशाचे वर्तन आक्षेपार्ह आढळल्यास ‘पायलट-इन- कमांड’ला तक्रार दाखल करावी लागते. या तक्रारीनंतर अंतर्गत समितीद्वारे या प्रकरणाची चौकशी केली जाते. चौकशीत या प्रवाशाचे वर्तन नियमबाह्य आढळल्यास त्याच्यावर जास्तीत जास्त ३० दिवसांसाठी विमान प्रवासास बंदी घालू शकते. मात्र समितीने या प्रकरणावर ३० दिवसांच्या आत निर्णय घ्यायचा असून प्रवाशाला किती काळ विमान प्रवासापासून दूर ठेवता येईल हे निर्दिष्ट करायचे आहे. जर निर्धारित वेळेत जर समिती निर्णय घेण्यास अयशस्वी ठरली तर प्रवाशाला विमान प्रवास करण्यास प्रतिबंध येऊ शकत नाही. चौकशी करणाऱ्या समितीचे नेतृत्व सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायालयांतील न्यायाधीशांनी करावे आणि समितीचे सदस्य म्हणून वेगवेगळ्या नियोजित विमान कंपनींचे प्रतिनिधी, प्रवासी किंवा ग्राहक संघटनेचा प्रतिनिधी असणे आवश्यक आहे.

विमानातील कोणत्या प्रकारचे वर्तन बेशिस्त, आक्षेपार्ह गणले जाईल?

विमान प्रवासातील प्रवाशांच्या गैरवर्तनाचे विमान वाहतूक प्रशासनाने तीन प्रकारचे वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणानुसार प्रवाशाला शिक्षा होऊ शकते. अति मद्यपान, बेलगाम वर्तन, शाब्दिक गैरवर्तन, शारीरिक गैरवर्तन हे ‘स्तर-१’ प्रकारात मोडेल. शारीरिक अपमानास्पद वर्तन, ढकलणे, लाथ मारणे, वस्तू फेकून मारणे, पकडणे, अयोग्य स्पर्श करणे, लैंगिक छळ हा ‘स्तर-२’ प्रकारातील गैरप्रकार आहे, तर जीवितास धोका निर्माण होईल असे वर्तन करणे, विमानाची मोडतोड करणे, विमानातील यंत्रणेचे नुकसान करणे, शारीरिक हिंसा, डोळ्यांवर मारणे, खुनी हल्ला, विमान कर्मचाऱ्यांच्या विभागात घुसण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारच्या गैरवर्तनाचा ‘स्तर-३’मध्ये समावेश करण्यात आला आहे. गैरकृत्याच्या या तीन वर्गीकरणानुसार विमान वाहतूक कंपनीची अंतर्गत समिती संबंधित प्रवाशावर विमानातून प्रवास करण्यावर किती दिवसांची बंदी घालावी हे ठरवते.

हेही वाचा >>> मकर संक्रांतीनिमित्त मोदींनी गोसेवा केलेल्या पुंगनूर गाईंची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये; जाणून घ्या सविस्तर…

‘नो फ्लाय लिस्ट’चा उद्देश काय?

विमान वाहतूक महासंचालनालयाच्या ‘सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट्स’नुसार (सीएआर) विमानात प्रवाशाचे गैरवर्तन हा दंडनीय गुन्हा मानला जातो. गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांची संख्या एकूण प्रवाशांच्या संख्येने कमी असली तरी एक गैरवर्तन करणारा प्रवासी विमानातील सुरक्षिततेला धोका आणू शकतो. गैरवर्तन करणारा प्रवासी विमान उड्डाणाशी संबंधित प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर परिणाम करू शकतो आणि त्याचा परिणाम विमानोड्डाणावर होऊ शकतो, असे ‘सीएआर’ सांगते. उस्मानाबादचे तत्कालीन खासदार रवींद्र गायकवाड यांनी २०१७ मध्ये दिल्ली-पुणे विमानात एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर अशा प्रकारचे नियम तयार करण्यात आले. गायकवाड यांच्यावर अनेक विमान कंपन्यांनी दोन आठवड्यांची बंदी घातली होती. त्याच वर्षी ‘नो फ्लाय लिस्ट’ लागू करण्यात आली. विमान कंपनीने बंदी घातलेली कोणतीही व्यक्ती आदेश जारी झाल्यापासून ६० दिवसांच्या आत समितीकडे अपील करू शकते. ‘सीएआर’नुसार अपील समितीचा निर्णय अंतिम आहे.

‘नो फ्लाय लिस्ट’च्या आधारे आतापर्यंत किती प्रवाशांवर कारवाई?

नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह (निवृत्त) यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये राज्यसभेत दिलेल्या निवेदनात २०२१ ते २०२३ या दोन वर्षांत एकूण १६६ प्रवाशांवर ‘नो फ्लाय लिस्ट’नुसार विमान प्रवासावर प्रतिबंधाची कारवाई करण्यात आली. नोव्हेंबर २०१७ मध्ये मुंबईतील सराफ व्यावसायिक बिरजू किशोर सल्ला याच्यावर सर्वप्रथम ‘नो फ्लाय लिस्ट’नुसार कारवाई करण्यात आली. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या ‘जेट एअरवेज’च्या विमानाच्या शौचालयात सल्लाने चिठ्ठी ठेवली… विमानात १२ अपहरणकर्ते असून मालवाहू क्षेत्रात स्फोटके आहेत, असे त्या चिठ्ठीत हाेते. ही चिठ्ठी सापडल्यानंतर विमानाचे अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन अवतरण करण्यात आले. बॉम्बशोधक पथकाने विमानाची तपासणी केल्यानंतर ही माहिती खोटी असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी जेट एअरवेजने सुरक्षेचा भंग केल्याने सल्लावर ‘स्तर-३’चा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घातली. न्यूयॉर्क-दिल्ली अशा विमान प्रवासात एका महिला सहप्रवाशांवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रा या व्यक्तीलाही ‘एअर इंडिया’ने ३० दिवसांची बंदी घातली. एप्रिल २०२३ मध्ये एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशाने कर्मचाऱ्याबरोबर भांडण केल्यामुळे लंडनला जाणारे विमान दिल्लीच्या विमानतळावर परतले. या भांडणामुळे या विमानोड्डाणाला अनेक तासांचा उशीर झाला. परिणामी याचा फटका अन्य प्रवाशांनाही बसला. त्यामुळे गैरकृत्य करणाऱ्या या प्रवाशाला ३० दिवसांची बंदी घालण्यात आली. प्रवाशांमधील गैरवर्तणूक थंड जेवणाबाबत असमाधानी यांसारख्या किरकोळ समस्यांपासून ते बसून राहण्याच्या विनंतीपर्यंत असते.

sandeep.nalawade@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis rules and guidelines for passenger misbehavior in indigo flight print exp zws
Show comments